महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर

ग्रंथालय

मायभाषेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्थापन झालेल्या साहित्य सभेने 1917 जानेवारीपासून कंबर कसली व भारतीय मराठी साहित्य संमेलन अभिमानाने तडीस नेले. या संमेलनाने खर्च वजा जाता सुमारे साडे तीन हजार रूपये सभेच्या स्वाधीन केले. या रकमेचा उपयोग सभेला ग्रंथालयासाठी झाला.

सभेच्या कार्यास प्रारंभ निबंधवाचनाने, व्याख्यानाने झाला. पण याच्या पूर्व तयारीस लागणारे ग्रंथ सहज मिळेनात. इंदूरसारख्या राजधानीच्या शहरी ठळक ठळक ग्रंथ ही वाचावयास मिळूं नयेत ही गोष्ट कोणत्याही प्रकारे इष्ट नव्हती . ह्या शहराला दूषण आणणारें हें व्यंग नाहींसे व्हावे अशी तळमळ पुष्कळ दिवसांपासून इंदूरस्थ साहित्य- भक्तांच्या अंत:करणास लागली होती.

पुस्तकांचा संग्रह, तो ठेवण्यास सोयीस्कर जागा, त्याला लागणारीं कपाटें, ग्रंथालय चालविण्यास लागणारा कायमचा द्रव्यनिधि आणि कर्मचारी, इत्यादि उणीवा भरून काढण्याच्या भगीरथ प्रयत्नास सभेस लागायचे होते. लोकांस ह्या कार्याचें  महत्व, लागणारे सहाय्य व वांछित उच्च ध्येय पटवून द्यावयाचे होते. पुस्तकसंग्रह असलेल्या मंडळींच्या भेटी घेऊन ग्रंथ संग्रहालयाला सहाय्य देण्याची अभिवचनें मिळवावयाची होती.

सभेने हीं कामें तत्परतेने केली. त्या वेळचे उत्साही व कार्य- तत्पर चिटणीस ना. कृ. वैद्य यांनी साधन- सामग्री एकत्र करण्यास जोमाने प्रारंभ केला. त्याला मन:पूर्वक प्रतिसाद श्रीमंत व गरीब, लहानथोर या सर्वांनीच दिला. कांही ग्रंथ व कपाटे सुमारे हजार अकराशे रूपये किंमतीची, सभेने साहित्य संमेलन अर्थ प्राप्तीतून विकत घेतली. सुमारे तीन हजार ग्रंथ व कांही कपाटे उदार विद्याप्रेमी धनिक लोकांकडून मिळाली.

पुस्तकें देणारांत ग. कृ. देशमुख, ना. कृ. वैद्य, वा. त्र्यं. कापसे, वा. गो. आपटे, भिकाजीपंत पसरणीकर, लेले, सूर्यनारायण शास्त्री, गो.  ब. माकोडे, बा, ना, देव, बापू देव, गो. कृ. देव ही नांवे ठळकपणें नजरेसमोर येतात.

श्रीमंत सरदार किबे यांचेकडून मिळालेला ग्रंथसंभार विशेष उल्लेखनीय आहे. ग्रंथ स्वखर्चाने एकत्र केलेले व काळजीपूर्वक जतन केलेले असे होते. या ग्रंथप्राप्तीमुळे महाराष्ट्रांत इतरत्र उपलब्ध न होणारीं मासिकें, अव्वल आंग्लाईत प्रकाशित झालेली व आतां दुर्मिळ झालेली बरीच पुस्तकें हल्ली सभेच्या संग्रहालयात अभ्यासू वाचकास वाचावयास मिळतात. सामान्य स्थितीतल्या माणसाने दिलेल्या असामान्य देणगींत श्री. ग. रा. भोपटकर यांची देणगी उल्लेखनीय आहे.

दि. 17-4-18 रोजीं वार्षिक सभेत ग्रंथसंग्रहालय समिति नेमण्यात आलीती अशी :

(1) रा. ब. प्र. रा. भांडारकर (2) सरदार मा. वि. किबे (3) रा. ब. वि कृ. मुळये (4) प्रा. वा. ब. श्रीखंडे (5) ना. कृ. वैद्य (6) श्री. त्र्यं. द्रविड (7) द. भि. रानाडे (8) प्रा.ल.बा.देव (9) वा. त्रिं. कापसे  (10) वि. ह. द्रविड (11) वा. गो. आपटे (12) वि. सी. सरवटे (13) पु. के. कोतवाल (14) के. भ्. मोकाशी (15) डॉ. श्री ना. देव (16) गो. ब. माकोडे.

शेवटचे दोन सोडून बाकीचे कार्यकारी मंडळांत होते.

तत्कालीन मराठी दाट वस्तीच्या पेठांतून शेंकडो मराठी भाषिकांसमोर कार्य- कर्त्यांनी व्याख्यानें दिली; प्रमुख लोकांशी चर्चा केली. घरोघर हस्तपत्रकें वाटली, अविश्रांत श्रम केले; त्याचें सुफळ मिळालें . ग्रंथप्राप्ती झाली. उत्साह वाढला. चेतना आली. एकत्रित केलेल्या संग्रह समारंभाने लोकांसमोर सामूहिक रीत्या मांडाव याचा, दात्यांचा गौरव करायचा , त्यांने आभार मानावयाचे, या कामास हे मंडळ लागले.

वसंत पंचमी (पांच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीस) च्या शुभ मुहूर्तावर जनरल लायब्ररीच्या दिवाणखान्यांत थाटाने व उत्साहाने हा समारंभ पार पडला. सरदार श्रीमंत नारायणराव तथा बाबासाहेब बुळे हे अध्यक्षस्थानी होते. प्रेक्षकांनी सभागृह गच्च भरले होतें.  प्रत्येकाच्या चेह-यावर आत्मविश्वास होता. अंशत: तरी "व्यंग" मिटविले, या विजयाचा, कर्तबगारीचा आनंद झळकत होता. वक्त्यांचा भाषणांतून भावी उन्नतीची शब्दचित्रें उमटत होती. कांही आश्वासनें भावी अडचणी दूर होतील असें सुचवीत होती. प्रेक्षकांत तत्कालीन चीफ मिनिस्टर, मेजर रामप्रसादजी दुबे व अन्य उच्च पदाधिकारी उपस्थित होते.

उदघाटन झालें. वाचनाभिरूचि कशी वाढवावी या प्रश्नास उत्तर म्हणून डॉ. य. गो. आपटे यांनी सूचना मांडली की, ग्रंथपरिचायक समिती स्थापन करून, आठवडयांतून एकदां मराठी भाषेंत प्रसिध्द होणा-या नवीन पुस्तकांसंबंधाने एकमेकात चर्चा करावी, त्यांतील उत्तम भाग वाचून दाखवावेत म्हणजे साधारणत: नवीन पुस्तकांचा परिचय सर्वांस होईल. (20-3-23) त्याप्रमाणे प्रा. वा. ब. श्रीखंडे यांनी 17-8-24ला – “अमृत तुषार” लेखक के. म. सोनाळकर- या पुस्तकाचा परिचय सर्वांस करून दिला.

साहित्य सभेच्या ख-या ख-या कार्याचें माप “अध्ययन मंडळे” स्थापून तीं चालविण्यात आहे. आपापल्या आवडीचा विषय घेऊन त्यावर व्यासंग असणा-या माणसांचे मंडळ तयार करावें असा ह्या सभेचा ब-याच दिवसांचा हेतु होता. त्या कामी लागणारे संदर्भ ग्रंथ पुरवण्यास सभा तयार होती. 1927 त या कार्यास थोडी चालना मिळाली. प्रा.ल.बा.देव यांच्या घरी ज्ञानेश्वरीच्या अध्ययनाला प्रारंभ झाला होता. ह्याच वर्षी श्री ना. कृ. वैद्य यांच्या घरी चिपळूणकरांच्या निबंधमालेवर चर्चा झाली. चिपळूणकर मंडळ हें त्यांचे नांव. मंडळात ख्रिश्चन कॉलेजचे मराठी विद्यार्थी असत. 1927-28 त प्रा.वा. ब. श्रीखंडे यांच्याशी साहित्य सभेत “ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी” या विषयावर ख्रिश्चन व होळकर कॉलेजातील विद्यार्थ्यांनी विचार-विमर्श केला.

पुस्तकांची यादी तयार करण्याकरिंता 2-11-24 ला कारकूनास पारिश्रमिक म्हणून पन्नास रूपये मंजूर केलेले दिसतात. तसेच 15-8-26 ला फाटलेल्या , निरूपयोगी पुस्तकांच्या याद्या झाल्या. कपाटाकरतां दीडशे रूपये स्वीकृत झाले.

जनरल लायब्ररी व साहित्य सभेचा जोड संसार एकाच इमारतीत चाले. साहित्य सभेच्या ग्रंथालयामुळे कपाटे खुर्च्या वाढल्या. सभा दुहेरी झाल्या. जागा पुरणार कशी ? स्वाभाविक परिणाम असा की कार्य व्याप विस्तारण्याऐवजी कमी होऊं लागला.

1927 त सभेने तोफखान्यातील फडणीस वाड्यात बि-हाड केले. असलेला ग्रंथसंग्रह वाचनासाठी उपलब्ध करणे आवश्यक होते. ग्रंथसंग्रह फडणीस वाड्यात आणून तपासणी करण्यासाठी प्रा.वा.गो. ऊर्ध्वरेषे व वि.ल. नामजोशी यांनी एक महिन्यात अहवाल सादर करावा असें ठरलें ; ग्रंथोत्तेजक मंडळाकडे असणारी व येणारी पुस्तकें सभेस द्यावी असें ठरलें ; त्याप्रमाणें 310 पुस्तकें मिळाली (21-9-28) परंतु अपेक्षेप्रमाणें पुस्तकांची तपासणी पूर्व झाली नसावीसे दिसते ; कारण 6-3-29 ला पुन्हा ह्याच कार्यांसाठी प्रा.ल.बा. देव , सी.का.देव व वि.ह.आपटे ह्यांचे मंडळ नेमले. 28-1-30 ला ग्रंथलयासंबंधी एक योजना बनवून रा.पु.के. कोतवाल, प्रा.वा.ब. श्रीखंडे याच्या संमतीसह ती मांडावी असें ठरलें. योजना तयार झाली व ग्रंथालय उद्घाटनाचा समावेश वार्षिक सभेच्या कार्यक्रमांत ठरले (26-2-30). सहा एप्रिल एकोणिसशे तीस ला ग्रंथालय उघडल्याचे जाहीर झाले. त्यावेळी ग्रंथालयाचे नियम किती सवलतीचे होते, हे बघण्यासारखे आहे. “तीन रूपये डिपॉझिट ठेवल्याशिवाय ग्रंथ देऊ नये हा नियम एक वर्षाकरिता व एक पुस्तक घेणाराकरिता लागू करू नये. एकाहून अधिक ग्रंथ घेणारास लागू करावा.”

कांही पुस्तकें काढून टकण्यासारखी किंवा इतरत्र वाटण्यासारखी होती. अशा  पुस्तकांची केलेली यादी तपासण्याकरितां प्रा.ल.बा.देव, शं. सी. सरवटे व चिटणीस वि. ह. आपटे यांची समिती नेमली. याच समितीने संदर्भ ग्रंथांची व नवीन विकत घ्यायच्या पुस्तकांची यादी करायची होती. टाकाऊ पुस्तकांपैकी 342 इतर वाचनालयास व , 165 पुस्तकें विकण्यास काढावी, न विकली गेल्यास फुकट इतर ग्रंथ संग्रहालयात द्यावी व 121 पुस्तकें परत सभेच्या रजिस्टरवर घ्यावीत असें ठरलें. (27-4-1930)

श्रीमंत सौ. इंदिरा मासाहेबांच्या कारखानदारांकडून आलेल्या पत्राप्रमाणे सभेचे प्रतिनिधी मंडळ श्री वा.वा. ठाकुरांस भेटले. (4-11-30) मासाहेबांनी ग्रंथ खरेदी करिता दोनशे रूपये दिले. ही देणगी प्रामुख्यानें अभ्यासकांच्या उपयोगी पडतील अशा प्रकारच्या विशिष्ट ग्रंथकारांच्या ग्रंथाचे संच (sets) खरेदी  करण्यासाठी मिळालेली आहे हे सांगीतले म्हणजे दात्याच्या योजकतेबद्दल साभिमान आनंद बाटतो. श्रीमंत महाराणी साहेबांस कळविले कीं समर्थं वाङ्मय संच व अन्य पुस्तके देणगीतून घेतली.

श्री वि.ह. आपटे यांच्या अभ्यास मंडळाच्या योजनेस व्यवहार्थं रूप देण्यासाठी रा.ल.बा.देव, सी.का.देव व वि.ह.आपटे यांची निवड झाली (15-6-31)

श्री शं.सी. सरवटे व श्री शं.वा. पंडित यांनी ग्रंथलयाच्या पुनर्रचनेविषयी योजना तयार केली .ग्रंथ किती आहेत , कोणाकडून किती ग्रंथ यायचे याची माहिती त्यांनी काढावी असे ठरले. (21-7-35). ग्रंथ तपासण्याचें व मोजणीचें काम जिकीरीचें असतें ; तरी ते सतत करावे लागते. 30-6-36 ला पुस्तकालयाची नीट तपासणी करून जी पुस्तकें सापडत नसतील त्यांची यादी पूर्ण तपशीलवार तयार करून ती कार्यकारी मंडळापुढे श्री मा. स. रावेरकर यांनी ठेवावी असे ठरले.

संध्याकाळनंतर सकाळ, निराशेनंतर आशा, अशा घटना घनांधकारांत वनांत दिवा दिसावा तसा आनंद देतात. सभेचे 1937-38 चे व्दिवार्षिक वृत्त ग्रंथालयाची उणीव भरून काढणारे, त्याच्या आशा आकांक्षा वाढीस लावणारे असे लाभले. कसे ते पहा. मराठी साहित्य समालोचन हा ग्रंथ श्री वि.सी. सरवटे व सहायक श्री सी.ना. गवारीकर यांनी श्रीमंत महाराणी इंदिरामासाहेबांस नजर केला. मासाहेबांनी समालोचनाचे अवलोकन केल्यावर 11-3-38 ला लेखक द्वयास भेटीस पाचारिले. ग्रंथ-लेखक कौशल्य पाहून संतोष व्यक्त केला. श्री वि.सी. सरवटे यांनी श्रीमंतांस सभेची सर्व हकीकत निवेदिली. द्रव्याभावी सभेचे सर्व कार्य स्थगित होत आहे असें विनम्रपणें श्रुत केले. त्या बरोबर श्रीमंतांनी द.म. 250रू. (अडीच शेच्या) हप्त्याने अडीच हजार (2500रू.) रूपये सभेच्या ग्रंथसंग्रहालयांत ग्रंथ घेण्यास व ते ठेवण्यास लागणारी कपाटें खरेदी करण्यास देणगी म्हणून देण्याचे अभिवचन दिले. ग्रंथ खरेदी करण्यापूर्वी त्यांची यादी श्रीमंतांकडे अवलोकनार्थ पाठवावी. नवीन विकत घेतलेल्या ग्रंथांचा परामर्ष “मालव साहित्यात” घेतला जावा इत्यादि सूचना केल्या. या उदार देणगीबद्दल ग्रंथलेखकांनी श्रीमंतांचे ऋण व्यक्त केलें. सभेचे ग्रंथालय म्हणाले असेल “गतं दु:खं, गतं दारिद्रयम्, आगता सुखसंपदा.” हा इंदिरेच्या दर्शनाचा प्रभाव !

या देणगीतून ग्रंथ विकत घ्यावे म्हणून कार्यकारी मंडळाने (1) श्रीवि.ह.आपटे  (2)ना.र.नेवासकर  (3) ना.कृ.वैद्य (4)सी.ना.गवारीकर (5)भा.गो.गवारीकर आणि (6)मा.स.रावेरकर अशा सहाजणांची समिति नेमली. त्या समितीने निवडक ग्रंथांच्या याद्या केल्या. कार्यकारी मंडळाने ठरविल्याप्रमाणे त्या याद्या मुंबईच्या कोणा श्री अधिकारी यांजकडे पुस्तकें पुरवावी म्हणून पाठविल्या. पण श्री अधिकारी यांनी पुस्तकें पाठविली नाहींत. शेवटी डिसेंबर 1938 मध्ये अध्यक्ष श्री वि.सी.सरवटे व चिटणीस श्री मा.स.रावेरकर मुंबईस गेले. 1015 रू. ची 849 पुस्तकें विकत घेतली. भावाच्या व कमिशनच्या दृष्टीने ही खरेदीची पध्दत सभेस लाभदायक ठरली.

सन् 1939 त वरील ग्रंथ निवड समितीने ठाणे  ग्रंथसंग्रहालयांतील ग्रंथांची यादी मागविली. त्याची तुलना सभेतल्या विद्यमान पुस्तकांशी केली. त्यातून ग्रंथालयांत नसलेल्या पुस्तकांची यादी केली व या यादिळा अनुसरून ग्रंथ मागविण्याची व्यवस्था केली.

याच वर्षी  सभेत असलेल्या ग्रंथ संपत्तीचा लाभ मराठी महिलांस व्हावा म्हणून “स्त्री” विभाग उघडला. विजया दशमीच्या सुमुहूर्तावर तो सुरू केला. महिलांच्या सोयीप्रमाणे स्त्री ग्रंथपाल नेमली. दुपारची 1 ते 4 ही वेळ निश्चित केली . त्यांच्या साठी ग्रंथ नि:शुल्क दिले, ही शाखा वनिता वर्गास विदित व्हावी म्हणून भरपूर प्रचार –कार्य केलें. या शाखेंचें 1940 चे वृत्त आशाजनक तर 1941 चें निरूत्साही वाटते. कालांतराने या व्यवस्थेची आवश्यकता नाही असें वाटू लागलें. कारण स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने ग्रंथालयात येऊ लागल्या व ग्रंथ नेऊ लागल्या .अर्थातच आता त्यांच्यासाठी वेगळा विभाग वा नियमही नाहीत.

इंदूरचे प्रसिध्द इतिहास –संशोधक, चिकित्सक टीकाकार श्री बा.ना. देव व साहित्य सभेचे एके काळचे उपाध्यक्ष आणि “मालव साहित्य “ चे संपादक ल.बा. देव यांचे स्मरणार्थ  1939 त मा. ब. देवांनी ग्रंथालयास एक हजार रूपये किमतीचे 778 ग्रंथ, एक कपाट व कोच ही भरधोस देणगी दिली. या बहुमूल्य देणगीबद्दल सभा त्यांची ऋणी आहे.

किती ग्रंथांची देवघेव वृत्त-वर्षांत झाली व तिचें सरासरी प्रमाण , प्रति दिवशी किती पुस्तकें दिली घेतली जातात हें 1939 पासून प्रसिध्द होऊ न ह्या वर्षी 1939-40 त हें प्रमाण 19.32 होते. पुढे 1943 त 23.17 झाले.

1938 ते 43 पर्यंत 1217 ग्रंथ देणगी म्हणून मिळाले. एवढया अवधींत ग्रंथ खरेदीवर 2290 रू. खर्ची पडले. 1922 च्या 80रू. नंतर 1943 च्या वृत्तांतात बाइंडिंग खर्च प्रथमच उल्लेखिलेला दिसतो.

1944 साली विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे श्री वि.पां. माटे यांची ग्रंथालयास 250रू. किंमतीची त्यांच्या संग्रहातील उत्तम व निवडक ग्रंथांची देणगी दिळी ही होय. श्री वि.पां. माटे हे सभेबद्दल जिव्हाळा व कळकळ बाळगणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या चिरंजीवास- वि.वि.माटे यांस – नियमानुसार आजीव सभासदत्व सभेने  दिलें.

1945-46 व 47 त ग्रंथालयाची तपासणी चालू होती. प्रारंभी ती ग्रंथपाल श्री मो. गो. वाळिंबे यांनी केली. तीत प्रत्यक्ष पुस्तकें व देणगीच्या, विक्रीच्या याद्या यांत फार फरक दिसून आला. पुन: पुन: पुन्हा केलेल्या तपासणीत फरक येई व तोही ग्रंथांची सर्व साधारण आधारभूत यादी तपासणीला फार आवश्यक असते. अशी यादी तयार करण्याचें काम हाती घ्यावे लागले. तें 1947 त पूर्ण झालें.

1944 ते 1953 या दशकात 884 नवीन पुस्तकें विकत घेतली गेली, तर 686 देणगीत मिळाली. पुस्तक देवघेवीचे दैनिक प्रमाण न्यूनतम 12 तर अधिकतम 24 होते. याच दशकात ग्रंथालय तपासणीदारास जाणीव झाली की ठाणे किंवा मुबंई ग्रंथसंग्रहालयाच्या तोडीस आपले संग्रहालय आणावयास वर्गंणी व वाचक वाढले पाहिजेत. “दातारो नोडभिवर्धताम्”  अशी प्रार्थना अविरत चालू असली पाहिजे.

1954-6 3 कालात सभेस 786 पुस्तकें देणगीने, तर 270 ग्रंथ किमतीने मिळाले. देवघेवीची सरासरी किमान 28, तर कमाल 63 दिसली. ग्रंथालय सरासरी 278 दिवस वाचकांकरिता उघडे राहिले. बांधीव मासिके, दिवाळी अंक यांची भर एकंदर ग्रंथसंख्येत पडलेली ठसठशीतपणे दिसते.

1964-68 या दरफयान सभेला 738 पुस्तकांची देणगी मिळाली. सभेने 1502 पुस्तकें विकत घेतली. देवघेवीचें प्रमाण 64 वरून घसरलें व 46 पर्यंत आले. कारण सभेच्या उत्तरेकडील भाग बांधला जात होता. ग्रंथालय अन्यत्र न्यावें लागलें. वाचकांच्या सोयीत कमीपणा आला. उपस्थिति घसरली.

1969-74 या अवधीत 1337 ग्रंथ खरेदी केले. व 285 ग्रंथ भेट स्वरूप प्राप्त झाले. सर्वच देणगीदारांची सभा आभारी आहे. घनश्यामदास सांघी मेमोरियल ट्रस्ट कडून मिळालेली देणगी विशेष उल्लेखनीय आहे. 1974 अखेर सभेजवळ एकंदर 18039 ग्रंथ आहेत. ग्रंथालय कार्याचे दिवस 72-73 या वर्षांत सर्वात अधिक दिसतात-295. ह्याच वर्षांत दैनिक देवाणघेवाणीचे सरासरी प्रमाण 102 आहे.

पुस्तकें नेण्यासाठी अग्रहक्क नोंदणीची प्रथा सुरू केलेली आहे. तिचा लाभ सभासदाजवळ पुस्तके अधिक दिवस राहू नयेत व इतरांची गैरसोय होऊ नये म्हणून विलंब शुल्क योजना अमलात आणली असून तिचा योग्य परिणाम दिसू लागला आहे. पागनीसपागा, पळशीकर कॉलोनी व वासुदेव नगर येथील वाचकांच्या सोयीसाठी ग्रंथालयाची एक शाखा सुरू केली आहे. शाखा प्रमुख आहेत सौ ताराबाई फडणीस.

दामकरी काम हे खरें. पैसे असले की पुस्तकें घेता येतात. पण दातृत्व ग्रंथालयात विक्रीच्या जवळ जवळ 1/2 तरी भर टाकते – “दाता भवति वा न वा” असें म्हणतात. सुदैवाने इंदुरास तशी वाण नाही. वाढती लोकसंख्या अधिक निवारा अडगळ काढतो, अशा अडगळीतले ग्रंथ सभेत न शिरोत अशी दक्षता जशी दात्याने तशी सभेच्या कार्यकर्त्यांनी बाळगण्याची आवश्यकता आहे.

“जलबिंदुनिपातेन क्रमश: पूर्यते घट:” या उक्तीप्रमाणे 1934 ते 74 या कालखंडात जवळ-जवळ 35000रू. किंमतीची पुस्तकें खरेदी केलीं. ग्रंथालयाचीं पुस्तकें अनेक हातातून जातात. सर्वांच्या ब-या वाईट सवयींचा परिणाम पुस्तकाला भोगावा लागतो. कोणी त्याला चिरतो. फाडतो, कापतो. क्वचित कुणी पुठ्ठा चढवतो. “ कष्टेन लिखितं ग्रंथ यत्नेन परिपाल्यताम्” ग्रंथकाराची ही विनवणी किती वाचक लक्षांत ठेवतात ?

अशी चिरफाड झालेली पुस्तकें बांधवावी लागतात. आजपर्यंत सभेने या बांधणावळीवर अजमासे 2000रू खर्च केळे आहेतयात एवठया रकमेचा खर्च कमी होऊ शकतो. तेवढी रकम नवीन ग्रंथ खरेदीस उपयोगी पडू शकते.

ग्रंथालयातील ग्रंथांची कामचलाऊ वर्गवारी झाली आहे. डयुई दशांश पध्दतीने सशास्त्र वर्गीकरण होणे अभ्यासकांना उपयोगी पडेल. शं.ग. दाते कृत ग्रंथसूची या बाबतीत विशेष मार्गदर्शक होईल. प्रतिवर्षी ग्रंथालयाची तपासणी झाली, तर असलेले ग्रंथ दिसतील, नसलेल्यांचा सुगावा लागेल. पिच्छा पुरविता येईल. नुकसान घटविता येईल!

बाल वाचनालय

ग्रंथालयाला स्त्री विभाग जोडायची सभेची कल्पना मूर्त स्वरूपांत आली. स्त्रियांच्या अडचणी लक्षांत येऊ लागल्या. मातांबरोबर त्यांची लहानगी दिसू लागली. सभेच्या आवारात मुलांना स्वतंत्र रमण्याकरतां साधने हवी असें वाटू लागलें. साधनें घ्यायची तर पैसा हवा. साधनांचा उपयोग शिकविणारी व्यक्ती हवी. तिला पगार द्यायला पाहिजे. हे सर्व घडायला मुलांचा विकास इच्छिणारा उदार दाता हवा.प्रयत्नांनी तो मिळेल ही आशा.

"यादृशी भावना यस्य, सिध्दीर्भवति तादृशी". श्री. वा. गो. आपटे यांच्या ट्रस्टमधून ही व्यवस्था होण्याची चिन्हें दिसू लागली. श्री. वा. गो. आपटे यांचा इंदूरचा ऋणानुबंध असा आहे. इंदोर इंग्लिश मदरशात ते श्री. के. दा. पुराणिकांचे सहाध्यायी. ख्रिश्चन  कॉलेज, इंदूर यातून झाले. नागपूरहून बी.ए. इतके तरबेज नसतात, अशी तेथली समजूत त्यांना बेचैन करूं लागली. त्यांचे बंधु श्री. दत्तोपंत हे श्रीमंत शिवाजीराव होळकरांच्या कन्यांस शिकवीत होते. त्यांनी आपल्या जागी वा. गो. आपटे यांना टयूटर नेमवून दिले. पुढे वासुदेवरावांची नेमणूक इंदूर संस्थानच्या इतिहास कार्यालयात झाली. नंतर ते पुण्यास गेले. तेथून परतल्यावर चंद्रावती महिला विद्यालयात शिक्षक नेमले गेले. 1915 त "मल्लारि मार्तंड विजय" साप्ताहिकाचे ते मुख्य संपादक होते. महाराष्ट्र साहित्य सभेच्या आद्य संस्थापकांपैकी एक व तिचे पहिले चिटणीस होते. 1917 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य चिटणीस होते. त्यांनी मराठी साहित्यात बालवाङ्मयाचें दालन उघडलें. बालांचे ते प्रिय नायक झाले. बाल साहित्यावरच्या  कमाईचा त्यांनी ट्रस्ट केला.

ह्मा ट्रस्टीजपैकी एक श्री. के. दा. पुराणिक उर्फ तात्यासाहेब हे होते. ते साहित्य सभेचे अध्यक्ष होते. त्यांनी विश्वस्तांच्या लक्षांत हा ऋणानुबंध व सभेची ही सदिच्छा  आणून दिली. विश्वस्तांनी बाल बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी रू. 500ची देणगी 1940 त दिली. त्यातून 364 रू. ची 259 पुस्तकें विकत घेतली. 5 ते 12 वर्षांच्या मुलांकरता सायंकाळी 5 ते 7 पर्यंत हें बाल वाचनालय  उघडे राहू लागले. एका शिक्षिकेची नियुक्ति केली. सभेच्या वर्गणीदारांची 25-30 मुली मुलें प्रविष्ट झाली. त्यांच्याकरता 400 पुस्तके 5 मासिके, 1 पाक्षिक घेतले. सभेत आनंदी मुलांचा राबता सुरू झालां. मनोवांछित फलास येऊ लागलें.

1944 तच श्रीमंत सौ. इंदिरा मासाहेब होळकर यांनी सभेस भेट दिली व बाल वाचनालयास ग्रंथखरैदीकरतां 101 रू. ची देणगी दिली.

1945 त "वस्तू वाटे नवी जो नवल बहुतची लोक रीती अशी" हे नवल मंदावले. उपस्थिति रोडावली. कां वरं असं? याचा शोध घेतला. बालोध्दार मंडळ नंदलालपुरा व बाल निकेतन स्नेहलतागंज येथे केंद्रे उघडलीं. बालोपयोगी साहित्य विभागावे लागले. पण उपस्थिति वाढली. हस्तकौशल्याचा व खेळांच्या साधनांचा मुलामुलींना उपयोग होईल. त्यांचीही सोय करावी असे वाटत होते. पण पुरेस पैसा नव्हता.

1947 उपस्थिति सुधारली. सरासरी 48 मुलें केंद्राचा फायदा घेऊ लागली. 53 नवीन पुस्तके घेतली. "आनंद" , "मुलांचे मासिक", "बाल सन्मित्र" अशी नियत कालिके मागविली. रामबाग, इमली बाजार, जुने इंदूर येथे नवी केंद्रे उघडली. 1953 पर्यंत केंद्राची संख्या 11 झाली. बालरूचिवर 50 रू. ची पुस्तकें घेतली.

1949-53 पासून वा. गो. आपटे स्मृति दिन बाल संमेलनाच्या रूपात सुरू झाला. मुलें गोष्टी सांगतात. नाट्यछटा तोंडपाठ म्हणतात, गाणी गातात, नृत्य करतात. मनोरंजक लहान लहान प्रसंग नाट्य रूपात वठवतात, नकला करतात. अशा संमेलनांना मुलांची कळवळ बाळगणारे अध्यक्ष लागतात व ते लाभतातही. जसे नई दुनियाचे संपादक श्री राहूल बारपुते, हायस्कूल हेड मास्तर श्री. कृ. वा. टिल्लू, श्री गं. के. शिराळकर व बाल विकासाला वाहून घेतलेल्या सौ. शालिनीताई मोघे.

सेठ जगन्नाथ नारायण, प्रशांत विश्रांति गृह, आदर्श भोजनालय हे स्वखुशीने मुलांना खाद्य पेय पुरवीत असत. मुलांना उपयोगी पडतील, रूचतील अशी मासिके, पुस्तकें प्रौढांकडून प्राप्त होऊ लागली.

1954-63 त केंद्र-संख्येत उतार-चढाव दिसतो. अधिकात अधिक 11 तर कमीत कमी 4. पण पुस्तकांच्या देवाण घेवाणात स्थिरता वाढली. सर्व केद्रें मिळून दररोज 125 मुलें वाचावयात येत.

लहान मुलांना पुस्तकें कशी वापरावी हें जर समजलें व आचरणात आणले तर पुस्तकें अधिक टिकतील. या दशकांत जुनी फाटलेली पुस्तकें रद्द करावी लागली. नवी घेतली. त्यात विशेष म्हणजे हिंदी बाल साहित्य सोहळा साजरा होऊ शकला नाही. श्री ह. र. पांढरकर, डॉ. सौ. शशिकलाबाई माईणकर, अशा विविध क्षेत्रांत ठळकपणे कार्य करणा-या व्यक्ती अध्यक्षपदीं लाभल्या. सर्वांनी आपापल्या दृष्टीकोनांतून कै. वा. गो. आपटे यांचे शब्दचित्र रंगविले. या दशकात मातृवर्गाचें नेतृत्व मुलांच्या समारंभास लाभलें हा सुयोगच म्हणायचा !

1964-74  पर्यंत केंद्र-संख्या उतार-चढावावर आहे. मध्यंतरी सभेच्या बांधकामामुळे गतिरोध येऊ पाहत होता. तथापि अवरोधाला तोंड देऊन कार्य चालूच होते. अन्य केंद्र कार्यावर याचा परिणाम झाला नाही. या वर्षांत सौ. निर्मला बाई फडणीस, सौ. शुभद्राबाई काशीकर (नागपूर), सौ. मुसळे, सौ. मैनाताई गोखले, सौ. शालिनीताई मोघे यांनी स्मृतिदिन सभारंभाची  धुरा वाहिली. सर्वांनी बालकांच्या कायिक वाचिक मानसिक व चरित्र संवर्धनाची जबाबदारी पालकावर आहे, ते सुधारले तर राष्ट्र सुधारले असे पालकांस कळकळीने सांगितले.

16-1-72  ला श्री. वा. गो. आपटे जन्मशताब्दी या विभागाने साजरी केली. अध्यक्षा होत्या सुप्रसिध्द लेखिका सौ. लीला श्रीवास्तव. त्यांनी मार्मिक शब्दांत दिवंगत आत्म्याबद्दल आदरभाव व्यक्त करून बालसुलभ भाषेत उपयुक्त माहिती दिली. मा.स. रावेरकरांनी आपल्या भाषणात वा. गो. आपट्यांच्या जीवनांतील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. पुण्याच्या आनंद मासिकानें प्रसिध्द केलेल्या विशेषांकांत श्री प्र. गो. घाटे यांनी "कै. वा.गो. आपटे-चरित्र व कार्य" असा परिचयपर  लेख लिहिला.

बालोपयोगी अशी अंदाजे 2300 पुस्तकें सभेत आहेत. नियतकालिके व त्यावर होणारा खर्च वेगळाच.

साहित्य सभेचे केंद्र निरीक्षक श्री कृ.मे. दीक्षित होते. सभेबाहेरच्या केंद्राच्या व्यवस्थापिका महिला असतात. मनोरंजन कार्यक्रमाचा भार प्रामुख्याने श्री कृ. मे. दीक्षित वाहायचे. कार्यकारी मंडळातील स्त्री सदस्यांपैकी एक शाखेच्या प्रमुख असतात. इतर केंद्र व्यवस्थापिका मनोरंजन कार्यक्रमात सहभागी होऊन कृ.मे. दीक्षितांना सहाय्य करतात. उत्सवाच्या शेवटी या शाखेस 100 रू. आपटे ट्रस्टकडून मिळतात असे कृतज्ञतापूर्वक उल्लेखिले जाते, त्या वेळी ट्रस्टी के. दा. पुराणिकांचे स्मरण झाल्याविना राहत नाही.

वाचनालय

साहित्य सभेच्या प्रांगणांत नियतकालिकें येण्यासाठी अभ्यास व ज्ञानप्रसार ही प्रेरक कारणें उपयोगी ठरली. परंतु प्रारंभ कालांत अशा नियतकालिकांच्यासाठी अर्थसंकल्पामध्यें तरतूद नव्हती. साहित्य सभा इंदूर ग्रंथालयात होती. तेथली नियतकालिके तात्पुरती नड भागवीत असावीत. नियतकालिके वाचली जात होती. त्यावर चर्चा होत होती हे साहित्य सभेच्या कार्यकारी मंडळाच्या 20-3-23 च्या बैठकीच्या वृत्तावरून दिसते. श्री वि.सी. सरवटे यांनी या बैठकीत सुचविले की, निरनिराळया मासिकातून येणा-या लेखांची विषयावर यादी करावी, चालू मासिकात जे लेख येतात त्यांचें वाचन करावे, परस्परांस त्यांची माहिती द्यावी. त्यासाठी कोणी कोणती नियतकालिके वाचावी तें ठरविण्यात आले. ते असे:-

1) विविध ज्ञान विस्तार - श्री ना.कृ. वैद्य
2) तत्त्वज्ञान मंदिर - श्री वा.ब. श्रीखंडे
3) चित्रमय जगत - श्री वा. त्र्यं कापसे
4) नवयुग - श्री रा.ह. मणूरकर
5) भारत इतिहास संशोधन (त्रैमासिक) - श्री अ.ना.भागवत
6) मनोरंजन - प्रा.वा.गो.ऊर्ध्वरेषे
7) मॉडर्न रिव्हयू - श्री वि.सी. सरवटे
8) हिंदुस्तान रिव्हयू - श्री वा. गं. आपटे

दि. 20-9-27 च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सभेने कोणकोणती मासिके मागवावीत याची यादी करण्यास श्री वा.वा. ठाकूर व प्रा. वा. गो. ऊर्ध्वरेषे यांना सांगितले. याचें कारण म्हणजे साहित्य सभा फडणीस वाडयात गेली व इंदूर ग्रंथालयाचा सहकार दुरावला.

सन 1929 पासून “मालव साहित्य” त्रैमासिक रूपांत अस्तित्वात आले. त्याच्या भेटीच्या मोबदल्यात चार त्रैमासिके, 120 मासिके, 1 पाक्षिक, 7 साप्ताहिके, 3 द्विसाप्ताहिके अशी एकूण 135 नियतकालिकें व वर्तमानपत्रें येत असत. सभा एकाही पत्राची किंवा मासिकाची वर्गणीदार नव्हती, असे 1935 च्या सभेच्या अहवालात म्हटले आहे.

मालव साहित्याची अस्थिरता व अनियमितता परत भेटीस येणा-या मासिकास, वृत्तपत्रास जाणवू लागली. 1937 त 35 नियतकालिकांची संख्या 16 वर आली.

याच वर्षी मालव साहित्याने मासिकाचे रूप घेतलें. सभेच्या 1937-38 च्या वृत्तवर्षांत नियतकालिकें व वृत्तपत्रांची संख्या पुनश्च 35 वर गेली. यांत एक दैनिक "दी टाइम्स ऑफ इंडिया" हें होते. सन 1939 त ही संख्या 29 झाली. मासिक "मालव साहित्य" विराम पावलें.

मालव साहित्यामुळे अशा प्रकारे वाचनालय वाढले, हें जितकें खरें, तितके च साहित्य सभेकडून मिळणा-या आर्थिक सहाय्यामुळे तें टिकू शकले हें ही खरें. सभा सामान्यत:150 रू. प्रतिवर्षी मालव साहित्यास देई. त्यांतील 50 रू. ची येथेच मिळणारी मासिके व वृत्तपत्रें सभेने ध्यावीत व वाचनालय उपयुक्त आणि आवश्यक म्हणून चालू ठेवावे असे ठरविले. या रकमेत बावीस नियतकालिके व वृत्तपत्रें येऊ लागली. 1940 या वर्षापासून अंदाजपत्रकात व्ययाच्या बाजूस वाचनालयास अढळ स्थान मिळाले.

प्रयोग म्हणून वार्षिक रू. 50 पासून प्रारंभ झाला व तो चौपटी पर्यंत 1951 त पोहोचला, ही आनंदाची गोष्ट आहे. पण पुढील दशकांत याहून अधिक प्रगति झाली. वाचनालयावरचा व्यय 1956 त रू. 231,तर 1960-61 रू 547 म्हणजे अकरा पट झाला. 61-62 पासून 67-68 पर्यंत सरासरी 700 रू. वार्षिक खर्च म्हणजे मूळच्या चौदा पट झाला ! सन 1940 ते 68 पर्यंतच्या काळांत वृत्तपत्रांत व नियतकालिकांत सभेने 8500 रू. खर्च केले आहेत.

1974 अखेर वाचनालयात दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके व त्रैमासिके मिळून 64 नियतकालिके येऊलागली आहेत. कांहीं स्थानिक हिंदी वृत्तपत्रे निघतात, ती सभेत येतात. त्यामुळें अन्य भाषिकही वाचनालयाचा लाभ घेतात.

अलीकडे दहाबारा वर्षांत दिवाळी अंक निघू लागले. विविध मराठी मासिके निघूं लागलीत. वाचकांना ती आवडूं लागली. सुमारे 150 दिवाळी अंक वाचनालयासाठी विकत घेण्यांत येतात. वाचनानंतर ते बांधले जाऊन  ग्रंथालयात प्रविष्ट होऊं लागले. ग्रंथसंख्येत वाढ होऊं लागली. वाचनालय नि:शुल्क, मुक्तद्वार आहे. वाचकांस दिवसेंदिवस हवेशीर, उजेडाचे, खुर्च्या, टेबल, बाक अशा फर्नीचरने सुसज्ज, आकर्षक, नूतन स्थान बसावयास देण्यात येत आहे. वाचक-संख्या वाढत आहे. वाचनाभिरूची वाढीस लागल्याने आपुलकी निर्माण होते.

सांप्रत सभेच्या मुक्तद्वार वाचनालयावर प्रतिवर्षी सुमारें दोन हजारे रूपये खर्च करण्यांत येतात ; त्यामुळें वाचकांची खूपच सोय झाली आहे. सुटीच्या दिवशींही वाचनालय चालू असते हें विशेष.

भावी आशा आकांक्षा

महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरचे पूर्वसूरींनी लावलेले रोप निष्ठावंत कर्मठ कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांनी कसे फोफावत व विस्तार पावत गेले त्याच्या गत साठ वर्षांच्या अभिमानास्पद वाटचालीचा हा परिचय  आतांपर्यत घडविला आहे. पण प्रगती आणि विकास  ही समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक अशी  निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संस्थाही याला अपवाद नाही. सांचलेले पाणी कालांतराने दूषित होते, तसेच गतिरोध हा संस्थेच्याही प्रगतीला मारक ठरतो. म्हणून समाजधुरीण व संस्थेचे कर्णधार यांनी त्याच्या  विकासासाठी भावी उद्दिष्टें आणि त्यांच्या पूर्तीसाठी योजना सतत जनमानसासमोर ठेवणें उचित आहे. या दृष्टिकोनांतून साहित्य सभेने योजलेल्या, जोपासलेल्या कांही आशाआकांक्षांचा येथे उल्लेख करणे प्रसंगोचित आहे.

महाराष्ट्र साहित्य सभा इंदूर ही मध्यप्रदेशांतील मराठी भाषिकांची सर्वांत मोठी व अग्रेसर संस्था आहे. पण एवढ्यानेच समाधान मानणे योग्य नाही. ही सभा केवळ इंदूरवासी मराठी भाषिकांचीच न राहतां, ती संपूर्ण मध्यप्रदेशांतील मराठी भाषिकांची साहित्यिक व सांस्कृतिक गरज भागविणारी प्रातिनिधिक बृहत् साहित्य सभा होण्याचा गौरवशाली बहुमान तिने प्राप्त केला पाहिजे. त्यासाठी परस्पर संपर्क, परस्थ साहित्यिकांचे कार्यक्रम, संयुक्त मीलन कार्यक्रम, मध्यप्रदेशीय साहित्य व कवी संमेलने, नाट्य व विविध प्रादेशिक स्पर्धा आदि प्रयास व आयोजन सतत झाले पाहिजेत.

साहित्य सभेचे ग्रंथालय सर्वांगीण मराठी साहित्याने समृध्द, परिपूर्ण व अद्यावत् असावे. त्यांत मराठीचे उच्चतम अध्ययन व अध्यापन आणि संशोधन यासाठी उपयुक्त संपूर्ण साहित्य व संदर्भ ग्रंथ याबरोबरच सुसज्ज अध्ययन कक्षाचीही सोय असावी. प्रगतिशील विचार, चर्चा व चिंतन यांना पोषक अशी अभ्यास मंडळें निर्माण केली पाहिजेत. मेधावी गरजू मराठी भाषी विद्यार्थ्यांसाठी छा़त्रवृत्ती आणि पुस्तक संचयिका स्थापना कराव्या. मध्यप्रदेशांतील मराठी भाषी विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांत मायभाषा मराठीच्या शिक्षणाच्या कांही समस्या व अडचणी आहेत. त्यामुळें मराठी विषय घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसानुदिवस रोडावत आहे. म्हणून त्या अडचणीवर योग्य उपाय शोधून, विद्यार्थ्यांस मराठी विषय घेणे सुकर होईल असे प्रयत्न सभेकडून झाले पाहिजेत. यथाशक्य सर्व मराठी नियतकालिकें व त्यांच्या वाचनासाठी उपयुक्त फर्नीचर यांनी सुसज्ज वाचनालय असावे. बालकांची अभिरूचि व संस्कार यांची जोपासना करण्यासाठी बाल वाचनालय आणि बाल संस्कार केंद्र स्थापन करावे.

मध्यप्रदेशांतील उदीयमान मराठी साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींच्या प्रातिनिधिक संग्रहाचे प्रकाशन, अथवा त्यासाठी यथाशक्य पुरस्कार, यांच्या निश्चित योजना तयार कराव्या. साहित्य निर्मिती हे तर साहित्य सभेचे परमोद्दिष्ट आणि आद्य कर्तव्य ! नवीन उत्कृष्ट मराठी साहित्याच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन, तसेंच उत्कृष्ट प्रकाशित मराठी ग्रंथांस पुरस्कार, हे कार्य पूर्वी मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ करीत असे. पण त्या मंडळाबरोबरच  ते कार्यही बंद पडले. साहित्य सभेने यासाठी निधि आरक्षित करून हे महत्कार्य सतत जोपासले पाहिजे.

फार पूर्वी सभेने "मालव साहित्य" हे दर्जेदार त्रैमासिक कांही वर्षे चालविले होते. द्रव्याभावी पुढे ते बंद करावे लागले. त्यानंतर हीरक महोत्सव प्रसंगी "मालविका" हा एक वार्षिक विशेषांक प्रकाशित केला होता. पण तोही प्रयास तेथेच विराम पावला. साहित्य सभेसारख्या ज्येष्ठ  आणि श्रेष्ठ संस्थेचे एक मुखपत्र म्हणून सातत्याने नियमित चालणारे नियतकालिक, पदरमोड करूनही, प्रकाशित होणे नितांत आवश्यक आहे. त्याची योजना व क्रियान्वयन शीघ्र झाले पाहिजे, आणि या सर्व प्रकाशन कार्यासाठी सभेच्या मालकीचे अद्यावत मुद्रणालयही हवे.

मराठी साहित्याची अभिवृध्दी. विकास व संवर्धन यासाठी आवश्यक व उपयुक्त सर्व अद्यावत साहित्य व तदनुषंगिक साधनें यांनी सुसज्ज व समृध्द ग्रंथसंग्रहालय; परस्पर संपर्क, चर्चा, परिसंवाद, व्याख्याने, संमेलने यांच्या द्वारा सतत ज्ञानसत्र चालविण्यासाठी सुयोग्य मंच (froum) ; दर्जेदार मुखपत्राने विभूषित, असे मायभाषा मराठीचे सर्वांगपरिपूर्ण व पावन "शारदा तीर्थ" ही महाराष्ट्र साहित्य सभा झाली पाहिजे.

इंदूर आकाशवाणी केन्द्रावर मराठी कार्यक्रम

इंदूर च्या आकाशवाणी केन्द्रावर मराठी कार्यक्रमांच्या नियमित प्रसारणासाठी समय निर्धारित केला जावा यासाठी फार पूर्वीपासुन पूर्वसूरींनी वारंवार प्रयत्न केलेले आहेत, पण त्यांस यश आले नाहीं. साहित्य सभेने ही यासाठी पुढाकार घेऊन अनेक प्रयत्न केले. इंदूरच्या परिसरांतील मराठी भाषी साहित्यिक आणि कलावंत यांना आपल्या प्रतिभेचा अविष्कार आकाशवाणी प्रसारणाच्या या माध्यमाने करण्यास अवसर मिळावा हे उदिष्ट होते. ही मागणी न्यायोचित व आकाशवाणीच्या मान्य नींतीस अनुसरून आहे हे प्रतिपादन करणारे विस्तृत निवेदन हजारो मराठी भाषिकांच्या समर्थन पर हस्ताक्षरांसह माननीय केन्द्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री यांना पाठविले. स्मरणपत्रें पाठवूनहीं त्यास प्रतिसाद मिळाला नाहीं. नंतर श्री वि.वि. सरवटे श्री रा. अ. काळेले श्री प्र. गो. घाटे व श्री बाळाराव इंगळे या सभेच्या शिष्ट मंडळाने दिल्लीस तत्कालीन सूचना मंत्री मा. श्री अडवाणी यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि पुन्हा एक सविस्तर निवेदन देऊन चर्चा ही केली. पण त्याला ही नकार मिळाला. तेव्हा तरणोपाय नाही म्हणून सक्रिय आंदोलन करण्याचा सभेने निर्णय केला. तदानुसार दिनांक 6-5-1979 पासून दि. 11-5-79 पर्यंत सहा दिवस सतत सामूहिक साखळी उपोषण केले गेले। दि. 11 मे 1979 ला एक विशाल शांत व अनुशासनबध्द मोर्चा नेला आणि सभेचे अध्यक्ष श्री वि. वि. सरवटे यांनी सभे तर्फे साधार सविस्तर निवेदन इंदूर आकाशवाणी केंद्र निर्देशकांना दिले. सभेच्या या आंदोलनाच्या आयोजनांत-उपोषणांत व मोर्चात-इंदूरकर मराठी भाषी स्त्री-पुरूष व विद्यार्थी यांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहयोग दिला. मराठी भाषिकां बरोबरच अन्य भाषकांनीही या मागणीचे समर्थन केले याबद्दल सभा कृतज्ञ आहे.

यानंतर केन्द्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मा.श्री साठे यांनी इंदूर व बडोदा येथील आकाशवाणी केन्द्रावर मराठी कार्यक्रमांच्या नियमित प्रसारणाबाबदच्या शासकीय निर्णयाची घोषणा केली आणि तदनुसार दिनांक 29-6-1980  पासून प्रत्येक रविवारी सकाळी साडे आठ ते नऊ मराठी कार्यक्रमांच्या नियमित प्रसारणाबाबदच्या शासकीय निर्णयाची घोषणा केली आणि महाराष्ट्र साहित्य सभा माननीय श्री साठे यांची हार्दिक  कृतज्ञ आहे. मराठी भाषिकांची दीर्घकालीन न्यायोचित मागणी अंशत: मान्य झाली. या पुढे मराठी कार्यक्रमांच्या या  प्रसारणाचे दिवस व समयावधि यांत इष्ट वृध्दि करण्यासाठी नेटाने संयुक्त प्रयास झाले पाहिजेत.

भारताच्या घोषित चौदा शासकीय भाषांपैकी मराठीही भारताची एक शासकीय भाषा आहे. तिचा हा दर्जा महाराष्ट्रा प्रमाणेच बृहन्महाराष्ट्रातही जतन करावयाला हवा. मराठीच्या सेवेसाठी झटणा-या, कटिबध्द असणा-या, संस्थांवर याची प्रामुख्याने जवाबदारी आहे. मध्य प्रदेशांत अग्रणी मराठी भाषी संस्था असणा-या इंदूरच्या महाराष्ट्र साहित्य सभेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी सभा अधिक प्रातिनिधिक व सामर्थ्यशाली झाली पाहिजे. इंदुरांत मराठी भाषिकांची सुमारें पंचवीस हजार कुटुंबे असाबीत. घरटी एक या प्रमाणे प्रत्येक मराठी परिवाराने साहित्य सभेचे सभासद होÅन, सभेला सहकार्य द्यावे, सभेशी आत्मीयता दर्शवावी, सभेला आपली वांछित ईप्सितें प्राप्त करण्यासाठी पंचदश सहस्त्र हस्तांनी शक्ति प्रदान करावी, आणि मायभाषा मराठीची उत्तरोत्तर अधिक आणि भरीव सेवा करण्यात सभेला सक्षम व सशक्त करावे असे समस्त इंदूरकर मराठी भाषिकांना कळकळीचे आवाहन आहे.

स्मृति-दिन

महाराष्ट्र साहित्य सभा, राष्ट्रनायकांचे, कवींचे, ऐतिहासिक व्यक्तीचे,साहित्यिकांच, समाजसुधारकांचे, संस्कृति संवर्धकाचे स्मृति दिन साजरे करते.

न्याय देवते समोर निर्भयपणाने - "There are higher powers that rule the destiny of things?; and it may be the will of providence that the cause I represent may prosper more by my suffering than by remaining free" असे सांगणारे लोकमान्य टिळक कोणा भारतीयाच्या नित्य स्मरणात नसतील? ऋषी तर्पणात त्यांना अढळ स्थान मिळाले. या पराक्रमी तेजस्वी पुरूषाचे पुण्य स्मरण प्रतिवर्षी होते (1856-1920).

राजकवि भास्कर रामचंद्र तांबे (1874-1941) यांची कविता "श्रीमंत महाराज मल्हारराव बाबासाहेब पवार यांचे सेवेशी" ही 1892 त देवासला प्रसिध्दि पावली. इंदूरने 1926 च्या पहिल्या कवि संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा पहिला मान त्यांना दिला. इंदूरचे कवि त्यांचे भक्त. श्री.गं. के. शिराळकर यांनी तर तांब्यांची शब्दचित्रें कुंचल्याने हुबेहुब रंगविली आहेत. 6 ते 10 नोव्हेंबर 73  ला तांब्यांची जन्म शताब्दी सभेने साजरी केली. "तांबे एक अध्ययन" ह्या रा.अ. काळेले ह्यांच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीचे प्रकाशन झाले. वयोवृध्द कवि सी.का. देव, गं. के. शिराळकर, के.ना.डांगे यांचा सत्कार केला. रा.शं. वाळिंबे यांचे उद्बोधक भाषण झाले. कुमार गंधर्व व त्यांचे सहकारी यांनी "तांबे गीत रजनी" साजरी केली.

न.शं. रहाळकर 1882-1957 हे स्थानिक कवि. सभेचे उपाध्यक्ष. सरकार कडे पाठवायच्या सभेच्या शिष्ट मंडळात ते असत. सरकार कडून सन्मानार्थ पदवी मिळाली. "केशवसुत व त्यांची कविता" हा प्रबंध यांनी येथेच लिहिला. त्यांच्या "पुष्पांजली" , "शाकुंतल सौंदर्य", "वीरधर्म दर्पण", भाषांतरित "होळकरांचा पोवाडा" इत्यादि रचना प्रसिध्द आहेत."मालव साहित्य " च्या पाठीशी ते सतत होते. सभा त्यांना कृतज्ञता पूर्वक श्रध्दांजली अर्पिते.

श्री गोपाळ गणेश आगरकर:-1856-1895 राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा? बहुमत राजकीय सुधारणेकडे झुकले. आज अनुभवांनी समाज सुधारणा मागासलेली असली तर राजकीय सुधारणा अप्रगतिशील होते हे प्रत्ययास येऊ लागले आहे. आगरकर द्रष्टे होते. त्यांना ही गोष्ट पूर्वीच जाणवली होती. त्यांचे  "विकार विलसित" हे हॅमलेट चे मराठी भाषांतर, "वाक्य विश्लेषण" हा व्याकरण ग्रंथ व "सुधारकांतील निवडक निबंध" मराठी  भाषेला भूषणभूत आहेत. त्यांचा अर्धशत सांवत्सरिक स्मृति दिनोत्सव सभेने 1945 त साजरा केला.

पानपतच्या 1761  च्या घनघोर युध्दांत मराठ्यांचा पराजय झाला. हिरे हरपले, मोती ओघळले, खुर्दा किती नाहीसा झाला गणती नाही! लाख बांगडी फुटली !अशा दुर्धर प्रसंगी मराठी पदपादशाहीचे सौभाग्य ज्याने सांभाळले, दरारा कायम ठेवला, अतुलनीय धैर्य, अजोड मुत्सद्दीपण, सडेतोड न्याय, थोर बुध्दीमत्ता, विमल चरित्र या अलौकिक गुणांनी जो महाराष्ट्रास ललामभूत झाला, ज्याच्या कंर्तबगारीने अनेक साहित्य कृतींना जन्म दिला. त्या थोर शूर वीर माधवराव पेशव्यांच्या द्विशत सांवत्सरिक स्मृति दिनोत्सव सभेने 1945 त थाटला. अध्यक्षस्थान राजकन्या सावित्रीबाईनी भूषविले केले होते. मुख्य वक्ते इतिहासपटु वा.वा. ठाकुर होते.

स्वातंत्र्य समर शताब्दी महोत्सव-दि. 7ते14 ऑगस्ट  1957 ला हा महोत्सव साजरा केला. मुख्य भर व्याख्यानांवर होता. तीन मराठीत तर दोन हिंदीत. धारच्या प्रा.अ.वा. वाकणकरांचा विषय होता "स्वातंत्र्य समर पूर्वकालीन मालवा" दुसरे व्याख्याते देवासचे बॅरिस्टर ग.शं. गंध्ये होते. त्यांचा विषय "स्वातंत्र्य समर पूर्वकाल 1757 ते 1857. तिसरे वक्ते श्री द.वि. खांडवेकर यांचा विषय होता स्वातंत्र्य समरोत्तर काल 1857-1920. हिंदीतले व्याख्याते होते प्रा. लुनिया "स्वातंत्र्य समर कालीन मालवा" हा त्यांचा विषय. "स्वातंत्र्य समरोत्तर काल 1920-1957 या विषयावरील वक्तव्य दिले इंदूरच्या सुपरिचित होमी दाजींनी.  "त्या आम्रा त्या पिक सेविता सम समां संयोग कीं जाहला" असा हा योग होता. समारोप केला डॉ. ह.रा.दिवेकरांनी.राजकीय, सामाजिक स्वातंत्र्य हवे असे खंबीरपणे प्रतिपादन करणारे, त्यासाठी झटणारे, "आधी केले मग सांगितले" हा त्यांचा अधिकार अर्थात स्फूर्तिप्रदच झाला. श्रोत्यांना दोनशे वर्षांचा इतिहास कळला. भूत आणि वर्तमान समजले. भविष्याचा अंदाज आला. 58 त महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा जन्म शताब्द साजरा केला.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर 1879-1934-- स्वतंत्र अद्भुतरम्य संविधानकांची नाटके रंगभूमीवर आणण्यास व नाटकातून विनोद आणण्यास यांनी प्रथम सुरूवात केली. यांचा 25 वा स्मृति दिन 1959 त सभेने साजरा केला व 29-6-71 ला जन्म शताब्दी समारोह केला आणि ललित वाङ्मयातील नाटक, कादंबरी विनोद व टीका यांच्या तंत्राला तो मुजरा केला हेच खरे. अध्यक्ष होते प्रा. विजय पागे. वक्ते होते डॉ.रा.वा.आपटे व अनिल राजे.

विनायक जर्नादन करंदीकर 1872-1909 . राजकीय पारतंत्र्या विषयी तीव्र त्वेष, हिंदुधर्मा बद्दल अभिमान, शीलवती स्त्रियांच्या उदात्त चारित्र्याचे गुणगान हे कवि विनायकांच्या काव्याचे विशेष. त्यांनी नाट्यशस्त्राचा, अभिनयाचा, विनोदाचा चांगला अभ्यास केला होता. त्यांचे साहित्य प्रेम, त्यातील अभिव्यक्ती  यांची जोपासना करून सभेने त्यांचा स्मृति दिन 1959 त समारंभपूर्वक थाटला.

भालचंद्र राजाराम लोवलेकर 1911-45. कळी उमलली जो न पावली पूर्ण विकासाला ! अदय कराचा अवचित घाला तिजवर तो आला ! अशा अकाली ऐन तारूण्यात मरण पावलेल्या होतकरू कवीचा स्मृति दिन (30-6-59) सभेने करणे उचितच होय. लोवलेकरांचा जन्म, शिक्षण माळव्यात झाले. माळव्याच्या रानावनाचे, पीक पाण्याचें, संरोवरांचे, नदीनाल्याचें, टेकडयांचे, पर्वतांचे, भूमीचे, ऋतुंचे निसर्ग-रम्य वर्णन त्यांच्या कवितांतून आल्हादकारक शब्दांनी रेखाटलेले आहे. स्वत: कवि एकांतप्रिय, प्रसिध्दि पराङमुख होते. त्यांचे काव्य त्यांच्या वहीत किंवा थोडेसे नियतकालिकांतून रसिकांच्या नजरेत भरले ते तेवढेच राहिले असते. लोप पावले असते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांची कविता संकलित केली प्रकाशांत आणली. इंदूर ग्रंथोत्तेजक मंडळाने समारोहावे अध्यक्ष राजकवि काळेले.

केशव दाजी पुराणिक 1866-1959. भैरव प्रकरणी जोर चढत होता. तात्या साहेब सरवटे यांना राजकीय आवाहनमुळें इंदूर सोडून महत्वपूरळा जाणे भाग होते. तात्यानंतर कोण ? हा प्रश्न उद्भवला. व्यक्ती खंबीर, निडर, तत्वनिष्ठ पण अक्षोभकारक हवी होती. सर्वानुमते वयोवृध्द अनुभवी आदरणीय तात्यासाहेब पुराणिकांची अध्यक्षपदी निवड झाली. भैरव वादात सापडलेल्या हिंदी धनिकांस त्यांनी त्यापासून दूर केले. नसत्या भानगडीत पडलो असे त्यांना पटविले. आपल्या अनवधानाने पूर्ण माहितीच्या अभावी, आपण अभावितपणे सभेचे नुकसान केले असे त्या सुसंस्कृत विवेकी धनिक मनास वाटू लागले व त्यांनी सभेची शक्य तितकी नुकसान भरपाई स्वत: होऊन केली. हे परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य के.दा.यांचेच.वा. गो. आपटे ट्रस्ट मधून सभेला तात्यांमुळे देणग्या मिळाल्या. या ऋणांतून अंशिक तरी मुक्ती मिळावी म्हणून सभेने 13-12-60 ला त्यांचा स्मृति पाळला. त्यांच्या कुटुंबीयांनी तात्यांचे श्री चिंचाळकरांनी चित्रित केलेले तैलचित्र सभेस भेंट दिले.

नारायण नरसिंह उर्फ नानासाहेब फडणीस :- हे जळगांवचे मराठी काव्य प्रकाशनावर उपकारकर्त्या "काव्य रत्नावली" चे संपादक. हे मासिक 1887 त जन्मले. तेव्हापासून ते अस्तित्वांत असेपर्यंत नानांनी पैशाची झीज सोसली. पण उदयोन्मुख कवींना थारा  दिला. त्यांना प्रसिध्दीस आणले. न.शं. रहाळकरांच्या कविता प्रथम रत्नावलीत प्रसिध्दी पावल्या. स्फुट,खंड आणि महाकाव्ये खंडश: याच मासिकातून जन्मली, "वनवासी " रामचंद्र कृष्ण वैद्य हे इंदूरच्या ना.कृ. वैद्य यांचे बंधू. यांची हम्मीर, सुभेदार मल्हारराव होळकर, पानपत संग्राम ही काव्यें काव्य रत्नावलीतूनच रसिकांस वाचावयास मिळाली. मराठी भाषेची सेवा करणा-या, गुण ग्राहक मार्मिक व काव्योपकारक नानांना सश्रध्द नमस्कार केला "कृतं स्मर" त्या उक्तीचे अनुसरणच होईल. 27-7-62.

महाकवि गोस्वामी तुलसीदास ----"रामचरित मानस" ह्मा कृतीने जनमानसावर विलक्षण छाप बसविली आहे. अद्याप त्यांचा हा ग्रंथ आबाल-वृध्द व शहारवासी आणि गांवकरी अत्यंत श्रध्देने, भक्तीने, आवडीने वाचतात. त्यातील आदर्शाकडे आकृष्ट होतात. अशा थोर असामान्य साहित्यिक संताचे स्मरण हे भारतीय नागरिकाचे पावन कर्तव्य आहे. सभा ते बजावते. 26-8-62. श्री.नि.छ. जमीदार हे लोकसंग्रहेच्छु आहेत. भाषिक भावनैक्य साधणारे आहेत. त्यांनी गोस्वामी तुलसीदासजींचे सुंदर तैलचित्र सभेस दिले आहे.

रवींद्रनाथ टागोर :- प्रांत बंगाली,भाषा बंगाली पण अंत:करणाने ते भारतीय होते. धर्म, विद्या व कला यांत प्रसिध्द असलेल्या टागोर कुळात 1869 त कलकत्यास यांचा जन्म झाला. 1913 त गीतांजली रचली. ती इ्ंग्रजीत भाषांतरली. त्यांचे काव्य, कथा, नाटक व कादंबरी हे वाङमय प्रकार बंगालीत व इंग्रजीत लोकप्रिय झाले. त्यांना साहित्यात नोबल प्राइझ मिळाले. भारतात हा मान प्रथम त्यांनाच मिळाला. 1915 त त्यांना ब्रिटीश सरकारने "सर" ही पदवी दिली. पुढे प्रसंग विशेषी त्यांनी तिचा त्याग केला. महात्मा गांधी त्यांना "गुरूदेव" असे संबोधत. "भात्वामभिवादयामि" असे सभेने त्यांच्या जन्म शताब्दी समारंभात म्हटले तर ते उचितच. 14-8-62.

माधव ज्यूलियन 1894-1939--डॉ. माधवराव पटवर्धन हे फार्शी मराठी कोशकार, छंदी रचनाकार, मराठी भाषेच्या शुध्दीकरणाच्या आंदोलनांतले झुंजार वृत्तीचे आणि धडाडीचे पक्षकार.एक मार्मिक काव्य चिकित्सक आणि तांब्यांच्या कविता संग्रहाचे संपादक होत. इंदूरच्या 1935 च्या संमेलनात त्यांनी आपल्या काव्य गायनाने श्रोत्यांना मोहित केले. त्यांचा स्मृति दिन 1962 त साजरा केला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी---(1869-1948). हे तर युगकर्ते होते. असाध्य स्वराज्य साध्य करून दाखविले. जिथे "फूट पिकते, तिथे एकी आणली  "निर्बल के बलराम" असे गाऊन नागरिकात राम आणला" प्रतिकार शक्ती तयार केली. यूनियन जॅक अदृष्य झाला. तिरंगा फरफरला. ह्मा महात्म्याला परम आदराने प्रत्येक नागरिक श्रध्दांजली अर्पितो. तशी सभाही. 2-10-64.

गोंविदा ग्रज. राम गणेश गडकरी (1885-1919) भाषा सुंदरीला त्यांनी विविध अलंकारांनी नटविले. भावनांची उत्कटता आणि आदर्शाची उदात्तता रंगविण्यांत त्यांनी परमोच्च सीमा गाठली. त्यामुळें मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान अद्वितीय आहे. ऐतिहासिक नाटकांत बखरीतील भाषा, वाक्प्रचार यांचा समावेश करणा-या, जुन्या कवींचा व शाहीरांचा व्यासंग ठेवणा-या अशा थोर साहित्यिकाचा सन्मान सत्कार करण्याचा मोह कोणा मराठी भाषाभिमान्यास होणार नाही? सभा त्यांचा स्मृति दिन साजरा करते. 24-25 जानेवारी 1969ला त्यांची 50वी पुण्य तिथी साजरी केली. उत्सवाचे अध्यक्ष होते राजकवि रा.अ. काळेले. व सी. का. देव श्री. नगरकर कुटुंबाने राजसंन्यासातील कांही प्रवेशांचे संस्मरणीय वाचन केले.

केशवसुत-कृष्ण केशव दामले (1866-1905) . अंत:करणातली तळमळ, स्वजनांविषयी प्रेम, स्वोन्नतीच्या आड येणा-या गोष्टी विषयी तिटकारा, जुलुमा विषयी संताप आणि सर्वांच्या अंतर्यामी वसणारी भावनोत्कटता व पौरस्त्य अंत:करणीची अज्ञाता कडील नैसर्गिक ओढ या गोष्टींनी केशव-सुतांच्या कवितांचे वातावरण प्रस्फुटित झाले आहे. विशेषत: त्यांच्या राष्ट्रीय तुतारीने मराठी काव्य शरीरांत राष्ट्रीयत्वाची नव चैतन्याची प्रेरणा केली आहे. हे केशवसुतांचे महात्म्य आहे. अशा थोर कवीचा सांवत्सरिक शतसांवत्सरिक कोणताही समारंभ करणे स्फूर्तीप्रदच होणार. सभा या विषयी जागृत असते. तिने हा जन्म शताब्दी उत्सव 19-12-66 ला साजरा केला. अध्यक्ष होते प्रा.म.ना. अदवंत.वा.रा.ढवळे व.रा.अ. काळेले ह्यांची केशवसुतांवर भाषणें झाली.

नारायणराव राजहंस-बाल गंधर्व-त्यांनी अनेक नाटकांतून स्त्रियांच्या भूमिका केल्या. नटावं, मुरडावं, हंसाव कसं, वस्त्रें कशी घालावी, प्रसंगानुरूप प्रवेश कसा घ्यावा, हे असंख्य स्त्रिया गंधर्वां पासून शिकल्या. यांत कला आहे, कौशल्य आहे असे कलावंत मानतात ! गंधर्वांनी स्रियांच्या राहणीत वेशभूषेत क्रांति घडविली, गार्हस्थ जीवनात रमणीयता आणली ! दीर्घकाल कर्णमधुर संगीत श्रोत्यांस ऐकविले,अभिनयाने प्रेक्षकांस रंजविले घटकाभर दु:ख विसरविले सुख पसरविले ! गंधर्वाच्या कलेचे ऋण जीवंतपणीं तसेच त्यांच्या मरणोत्तरही प्रेक्षकांनी मानले. स्मृति दिन शृंगारले (वृत्तवर्ष 67-68).

प्र.के. अत्रे---झुंजार पत्रकार, विडंबन कवि, नाटककार व विनोदाचार्य अत्र्यांचा स्मृति दिन सभेने 16-6-71 ला साजरा केला. वृत्तपत्र  प्रतिनिधि बाळाराव इंगळे अध्यक्ष होते. प्र.द. सरदेशमुख यांचे अत्र्यांच्या जीवनावर भाषण झाले. त्यांच्या गाजलेल्या नाटकातील निवडक प्रवेशांचे प्रभावी वाचन केले राजेंद्र देशमुख, सौ. सप्रे, प्र.वा.मोघे, जयंत जोगळेकर व श्रीधर जहागीरदार यांनी.

साहित्य सम्राट न.चिं. केळकर :-यांचा जन्म शताब्दी समारोह 1972 त सभेने साजरा केला. बाळाराव इंगळे, प्र.द. सरदेशमुख ,रा.अ.काळेले आणि प्र.गो.घाटे यांची भाषणे झाली. केळकर व्याख्यानमाला आयोजित केली 23,24,25-2-74 ला.वक्ते श्री.व.दि.कुळकर्णी, अध्यक्ष रा.अ.काळेले होते. 1920 त लोकमान्यांच्या निधनानंतर देश हादरला , हळहळला ! पहिल्याच शोक सभेत त्यांचे चरित्र साहित्याचार्य न.चिं. केळकरांनी लिहावे अशी साहित्य सभा इंदूरने विनंती केली. लेखनास एक हजार रूपयांचे द्रव्य सहाय्य ही जाहीर केले. पण ते तसे घडायचे नव्हते ! हा योगायोग. पण सभेची आतुरता सुस्पष्ट. 1917 च्या साहित्य संमेलनात त्यांनीच परिषदेला दहा हजार रूपयांची देणगी दिल्या बद्दल श्रीमंत तुकोजीराव होळकरांनी आभार मानले.

ह्याच वर्षी म्हणजे 1972 त सभेने विख्यात नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म शताब्दी समारोह केला. अध्यक्षस्थानी होते राजकवि रा.अ. काळेले. नाटयाचार्य खाडिलकर यांच्या नाटय सृष्टीतील शिशिर आणि वसंत हा विषय होता प्र.द. सरदेशमुख यांच्या प्रभावी अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा. भाउबंदकी,कीचकवध, मानापमान आणि स्वयंवर यातील निवडक प्रवेशांचे  प्रभावी वाचन झाले. त्यात सौ.ज.फाटक, श्री. परांजपे, सौ. रोकडे, श्री.धोडपकर व श्री.ह. डांगे हे होते. निवेदक प्र.गो. घाटे.

वा.गो. आपटे स्मृति दिन आणि के.भा. कोचरेकर स्मृति दिन अनुक्रमे बाल वाचनालय आणि पारितोषिकें यांस विस्ताराने वर्णिले आहेत. तसेच कांही स्मृति दिन सभा इतर संस्थांच्या सहकाराने करते. त्यांत शिव जयंती, अहिल्योत्सव आणि ज्ञानेश्वर जन्म सप्तशती समारंभ येतात.

राजकवि रा.अ. काळेले, त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा ताई व बंधु वसंतराव यांचे सहाय्य अशा स्मृति दिनात सभेस लाभते हे नमूद करण्यास आनंद वाटतो. तांबे सत्कार निधीचे ते एक प्रमुख सभासद आहेत. या निधीचा एक मोठा भाग तूर्त सभेकडे व्याजावर आहे. एका वांछनीय काव्य प्रवृत्तीस जोम यावा म्हणून सभा या निधीत सढळ हाताने व्याज देते.

चित्र दर्शनाने सतत स्मरण रहावे म्हणून साहित्यिकांची चित्रे सभा एकचित्र करते. त्यांत विष्णुपंत गुरूजी सरवटे, बाळकृष्ण मल्हार हंस, बाळकृष्ण नारायण देव, राजकवि भा.रा. तांबे, न.शं. रहाळकर, वि.कृ.मुळे, ब.क.माकोडे, ना.कृ.वैद्य, वा.गो. आपटे आणि वि.सी.सरवटे हे आहेत. तसेच रवींद्रनाथ टागोर, रा.ग.गडकरी आणि सौ. कुसुमावती देशपांडे ह्यांचीही चित्रें आहेत.

काव्य भक्तीने कविता देवीस विचारले "कवि कोण?" ती उत्तरली "दंडी" कालिदासाने संतापून प्रश्न केला "मग मी कोण?" देवतेने रोख ओळखला. म्हणाली तू तर मीच. साक्षात काव्य देवता पृच्छकाचा संताप विरला.वर लाभला. त्या कविकुलमुकुटमणी कालिदासाचे भव्य आकर्षक चित्र प्रसिध्द कलाकार द.दा. देवळालीकर इंदूर यांनी रंगविलेले सभेची शोभा वाढवीत आहे. आचार्य चिंचोरे यांच्या दिग्दर्शना खाली महाकवीच्या शाकुंतल नाटकाचे कांहीं अंश अभिनीत झाले आहेत.