मध्यप्रदेशीय मराठी साहित्य

केवळ  इंदूरमध्येंच नव्हे तर संपूर्ण मध्यप्रदेशांत व बृहन्महाराष्ट्रांत अग्रगण्य म्हणून मान्यता पावलेल्या महाराष्ट्र साहित्य सभेचा जन्म विसाव्या शतकाच्या दुस-या दशकांत झाला असला, तरी त्यापूर्वी मराठी भाषा व वाङमय यांच्या अभिवृद्धीसाठी प्रतिभासंपन्न व्यक्तींनी केलेले पृथक् पृथक् प्रयत्न, संस्थानाधिपतींचे साहित्यप्रेम व उदार आश्रय यांचा धांवता आढवा घेणें उदबोधक ठरेल.

उत्तर दिग्विजयासाठी निघालेल्या मराठी सेनेसमवेत अनेक कुटुंबे उत्तर भारतांत आली व ठिकठिकाणी स्थायिक झाली. मराठ्यांची परंपरा, संस्कृति अव्याहतपणे जागृत ठेवण्यात होळकर राजवंशाने महत्वाचा वाटा उचलला, त्यांच्याच कारकीर्दीत आज अनेक चळवळींचे केंद्र असलेल्या इंदूरचा विकास झाला. संस्थानी प्रजेच्या चळवळींचा इतिहास म्हणजे पर्यायानें राजघराण्याचा इतिहास हें समीकरण मान्य होण्यासारखें आहे.

मराठ्यांनी माळव्यांत पाऊल ठेवलें ते 1732 मध्यें. मल्हारराव होळकरांना येथील सुभेदारीची सनद मिळाली आणि मराठी भाषा माळव्यांत आली. तो काळ अतिशय धामधुमिचा; त्यामुळें मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मित असंभव होती. तरीदेखील मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठीं कटिबध्द शूर व कर्तबगार पुरूषांचा सातारा-पुणे दरबारशीं झालेला प्रचंड पत्र-व्यवहार म्हणजे ऐतिहासिक वाङ्मय म्हणावयास हरकत नाही.

साहस, शौर्य, सव्यसाचिव्य हे त्या काळचे अलंकार, कवींची स्फूर्तिस्थानें, महाकाव्याचे विषय. एकनाथ अण्णाजी शास्त्री जोशी करकंबकर रचित ‘’थोरले मल्हारराव होळकर सुभेदार’’ हें काव्य (प्रकाशन 1891), श्री मुरलीधर मल्हार अत्रे लिखित ‘’मल्हारराव होळकर’’ चरित्र (1812) हे ग्रंथ याची साक्ष देतात. मल्हाररावांचा खांडाभाला रजवाडी बुंदेलीखंडी कवींना उस्फूर्त करतो. सिंहा सीस नमाविया गाडर करी गलार- सब राजन सिर ओढनी तुम सिरताज मल्हार.

देवी अहिल्याबाई होळकरांचा कीर्ति-सौरभ त्यांच्या हयातींतच भारतभर दरवळला . अनेक कवी , विव्दान् त्यांच्या दर्शनासाठीं येत आणि त्यांची योग्यता पारखून बाई त्यांचा सन्मान करीत . आर्यावृत्त लोकप्रिय करणा-या मोरोपंतांचा बहुमान, कवि अनंतफंदींना केलेला मार्मिक उपदेश सर्वश्रुत आहे. अहल्याबाईंनीं करूणाष्टकें केली होती , पण जीवनलीला संपविण्यापूर्वी ती नर्मदेला अर्पण केली अशी आख्यायिका आहे. (मल्हारी मार्तंड विजय-दि. 22-6-16 लेखक: रा.ब.वि.कृ.मुळे). धर्मशास्त्र व सणवार यांची विस्तृत चर्चा करणा-या अहल्या कामधेनू या ग्रंथाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

खुशालीरामरामेण मयायं कियते मुदा अहल्याकामधेन्वाख्य: सदग्रंथो निर्णयात्मक:।। सातारा,पुणें दरबारशीं झालेल्या विस्तृत व महत्वाच्या पत्रव्यवहाराबरोबरच भारतवर्षांत निर्मिलेल्या देवस्थानांशी झालेल्या पत्रव्यवहार अवलोकन केल्यास बाईच्या राजकारणावर व धर्मकारणावर निराळाच प्रकाश पडेल. अनेक लेखकांनी स्वयंस्फूर्तीनें अहल्यादेवीसंबंधांत साहित्यरचना केली. त्यांच युरोपमधील अनेक प्रसिध्द राण्यांच्या तुलनेंत अहल्यादेवी कशा सर्वतोपरी श्रेष्ठ आहेत हें सिध्द करणारा लॉरेन्सचा ग्रंथ, आंग्ल कवयित्री मिसेस जोन्स बेली मधुर काव्य उल्लेखनीय आहेत. शिवाय वि. ना. देव कृत ‘’देवी श्री अहल्याबाई होळकर यांचे चरित्र’’, बा. ना. देव व रा. ब. पारसनीस ह्यांचे विविधज्ञानविस्तारांतील लेख, मु. वा. बर्वे लिखित ‘’देवी श्री अहल्याबाई होळकर’’ असे कित्येक ग्रंथ आहेत.

श्रीमंत थोरले यशवंतरावांची कारकीर्द अतिशय धांवपळीची, क्षणभर टेकायला उसंत नाहीं. त्यामुळे प्रत्यक्ष ग्रंथरचनेस सवड सांपडणे शक्यच नव्हते. मात्र रियासतकार रावसाहेब गो. स. सरदेसाई मालव साहित्य विशेषांकांत म्हणतात ‘’ यशवंतरावांचे सर्वच चरित्र इतकें अदभुत व ह्दयंगम आहें कीं ते सर्व व्यवस्थित व साधार लिहिलें जाईल तर अनेक कल्पित कादंब-यांस मागे टाकील……… कवि, नाटककार, शाहीर, कादंबरीकार…… यांना विषयच पाहिजे असतील तर या एका पुरूषाच्या चरित्रांतच पाहिजे तितके मिळतील.’’ रियासतकरांचे भाकीत भावी साहित्य निर्मितीने खरें केलें. वा. वा. ठाकूर कृत ‘’राजराजेश्वर श्रीमंत महाराज थोरले. यशवंतराव महाजन’’(1957),प्रा. न. र. फाटक लिखित ‘’मराठेशाहीचा अखेरचा अव्दितीय स्वातंत्र्यवीर श्रीमन्महाराज यशवंराव होळ्कर (1937),श्री ना.सं. इमानदारांची ‘’झुंज’’ ही कादंबरी, श्री वि.द. घाटे यांचे नाटक, शिवाय दु.आ. तिवारी, समर्थदास कुलकर्णी, न.शं.रहाळकर, शाहीर खाडिलकर व अमर शेख, यांची क़वनें वानगीदाखल उदाहरणें म्हणून देतां येतील.

श्रीमंत हरिराव होळकरांच्या आश्रयानें 1836 त मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर व त्यांचे मित्र नानाजी नारायण यांनी मराठींत तयार केलेले जगांतील सर्व देशांच्या रंगीन नकाशांचे पहिलें पुस्तक प्रसिध्द झालें. इंदोर इंग्लिश मदरसाची स्थापना होऊन(1843)संस्कृत व मराठी शाखा जोडल्या गेल्या. हा मराठीचा अरूणोदय ठरून वाङमय विषयक चळवळींचा पाया घातला गेला.

श्रीमंत द्वितीय तुकोजीराव होळकरांच्या कर्तबगार व शिक्षणप्रेमी श्री आर. रघुनाथराव या दिवाणबहादुरांकडे अनेक चांगल्या गोष्टींचें श्रेय जाते. सुदैवाने श्री गणेश शास्त्री गोळवळकर, रा.ब.कृ.वा.मुळये, रा.ब.वि.के.कुंटे, श्री श्रीनिवासराव यांच्या- सारख्या तरतरीत, अनुभवी व स्वामिनिष्ठ पुरूषांचा सहयोग त्यांना लाभला . स्थानिक योग्य व्यक्तींना शिकवून तयार करावे असा महाराजांचा कटाक्ष होता. याचा सुपरिणाम म्हणजे मेडिकल स्कूल, ओव्हरसियर क्लास, लॉ क्लास अशा सरकारी संस्था अस्तित्वांत आल्या. लोकशिक्षणोपयोगी व ज्ञानप्रसारक जनरल लायब्ररी ही सार्वजनिक संस्था 1852 मध्यें स्थापित झाली. मुंबई, कलकत्ता, मद्रास ही विद्यापीठें 1857 मध्यें अस्तित्वांत आली. शिक्षण विषयक विख्यात खलिता ईस्ट इंडिया कंपनीनें काढला तो 1854 मध्यें. या सर्वांच्या अगोदर किताबघराची स्थापना हा इंदूरकरांचा अभिमानाचा व गौरवाचा विषय आहें. 1875 मध्यें वेदशाळेचा शुभारंभ झाला. प्रश्नोत्तरमाला- आर. रघुनाथराव, इंदूर दंडनीति, राजशासन नियमावली, ठगाची जबानी – रा.बर्वे, मध्य हिंदुस्थानाचा इतिहास, टेंपेस्टचा मराठी अनुवाद – कीर्तने बंधू, तुकाराम, एकनाथ –मोरोपंत इत्यादी कवींवर चर्चात्मक ग्रंथ – बा. म. हंस, रूपकप्रबोध व रसप्रबोध- ब. क. माकोडे सुभेदार मल्हारराव होळकर, दादोजी कोंडदेव, छत्रपति शिवाजी – करकंबकर शास्त्री वाग्विहार – विष्णु सोमनाथ सरवटे गुरूजी, ही उल्लेखनीय साहित्यसंपदा याच कालांत निर्माण झाली. पूर्णचंद्रोदय, मालवा अखबार हीं साप्ताहिकेही प्रकाशित होऊ लागली.

सन 1885 मध्यें पुण्यास भरलेल्या ग्रंथकार – संमेलनांत श्री बाळकृष्ण मल्हार हंस यांनी विचारार्थ कांही उपर्युक्त सूचना ठेवल्या त्यापैकी कांही अशा. दक्षिणा प्राईज कमिटी सारखी मंडळे स्थापन व्हावीत व ग्रंथकारांस उत्तेजन द्यावे. त्यासांठी संस्थानिकांना भेटून साह्य मागावे. मुलांकडून मराठीचा चांगला अभ्यास करून घ्यावा. कोश व व्याकरण यांकडे सक्रिय लक्ष द्यावें . इतिहास विषयक ग्रंथांसाठी प्रयत्न व्हावा.

या कालावधींत अनेक खासगी शाळाही स्थापित झाल्या. 1867 मध्यें सरकारी कन्याशाळा सुरू झाली हें उल्लेखनीय. प्रार्थना समाज व अन्य संस्था 1875 ते भौगोलिक अंतर असले तरी भाषिक व सांस्कृतिक पातळीवर अंत:करणें एक आहेत हें सिध्द करण्याचें महत्कार्य या राजवटींने साधलें. सरकारी कामकाज मराठींत चालावें अशी ताकीद होती. राजपत्र मराठींतून निघे . त्या वेळेचे न्यायालयाचे मराठीत लिहिलेले निकाल आजही मराठी भाषेचे उत्तम नमुने म्हणून वाचण्यासारखे आहेत.

दुस-या तुकोजीरावांच्या कारकीर्दीचे वर्णन करतांना कवि मोगरे म्हणतात-

जेणें इंद्रपुरी सुरनगरीसम करून दाखविली

सल्लालनें प्रजांना माय अहल्याहि आठवूं न दिली।।

श्रीमंत शिवाजीराव होळकरांनी पित्याच्या स्मरणार्थ 1891 मध्यें महा-विद्यालय उघडलें; तेंच होळकर कॉलेज होय .याचा भरपूर लाभ व-हाड, खानदेश या भागांतील अनेक गरीब व मध्यम स्थितीतील विद्यार्थ्यानी घेतला. होतकरू विद्यार्थ्यास शिष्यवृत्ति दिली जाई.

इंदूर नरेशांनी कला साहित्य यांना उदार आश्रय दिला. अण्णासाहेब किर्लोस्कर, देवल यांच्या नाटकांस प्रोत्साहन मिळालें. श्रीमंतांनी बाणाच्या कांदबरीवर नाटक लिहिणा-यासाठी रू.1000/- च्या पारितोषकाची योजना जाहीर केली. शि. म. परांजपे, लेंभे यांसारख्या प्रथितयश साहित्यिकांनी भाग घेतला. स्पर्धेत विजयाची माळ देवलकृत शापसंभ्रमाच्या गळ्यांत पडली.

मराठी ग्रंथनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचें कार्य सवाई श्री तुकोजीराव (तृतीय) यांच्या राजवटींतही चालू राहिले. ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना झाली. श्री मल्हारी मार्तड विजय नांवाचे साप्ताहिक पत्र लोकशिक्षणार्थ सुरू झालें.

श्री केळुसरांना छत्रपति शिवाजीमहाराजाचें चरित्र लिहिण्यास  रू.23000/- ची सढळ मदत, मुकुंदराव बर्वे, अ. ना. भागवत , प्रो. ताकाखाव व प्रो. लागू, संताचे दासानुदास ल. रा. पांगारकर यांना दिलेल्या मोठमोठ्या देणग्या महाराजांच्या साहित्य प्रेमाची साक्ष पटवितात. कांही नामांकित विव्दानांची विचारप्रवर्तक व्याख्यानें देखील शासनाच्या साह्यानें आयोजित केली गेली.

अशा प्रकारें 1915 पर्यंत राजाश्रयानें व येथील सदभिरूचिसंपन्न व समाजोन्मुख विद्वान मंडळींच्या कर्तबगारीमुळें मराठी भाषेची जोपासना, ग्रंथनिर्मित, होत होती. या सर्वाना एका सूत्रांत गुंफून व्यक्तिगत प्रयत्नांना योग्य दिशा देण्यासाठीं व माय-भाषेच्या सर्वांगीण उन्नतीसाठीं कृतसंकल्प असलेल्या मध्यवर्ती संस्थेची गरज होती. तिच्या स्थापनेसाठी भूमीची मशागत झाली होती, बीजारोपणास वातावरण हळूहळू अनुकूल होत होते.