मराठी साहित्य

हिन्दी व मराठी चा परस्पर सहयोग

अठराव्या शतकाच्या प्रारंभी मराठ्यांच्या मोहीमा उत्तरेकडे होउं लागल्या. मुसलमानांच्या आक्रमणाने आणि छळाने त्रस्त झालेल्या हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ मदतीसाठी मराठयांना पाचारण केले.

ज्या गति ग्राह गजेन्द्र की । सा गति भई है आज ।।

बाजी जात बुंदेल की । राखी बाजी लाज।।   

ही चौपाई याचे प्रमाण आहे. सन् 1729 त मराठ्यांनी माळव्यातील मुसलमानी सत्तेचा पाडाव केला, आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी सरदार मल्हारराव होळकरांना माळव्याची सुभेदारी दिली. मराठीच्या माळव्यांतील प्रवेशाचे हेच वर्ष.

होळकरांच्या हाती सत्ता आल्यानंतर, सुमारे एक शतकाहून अधिक काळ मुलुख जिंकून मुसलमानांचा प्रभाव नष्ट करणे व राज्याची व्यवस्था लावणे यांत गेला. त्यानंतर उद्योग धंदे आदि राज्याच्या विकासाची आणि शाळा, दवाखाने, ग्रंथालये आदि लोककल्याणाची कार्यें होऊं लागली. पण राजाची भाषा मराठी तर जनतेची हिन्दी. शासकीय कार्य व कार्यालये यांतून राजसंस्था व जनता यांचा परस्पर संबंध व संपर्क  वाढू लागला. तेव्हां आपापत: जनता मराठी भाषा अभ्यासू लागली आणि राजे व राज्याधिकारी जनतेची भाषा हिन्दी समजू लागले. परस्पर भाषिक सहकार, समन्वय व सद्भाव स्थापन झाला.

उभय भाषांना सामान्यत: सारख्या सोयी असंत. बोधभाषा, उच्च शिक्षणांत उभय भाषांना प्रवेश, त्यांच्या साहित्य सभा, उभय भाषांतील ग्रंथोत्तेजनास समान वार्षिक अनुदान, "मल्लारी मार्तंड विजय" या अर्धशासकीय द्विभाषिक साप्ताहिकातून उभय भाषांना समान वाव आदि अनेक सुधारणांनी अत्रस्थ व परस्थ भाषिक समाजांत एकरूपता आणली. निकट परस्पर संपर्कामुळे जीवनराहणी व आचार-विचार यांतही आदान-प्रदान घडून त्यांच्चा इष्ट संगम झाला.

मध्यप्रदेश हा बव्हंशी हिन्दी भाषी प्रदेश आहे. तेव्हां पिढ्यानुपिढया येथे स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांनी मातृभाषा मराठीचे संरक्षण संवर्धन यथाशक्य तर केलेच, पण त्याबरोबरच हिन्दी भाषा व संस्कृती यांचेशीही एकरूप होऊन भाषिक आणि भावनिक एकात्मता सहज साकार केली यांत नवल नाही. महाराष्ट्र  साहित्य सभेनेही या दृष्टिकोनांतून प्रारंभा पासूनच विविध स्वरूपांत प्रयास केले आहेत.

सभेने मराठी बरोबरच हिन्दी, गुजराती, कन्नड, बंगाली व इंग्रजीच्या ख्यातनाम, विद्वानांची व्याख्याने वेळोवेळी आयोजित केली आहेत. 1976 त झालेल्या सभेच्या हीरक महोत्सवांत एक आंतर भारती परिसंवाद आयोजित करून, त्यांत "साहित्यांतील  अतिवास्तववाद" या तत्कालीन वादग्रस्त विषयावर इंग्रजी,वंग, गु्र्जर, कन्नड, मराठी व हिन्दी या पांच भिन्न भाषिक विद्वानांचे विचार श्रवण झाले. या शिवाय, "साहित्य जीवनाभिमुख असावे हे उद्दिष्ट ध्यानांत ठेवून स्वातंत्र्योत्तर काळांतील लेखकांनी आपली भूमिका कितपत निभावली आहे?" या ज्वलन्त विषयावर विभिन्न भाषिक विद्वानांची एक आंतर भारती व्याख्यानमालाही संपन्न झाली.

साहित्य सभेच्या वार्षिक शारदोत्सवांत पूर्वापारपासून वेळोवेळी सभेने हिन्दी नाट्यप्रयोग आयोजित केले आहेत? आंतर भारतीय कवी संमेलने भरविली आहेत. हिन्दी साहित्यिक व कलाकारांचा सन्मान-सत्कार केला आहे. या सर्वांचा परिपाक म्हणूनच की काय साहित्य सभेत साज-या  झालेल्या गोस्वामी तुलसीदास जयंतीचे अध्यक्ष, तत्कालीन शिक्षा अधीक्षक, श्री. बी.के. जोशी यांनी "मराठी भाषा असूनही अन्य भाषीयांचे कार्यक्रम आस्थेने आयोजित करणारी माझ्या पाहण्यातील एकमेव संस्था" असे स्वयंस्फूर्त प्रशंसोद्गार काढले.

निरपेक्ष भावनेने भाषिक व सांस्कृतिक आदान-प्रदानाचे हे मौलिक कार्य सतत चालू आहे. पण अन्य भाषिक संस्थांकडून उलट दिशेने प्रतिसाद व सहकार्य मिळत नाही याचा खेद आहे. तरीही निष्काम कर्मयोगाचे सभेचे हे व्रत अविरत चालू आहे व राहील.