महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूरचा इतिहास

महाराष्ट्र साहित्य सभा स्थापना

इंदुर व त्याच्या परिसरांत साहित्यप्रेमी व्यक्तीं चाललेल्या वाड़मयसेवेचा उल्लेख गेल्या प्रकरणात आलेला आहे. या धडपडीमागे निष्ठा अवश्य होती, पण ते एकाकी, फुटकळ प्रयत्न होते. त्यांत एकसूत्रता यावी, त्यांना सामुहिक प्रातिनिधिक स्वरूप लाभावे, व होतकरू अभ्यासकांना वाव व उत्तेजन मिळावे, यासाठीं एखादी साहित्य सेवा करणारी मध्यवर्ती संस्था असावी असा विचार प्रमुख मंडळींच्या मनांत घोळूं लागला. त्याचाच परिपाक म्हणजे श्रीमंत सरदार मा.वि किबे यांच्या निवास- स्थानीं दि. 12-6-1915 रोजी प्राथमिक विचारविनिमयासाठीं आमत्रिंते करण्यांते आलेली बैठक. बैठकींत या महाराष्ठ्र साहित्य सभा स्थापन करावी या निर्णयाबरोबर सभेच्या धोरणाचा व नियमांचा श्री.वा.गो.आपटे (आनंद चे संपादक) यांनी तयार केलेला मसुदाही मान्य करण्यांत आला.

हा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो कांही व्यक्तींपुरताच मर्यादित होता.त्याला लोकमताचा पाठिंबा मिळाल्याशिवाय संस्थेला खच्या अर्थाने प्रातिनिधिक स्वरूप येणें दुरापास्त होते. हें लक्षात घेऊन तत्कालीन स्टेट सर्जन डॉ.गो.रा.तांबे,सरदार वि.कृ.मुळ्ये, वा.गो.आपटे, प्रा.ल बा. देव आदि मातब्बर नागरिकांच्या सहीनें हस्तपत्रक काढून सर्वसामान्य जनतेला सध्दकार्याचें आवाहन करण्यांत आले. दि. 18-9-1915 रोजी भाद्रपद शुध्द एकादशी (डोलग्यारस) च्या पवित्र दिवशीं नगर- भवनांत नागरिकांची एक महती सभा भरली. तत्कालीन कारभारी दिवाण बहादुर गोविंद रामचंद्र खांडेकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले होतें इंदूरचा वाढता पसारा, शिक्षण क्षेत्रांत केलेली प्रगति, अव्याहत चालू असलेली सरस्वती - उपासना लक्षांत घेता साहित्य सभेच्या स्थापनेस जनता जनार्दनाचा शुभाशीर्वाद असावा असा निर्णय घेऊन समयोचित - प्रयत्न करण्यात  यावे असे ठरविण्यात आळे. आजवर झालेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला तर संतांचें दासानुदास ह.भ.प. श्री लक्ष्मणराव पांगाररांनी आपल्या चटकदार भाषणानें श्रोत्यांत अमाप उत्साह निर्माण केला.

नंतर इंदूर नगरींत महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना व्हावी असा ठराव श्रीमंत सरदार मा.वि.किबे यांनी मांडला - त्याला अनुमोदन दिलें सुप्रसिध्द वकील श्री श्रीनिवास त्र्यंबक द्रविड यांनी. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटांत सभेने ठरावास एक - मुखी मान्यता दिली.

प्रा.ल.बा.देव यांनीं संकल्पित धोरणाचा व नियमांचा आराखडा सभेपुढें ठेवला. त्याला द्यावी असा ठराव डा.प्रभाकर रामकृष्ण भांडारकर यांनी सर्वांनी सम्मती मांडला.त्याला श्री नरहर शंकर रहाळकर यांनी अनुमोदन दिलें.सभेने आनंदाने स्वीकृति दिली.

महाराष्ट्र साहित्य सभेच्या स्थापनेबद्दल संतोष व्यक्त करून या नवोदित संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठीं सर्वानी एक दिलानें झटावें असें आवाहन व कामना अध्यक्षांनी व्यक्त केल्यानंतर सभा विसर्जित झाली.

साहित्य सभेचें पहिलें कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणें होते :

अध्यक्ष

दिवाण बहादुर गोविंद रामचंद्र खांडेकर

कार्यकारी अध्यक्ष

न्यायमूर्ति दामोदर विनायक कीर्तने

उपाध्यक्ष

डा.गोपाळ रामचंद्र तांबे, रावबहादुर डा.प्रभाकर रामकृष्ण भांडारकर

कोषाध्यक्ष

सरदार विनायक कृष्ण मुळ्ये

चिटणीस

श्री वासुदेव गोविंद आपटे

प्रा.लक्ष्मण बालकृष्ण देव

सभासद

श्रीमंत सरदार मा.वि.किबे, श्री श्री.त्र्यं. द्रविड, श्री व्ही.जी. दळवी, डा.श्री ना. देव, श्री.बा.ना. देव, श्री म.ज. केतकर, श्री.वा.ग. पंतवैद्य, श्री.न.शं. रहाळकर, डा.भा.म. टेंबे, प्रा.वा.ब. श्रीखंडे

अशा प्रकारे इंदूर संस्थानांत मातृभाषाप्रेमी जनतेच्या सहकार्यानें मराठी भाषा, साहित्य व संस्कृति यांच्या अभिवृध्दीसाठी, व्यासंग वाढविण्यासाठीं आणि लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य सभेचा जन्म झाला आणि पूर्वी चालू असलेल्या प्रयत्नांना सुसंघटित व स्थायी स्वरूप येण्याची शक्यता बळावली !

निकडीची गरज होती ती दैनंदिनी कार्य करण्यासाठी जागेची. जनता जनार्दनाचे अनुकूलता लाभल्यावर सत्य संकल्पाच्या कामांत अनपेक्षित साह्य मिळतेच, असा अनुभव आहे. इंदूर सार्वजनिक ग्रंथालय या ज्येष्ठ संस्थेनें आपल्या जागेंतच उदार अंत: करणानें सभेची सोय करून दिनी, तेव्हां याची प्रचीति आली. सुरूवातीची सतत बारा तेरा वर्षे साहित्य सभेनें येथूनच आपल्या कार्याचें सूत्रसंचालन केलें. पुढें जसजसा पसारा वाढूं लागला तसतशी जागा कमी वाटूं लागली ग्रंथालयालाही अडचण होऊ लागली. प्रयत्नांती तोपखाना प्रमुख मार्गावर हुजूर फडणीसांच्या वाड्यांत कोर्ट आफ वार्डस मार्फत भाड्यानें जागा मिळाली व त्या ठिकाणीं सभेने संसार थाटला. पुस्तकांची कपाटें मात्र ग्रंथालयातच ठेवली होती. नव्या जागेंत सभेच्या कार्यकारी मंडळाची पहिली बैठक दि. 26-6-1928 ला झाली. या ठिकाणीं सभेनें कार्यालय त्वरित हलवावें अशी कोर्ट आफ वार्डस् कडून नोटीस मिळाली. जागा सोडणें भाग झाले आणि 'परसदननिविष्ट को लघुत्वं न याति'  याचा कटु अनुभव आला . या ठिकाणीं दि. 19-9-1933 ला शेवटची बैठक झाली.

साहित्य सभेची नड लक्षांत घेउन महाराष्ट्र ब्राह्मण सभेनें तीन महिन्यासाठीं जागा दिली आणि सौजन्यपूर्वक ही मुदत दोन महिन्यांनी वाढविली दि. 9-3-1934 पावेतो साहित्य सभेचे बिप्हाड या ठिकाणी होतें .

यानंतर सहकारी मुद्रणालयानें सहकार करून आपल्या कार्यालयांतच साहित्य-सभेस थारा दिला. जागेची अडचण तात्पुरती कां होईना दूर झाली असली तरी कार्यकारी मंडळास जर कुठल्या एका गोष्टीची तीव्रतेनें टोंचणी लागली असेल तर ती स्वत: च्या मालकीचे घर असायला पाहिजे याबध्दल. सर्वानाच वाटू लागलें 'असावें घरटे अपुलें छान'. वास्तविक कोर्टाकडून सूचना मिळाली तेव्हांच या विचाराला चालना मिळून हालचालीस प्रारंभ झाला होता.श्रीमान कारभारी साहेबांस जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यासाठीं शिष्टमंडळ पाठविण्याचें ठरलें. या शिष्ट मंडळांत सरदार ब. चांगण, सेठ कन्हैयालाल भंडारी, प्रा. वामन बळवंत श्रीखंडे, प्रा.वामन गोपाळ उर्ध्वरेषे, श्री विनायक सीताराम सरवटे, श्री विनायक हरि आपटे ही मातब्बर मंडळी होती. दोनदा हें शिष्ट मंडळ कारभारी साहेबांस भेटलें आणि तोपखान्यांतील रहदारीच्या मार्गावर असलेलें घर, ज्या ठिकाणी श्री हरिश्चद्र शर्मा राहत असत ते , सवलतीच्या दरानें साहित्य सभेस मिळावें यासाठीं श्रीमंतांकडून सत्वर मान्यता मिळविण्याची व्यवस्था करण्याची कृपा करावी अशी विनंती केली.

पुढें श्रीमंत महाराजाधिराज राजराजेश्वर सवाई श्री यशवंतराव होळकर यांच्या सेवेंत उपस्थित होऊन प्रत्यक्ष निवेदन शिष्टमंडळानें करावें असाही निर्णय घेण्यांत आला. हें सर्व करूनही यश दृष्टिपथांत येईना. अखेरीस स्वावलंबनाचा मार्ग चोखाळणेंच श्रेयस्कर या विचारानें जागा भाडयानें घ्यावी किंवा विकत घ्यावी हें ठरविण्यासाठी दि. 19-3-34 च्या बैठकींत श्री. वि. पां.माटे, वि.ह.आपटे, वि.ल.नामजोशी व सी. का देव यांची समिति नियुक्त करण्यांत आली. साहित्य सभेचें हें दुखणें वेशीवर टांगण्याचा प्रयत्न या समितीनें उत्सवांतून, व्याख्यान प्रसंगीं, वार्षिक सभांतून, नेटानें केला आणि लवकरच त्याला अपेक्षित फळ आलें.

1934 च्या शारदोत्सवाची तयारी चालू असतां त्याला जोडूनच मध्यभारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याच्या विचारास चालना मिळाली. या भव्य समारंभाचें उदघाटन करण्यात श्रीमंत महाराणी सौ. इंदिरामासाहेब होळकर यांनीं संमति दिली आणि उत्सव प्रसंगीं स्नेहलतागंजांतील आपल्या मालकीचा ब्लाक साहित्य सभेस दिल्याची घोषणा केली. ती एकताचे हर्षोल्हासानें सभागृह बहरलें, करतलध्वनीनें वातावरण दुमदुमून गेलें.

जागेच्या उदार देणगीमुळें सभेच्या कार्यकर्त्यांत उत्साह उसळला. जागेचा नकाशा, आवश्यकतेनुरूप भवनाचा आराखडा, बांधाकामाचें अंदाज पत्रक, निधीची उभारणी, वगैरे कामांसाठीं श्रीमंत सरदार मा.वि.किबे, श्री.गो.गं.मोडक इंजी- निअर, प्रा.वा.गो.उर्ध्वरेषे, श्री वि.पां.माटे, श्री वि.ल.नामजोशी व श्री वि.ह.आपटे यांची समिति नेमली गेली.

जागा दान केल्याचें विधिवत् पत्र श्रीमंताकडून मिळालें व कोनशिलारोपण समारंभास साधारण सभेनें मान्यता दिली. तेवढ्यांत एक अनपेक्षित अडचण उद्भवली. स्वीकृतीसाठीं भवनाचा नकाशा इंप्रूव्हमेंट ट्रस्टकडे पाठविला असतां नकाशाप्रमाणें भवन डिसेंबर 1936 पर्यत बांधावे, अन्यथा जागा जप्त होण्याचा संभव आहे अशा आशयाचें पत्र ट्रस्टकडून आलें . नकाशाप्रमाणें घर बांधण्यास सभेजवळ पुरेसा पैसा नाही आणि घालून दिलेल्या मुदतींत एवढी मोठी रकम गोळा करणें कठीण. बरें जागा जप्त झाली तर दात्याच्या औदार्याचा सदुपयोग सभेस करून घेता आला नाहीं असा ठपका यायचा ! असा पेच सभेपुढें उभा राहिला. तेव्हां 'अशुभस्य कालहरणं' या न्यायानें संस्था सार्वजनिक आहे, तेव्हां नियमांची अमलबजावणी सवलतीनें सहा-नुभूतिपूर्वक व्हावी, अशी सभेनें ट्रस्टला विनंती केली व सारी परिस्थिति श्रीमंत महाराणी इंदिरामासाहेबांच्या सेवेशीं निवेदन केली.

दुसरीकडे श्री सिरेमल बापना कारभारी साहेबांच्या मार्फत शासनाकडून भवन मिळविण्याचा शिष्ट मंडळाचा प्रयत्न चालू होता. अशाच एका भेटीत इंदूरमध्यें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोलविण्याचें घाटत आहे, त्यासाठीं शासनानें सर्व सोयी उपलब्ध कराव्यात, ग्रंथोत्तेजक मंडळास पूर्ववत् अनुदान पुन्हा चालू करावे, साहित्य सभेस भवन मिळावे, इत्यादि विषय मांडण्यांत आले आणि सुदैवानें सभेचा हेतु सफल झाला.

श्रीमंत महाराज साहेबांकडून घर देण्याचें आश्वासन मिळतांच सभेनें इंप्रूव-मेन्ट बोर्डला कळविलें की सभेस आतां घराची आवश्यकता नाहीं, तेव्हां दानदात्याच्या इच्छेनुरूप जागेची व्यवस्था करण्यांत येईल. तसेंच श्रीमंत महाराणी इंदिरा मासाहेबांस विनंती केली कीं ही जागा मल्हारराव बाजीराव उत्सव मंडळ व अहल्योत्सव समितीस द्यावी किंवा श्रीमंतांच्या मर्जीनुरूप तिची व्यवस्था व्हावी.

दि. 26-27-28 डिसेंबर 1935 या दिवशीं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झालें. त्याचें उद्घाटन करतांना श्रीमंत यशवंतराव होळकर नरेशांनीं तोपखान्यांतील सरकारी दुमजली भव्य भवन नाममात्र मूल्यांत साहित्य सभेस देण्याची घोषणा केली. या घोषणेनें सर्व साहित्य भक्तांचें अंत: करण आनंदानें भरून आलें, श्रम सार्थकी लागल्याचें समाधान लाभलें. घोषणेचें स्वागत करतांना श्रोतृवृं दानें टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. श्रीमंतांच्या असीम औदार्याची ती यशोदुंदुभि होती.

घराचें विक्रीखत करवून आवश्यक डागडुजी करण्यासाठी सभेचे अध्यक्ष श्री वि.सी.सरवटे यांस अधिकृत करण्यात आले. त्यांनी साहित्य संमेलना (1935) कडून पांच हजार रूपयांचे ऋण घेऊन हें कार्य संपन्न केलें. घरापुढील गरेजचे दुकानांत परिवर्तन करून ते श्री केशवराव भाटे यांस खालील अटीवर भाड्यानें देण्यांत आलें.

(1) भाडेत्यानें अडीचशे रूपये पदरचे खर्च करून आवश्यक सोयी करून घ्याव्यात.

(2) अर्धे भाडें आगाउ दिलेल्या कर्जापेटे जमा करून घ्यावे.

(3) शेष अर्धे भाडे सभेत नगदी जमा करावयाचे.

इमारतीच्या रंगरंगोटीचें काम श्री.वि.गं. देशपांडे ठेकेदार यांनी निखर्ची केलें, तर इलेक्ट्रिक फिटिंगचें काम श्री दि.श्री.शारंगपाणी यांनी योग्य किमतींत करून दिलें.

स्वत:च्या मालकीच्या वास्तूत सभेची प्रथम बैठक दि. 16-2-36 ला आली. दि. 23-5-36 च्या बैठकींत साधारण सभेनंक वरील सर्व व्यवहारास मान्यता दिली.

अशा प्रकारें आधीं परगृह, पुढे भाडेकरू असा खोखो हंडीतील खेळाप्रमाणें क्रमश: बदल होत होत सभेला स्वगृह लाभलें. ह्याचा आनंद वाटणें स्वाभाविक होते. या सुखद परिवर्तनाची गोड आठवण म्हणून वर्षप्रतिपदेला गृहप्रवेश दिनोत्सव साजरा होऊ लागला.

भवन  निर्माण

1935 मध्यें झालेल्या संमेलनानंतर होळकर दरबारकडून, प्रामुख्येकरून श्रीमंत महाराज यशवंतराव होळकरांच्या कृपेनें, अल्प किंमतीत इंदूरच्या मध्यवर्ती भागांत नगरांतील गजबजलेल्या रस्त्यावर घर व मोकळी जागा मिळाल्याकारणानें स्वत:च्या जागेच्या अभावी प्रारंभाची कितीतरी वर्षें झालेली सभेची ससेहोलपट थांबल्याचा उल्लेख मार्गे आलाच आहे. एकवीस वर्षें पूर्ण होऊन सभा वयांत आल्यानंतर तिच्याकडे स्वामित्व आलेली जागा तिच्या त्यावेळच्या  व्यापाच्या दृष्टीनें पुरेशी होती. तळमजल्यावर ग्रंथालय, दुस-या मजल्यावर वाचनालय व कार्यालय. असा  टापटिपीचा संसार कांहीं दिवस चालला  खरा ; पण सभाकार्याचा विस्तार करण्यासाठीं हातपाय हालविले पाहिजेत हा विचार कार्यकर्त्यांना स्वस्थ बसूं देईना. इमारतीच्या पुढील बाजूस हमरस्त्याला लागून असलेली मोकळी जागा तशीच राहूं देण्यापेक्षा त्यावर बांधकाम केल्यास उत्पन्नाची सोय होऊन सभेस आर्थिक बळकटी येईल, पसारा वाढविता येईल अशी कल्पना कार्यकारी मंडळाच्या मनांत खेळूं लागली. तिचें दृश्य फल म्हणजे नगर सुधारणामंडळाचे तज्ज्ञ इंजीनिअर श्री.प.गो. जोगळेकर यांच्याकडून तयार करविलेल्या नकाशावर व खर्चाच्या अंदाजावर दि. 23-3-38 च्या बैठकींत झालेला विचार. इमारत सुंदर व प्रमाणबध्द दिसावी यासाठीं लाहोरचे आर्किटेक्ट श्री. ग. श्री. गोडबोले यांजकडून योग्य ते बदल करून घेतले.

बांधकामासाठी पंधरा हजार रूपये लागतील असा अंदाज देण्यांत आला होता ; आणि एवढी रकम सभेच्या जवळ नसल्यानें कर्ज काढणें, व त्यासाठी संस्था रजिस्टर करणें आवश्यक होतें. साधारण सभेची स्वीकृति अनिवार्य असल्यानें दि. 30-4-39ला साधारण सभा आमंत्रित करण्यांत आली. त्या बैठकींत सभा-नोंदणी करून भवनविस्तारासाठीं दरसाल दरशेकडा पांच पर्यंत व्याजाच्या दरानें रू. 20000/- चें कर्ज उभारण्यास मंजुरी देण्यांत आली. कांहीं उपसमित्याही नियुक्त करण्यांत आल्या त्या अशा--

कर्ज समिति

श्री.वि.सी.सरवटे, श्री.द.रा. पिगें, श्री.नी. ह. द्रवीड, श्री.के.दा. पुराणीक, श्री.मा.स. रावेरकर

भवनविस्तार समिति

श्री. वि.सी. सरवटे, श्री. वि.पां. माटे, श्री.के.दा. पुराणीक, श्री.प.गो. जोगळेकर, श्री.मा.स. रावेरकर.

सभानोंदणी समिति

श्री. वि. सी. सरवटे, श्री. नी. ह. द्रवीड, श्री.मा. स. रावेरकर

"शुभस्य शीघ्रं" या न्यायानें दि. 6-5-1939 ला होळकर राज्य कायद्यान्वयें सभा रजिस्टर करण्यांत आली. यानंतर खल सुरू झाला तो कर्ज उभारणी संबंधात. हाच गड जिंकणें अवघड होतें. इन्दूर प्रीमियम कोऑपरेटिव्ह बँकेशीं झालेल्या वाटाघाटींत कायद्याच्या अडचणी आडव्या आल्या. तोच अनुभव इंदूर परस्पर सहकारी बँकेशीं झालेल्या बोलण्यांत आला.

1940 मध्यें सभा स्थापन होऊन पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्यानें कांहीं चिरस्मरणीय कार्य व्हावे अशी कार्यकारी मंडळीची उत्कट इच्छा होती. पैशाच्या अभावी काम अडलें होतें. बॅंका, विमा कंपनी यांजकडून तांत्रिक आपत्तिमुळें कर्ज मिळण्याचा मार्ग बंद झाल्यानें दोनच पर्याय उरले. एकाच  व्यक्तीकडून रकम कर्जाऊ घेणे किंवा कर्ज रोख्यांच्या द्वारें पैसे एकत्रित करणें. साधक बाधक चर्चेनंतर पांच टक्के व्याजाचे व वीस वर्ष मुदतीचे कर्जरोखे काढण्याचा निर्णय कार्यकारी मंडळानें घेतला. हें काम श्री. नी. ह. द्रवीड यांजकडे सोंपविण्यांत आलें. सभेचे अध्यक्ष श्री. वि. सी. सरवटे व उपाध्यक्ष् श्री. के. दा. पुराणीक यांच्या संयुक्त सह्यांनी व्यवहार व्हावा असा ठराव संमत करण्यांत आला.

नगरपालिकेतून नकाशे मंजूर करून घेणें, बांधकामासाठी परवानगी मिळविणें हें काम श्री.प.गो. जोगळेकर इंजीनीअरांनी करावें असें कार्यकारी मंडळानें ठरविलें.

अनेक लोकांना सभेबद्दल जिव्हाळा व आपुलकी व्यक्त करण्याची संधि,आणि मराठीभाषी व्यक्तींशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा सभेला लाभलेला अनुकूल अवसर, अशा उभय दृष्टीनें कर्ज रोख्याची योजना खरोखरच इष्ट होती, आणि आनंदाची गोष्ट अशी कीं सत्कार्यासाठीं  तत्पर असलेल्या मराठी समाजाकडून अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळून हां हां म्हणतां कर्जरोखे खपले. यामुळें कार्यकारी मंडळाचा उत्साह द्विगुणित होणें स्वाभाविक होते.

अशा स्फूर्तिप्रद व प्रेरक वातावरणांत दि. 25-10-40 या शुभदिनी अध्यक्ष श्री. वि. सी. सरवटे यांच्या हस्तें भूमिपूजन झालें. निमंत्रितांनी आस्थेनें नकाशे पाहिले, एकूण योजनेची माहिती करून घेतली. पवित्र वेदमंत्राचा पाठ, मंजुमधुर शहनाई प्रसन्नतेत भर टाकीत होती. सरस्वतीचा गोड प्रसाद ग्रहण करून सुखस्वप्नें रंगवीत मंडळी घरोवर परतली.

निर्माण कार्याचें कंत्राट सुप्रसिध्द ठेकेदार श्री. हेमचंद डे यांना देण्यांत आल होते. देखरेख श्री. जोगळेकर इंजीनिअर जातीनें करणार होते. बांधकामास रीतसर प्रारंभ झाला. मुहूर्त शोधण्यांत अभावितपणें त्रुटि राहिल्यामुळें म्हणा किंवा सभेच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेची परीक्षा पाहण्याची नियतीची इच्छा होती असें म्हणा अकल्पितपणें भैरव प्रकरण उद्भवलें आणि प्रथमग्रासे मक्षिकापात झाला. हें प्रकरण म्हणजे सभेसाठीं अग्निदिव्यच होतें. त्याची सविस्तर हकीकत स्वतंत्र प्रकरणांत साद्यंत दिली असल्यानें द्विरूक्ति करण्याची आवश्यकता नाहीं. सभेचा पक्ष न्यायाधिष्ठित सत्याचा असला तरी भैरव रक्षा समितीच्या आडमुठेपणामुळें आणि कांही अधिका-यांनी कायद्याची व सामाजिक न्यायाची पर्वा न करतां त्यांच्याकडे झुकतें माप टाकल्याकारणानें सभेला भैरव बराच भोंवला, बांधकाम रेंगाळलें, बरेच दिवस काम बंद पडलें आणि परिणामी खर्चाचा बोजा मूळ अंदाजापेक्षा खूपच वाढला.

येणा-या अडचणीतून मार्ग काढीत काढीत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपली निष्ठा पणाला लावणा-या कार्यकर्त्यांनी दि. 30-7-44 ला तीन मजली दक्षिणाभिमुखी इमारत बांधून पूर्ण केली. त्यावेळी भवन निर्माण व जुन्यानव्या इमारतीतील वीजफिटिंग यासाठी  एकूण रू. 42311-8-11 इतका खर्च झाला होता. नव्या इमारतींत तळमजल्याला चार दुकानें, दुस-या मजल्यावर कार्यालय म्हणून उपयोगी पडू शकणा-या चार खोल्या आणि तिस-या मजल्यावर शारदेचें कलात्मक व अर्थपूर्ण सुंदर तैलचित्र असलेलें मोठे सभागृह अशी एकंदरीत रचना होती. खालचे दोन मजले अर्थोत्पादक, तिसरा सभेचे व्याख्यान काव्यगायनादि कार्यक्रम करण्यासाठी, प्रसंगविशेषीं इतरांना भाडयाने देण्यासाठीं, अशी विभागणी कार्यकारी मंडाळानें केली.
विश्वसनीय भाडेकरू मिळण्यास फारसा वेळ लागला नाही. आणि उत्पन्नाचें भरभक्कम साधन सभेच्या हातीं आलें. निधि जमूं लागली. ; भाडयाचें वार्षिक उत्पन्न पांच हजाराच्या घरांत पोंचलें. तरीही 1950 च्या अखेरपर्यंत कर्ज फेडण्याच्या दृष्टीनें हालचाल झाली नाहीं.

1950 च्या साधारण सभेंत कार्यकारी मंडळांत कांहीसा कायापलट झाला. नव्या दमाची मंडळी आंत आली. चिटणीसपदाची सूत्रें श्री. प्र. गो. घाटे यांच्या हातीं आलीं. सभेनें निधि सेव्हिंग्जखातीं ठेवून 2-2च टक्के व्याज घ्यायचें व कर्ज रोखेधारकांना मात्र पांच टक्के व्याज देऊन नुकसान करून घ्यावयाचें ही स्थिति  स्पृहणीय नसल्याचें चिटणीसांनी कार्यकारी मंडळास पटवून दिलें. परिणामस्वरूप 1951 च्या उत्तरार्धांत दहा हजारांच्या कर्जरोख्याची रकम व्याजासह धारकांना परत करण्यांत आली. ह्मा धोरणाचा पाठपुरावा केला गेल्यामुळें 1954 पावेतो रू. 19000/- चा कर्जभार कमी झाला. राहिलेल्या एक हजारपैकीं रू. 900/- श्री. पंतवैद्यांस 1968 मध्यंि परत करण्यांत आले. कै. ना. कृ. वैद्यांचे रू. 100/- तेवढे  राहिले. ते त्यांच्या वारसांनीं हस्ताक्षर स्पर्धेंत व्याजांतून पारितोषिक देण्यासांठी सभेच्या स्वाधीन केले आणि सभा ऋणांतून पू्र्णपणें मुक्त झाली. इमारत निर्माणांत सभेची अडवणूक न करणारे ठेकेदार श्री. हेमचंद्र डे, बांधकामावर जातीनें देखरेख करणारे श्री. जोगळेकर इंजीनिअर, निष्ठा पणाला लावून कार्य करणारे श्री. रावेरकरादि कार्यकर्ते यांचे ऋण मात्र तसेंच राहिलें ; तें फिटणार तरी कसें?

असा आहे साहित्य सभेचा रजत महोत्सवी भवनाचा इतिहास !

भैरव प्रकरण - एक अल्पित गंडांतर

सुखाच्या शिखरावर असताना दु:ख दाराशीं दबा धरून बसलें असून प्रवेशाच्या संधीची वाट पहात असतें याचीं जाणीव नसते असें कुणीतरी म्हटलें आहे ; त्याची साक्ष व्यक्तिजीवनांत तर पटतेच, पण पुष्कळ वेळां संस्थांचा देखील अनुभव तसाच असतो.
सन् 1935 चें विसावें मराठी साहित्य संमेलन जनतेच्या सहकार्यानें साहित्य सभेच्या निरलस कार्यकर्त्यांनीं जिवापाड कष्ट करून रास्त अभिमान वाटावा अशा थाटांत पार पाडल्याचा व प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा गांठल्याचा आनंद अद्यापि अंत:करणांत रेंगाळत होता; एवढेंच नव्हे  तर दानशूर इंदूर नरेशांच्या औदार्यामुळें  नगरांतील प्रमुख मार्गावरील दोन मजली इमारत समोरच्या मोकळया जागेसह अल्प किंमतींत सभेच्या ताब्यांत आल्यानें तो द्विगुणित झाला होता. मोकळया जागेवर भवन बांधून सभाकार्याचा विस्तार करण्याचें स्वप्न नव्हे तर महत्वाकांक्षा साकार करण्याच्या दिशेनें पावलें पडूं लागली होती.

1941 चें साल; अनेक कारणास्तव लक्षांत राहील असें. सभेचा रजत महोत्सव टोलेजंग प्रमाणावर हर्षोल्लासांत साजरा झाला. त्याची मधुर स्मृति चिरकाल टिकावी म्हणून भूमिपूजन करून भवन निर्माणास कार्यकर्त्यांनी उत्साहानें प्रारंभ केला. बांधकामाची जबाबदारी अनुभवी ठेकेदार हेमचंद्र डे यांजकडे सोंपविली होती. पाया खोदायला सुरूवात झाली मात्र आणि एक अकल्पित विघ्न दत्त म्हणून समोर उभें ठाकलें.

त्याचं असं झालं. साहित्य सभेच्या आवारांत एक दगड होता. कोणा तरी भक्तानें(?) त्याला शेंदूर लावल्याकारणानें त्याचा भैरव बनला होता. त्याची पूजा-अर्चा होणें तर दूर राहिलें ; पण तो गटारीच्या कडेला असलेला केवळ एक साधा दगड होता. ही या पाषाणाची हकीकत. तरीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखविल्या जाऊं नयेत यासाठीं कार्यकारी मंडळानें दि. 22-1-49 च्या बैठकींत साधक बाधक विचार करून असा निर्णय घेतला कीं पायाच्या कामांत अगदीं मध्येंच येणारी ही भैरव-मूर्ति(?) तूर्त हलवून सभागृहांत सूरक्षित ठेवावी आणि बांधकाम आटोपल्यावर योग्य स्थानीं तिची पुन:स्थापना करावी.

ही अवघड जबाबदारी श्री. मा.स.रावरेकर यांजकडे सोंपविण्यांत आली. फेब्रुवारी 1941 त भैरव स्थानांतरित झाला. जे झालें ते रीतसर व निवध झालें अशा समजुतीनें सर्वांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. पण ती वादळापूर्वीची शांतता होती. भावी संकटाची चाहूल कोणासच लागली नाहीं. दिनांक 16-2-41 ला गृहप्रवेश दिन थाटांत साजरा झाला. दोन दिवस सुरक्षित पार पडले. दि. 19-2-41 च्या वृत्तपंत्रात भैरवाच्या स्थानांतराचें वृत्त भडक शब्दांत प्रसिद्ध झालें. पेटूं घातलेल्या वणव्याची ती पहिली ठिणगी होतो.

दि. 22-2-41 चा दिवस. सभेचे चिटणीस श्री. मा.सा. रावरेकर यांना तोपखाना पोलिस चौकीवर प्राथमिक चौकशीसाठीं बोलावण्यांत आले. त्यांनी खुलासा केला : "भैरव सभेच्या आवारातला म्हणून सभेचाच . बांधकामांत तो मध्येंच येतो म्हणून तात्पुरता हलविणें आवश्यक होते." भैरव कोठे आहे? आम्हांस दाखवाल कां? असें पोलिस अधिका-यानें  विचारतांच होकारात्मक उत्तर दिलें. त्यानेें स्वत: सभेंत येऊन भैरव सुव्यवस्थित ठेवला असल्याची खात्री करून घेतली. तरीही दि. 14 ते 22 या अवधींत नवजीवन सारख्या हिंदी पत्रांतून हें वृत्त विपर्यस्त स्वरूपांत दिलें जाऊन सभेविरूद्ध जनमत कलुषित करण्याची मोहिम उघडण्यांत आली.

अध्यक्ष या नात्यानें श्री. वि. सी. सरवटे यांनीं स्पष्ट केलें कीं " भैरूजी सभाभवन में सुरक्षित है। किसी की धर्मभावना को ठेस पहुँचाने की सभा की कतई इच्छा नहीं। भवन निर्माण में बाधा न हो इस लिये कुछ समय के लिये मूर्ति को उठा कर भीतर रखा है। बांध काम पूरा होते ही भैरवजी की विधिवत् स्थापना करने का निर्णय कार्यकारिणी ने पहिले ही लिया है।"

हा खुलासा प्रमुख हिंदी व मराठी वृत्तपत्रांकडे पाठविण्यात आला. नवजीवन लोकमान्य, केसरी, नवाकाळ, स्वराज्य यांत तो छापला गेला. होळकर संस्थानचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस, संचालक लोक शिक्षण यांनाही कळविण्यांत आले. या संबंधांत आवश्यक ती सर्व कार्यवाही, विशेषत: कोर्टकचेरींत प्रकरण गेल्यास श्री. रावरेकरांचा बचाव करण्याचा व त्यासाठीं पडेल तो खर्च करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळानें अध्यक्षांस दिला.

अध्यक्ष श्री.वि.सी. सरवटे यांनीं तांतडीनें व मोठया धैर्यानें पावलें टाकलीं. श्रीगणेश मंडळ, महाराष्ट्र ब्राह्यण सभा, इत्यादि सनातन हिंदुधर्माभिमानी संस्थांच्या पदाधिका-यांस सभेंत मुद्दाम आमंत्रित करून भैरूजी दाखविला आणि वस्तुस्थिती समजावून सांगितली. प्रधानमंत्री कर्नल दीनानाथ यांना पाठविलेल्या पत्रांत त्यांनी लिहिलें "साहित्य सभा हिंदूंची. तिला मंदिरांबद्दल, मूर्तीबद्दल इतर कोणाच्या एवढाच आदर. ती हिंदूच्या धार्मिक भावना दुखवील हें स्वप्नांत देखील असंभव. तूर्त हलविलेल्या मूर्तीची सभा पुन: रीतसर स्थापना करणार असल्यानें कोणाही समंजस माणसास झाल्या प्रकारांत कांहींच गैर वाटण्याचें कारण नाहीं. तथापि सरकारला न्यायालयाचा कल हवा असल्यास संस्था प्रमुख या नात्यानें आरोपी मला करा. चिटणीसांनी माझ्या आदेशाचें पालन केलें असल्यानें ते दोषी नाहींत."

दि. 25-2-41 ला सकाळी श्री. रावेरकरांना चौकीवर पुनश्च पाचारण करण्यांत येऊन इंडियन पीनल कोड कलम 295 अन्वये त्यांच्यावर व दोन संशयित मजूरांवर आरोप ठेवण्यात आला. हें वृत्त समजतांच प्रख्यात कायदेपंडित श्री.नी.ह. द्रविड तात्काल चौकीवर आले आणि रू. 2000/- चा जामीन भरला. चिटणीसांनी रू.1000/- चा जातमुचलका भरल्यावर त्यांची मुक्तता झाली. मजुरांना देखील  अशाच अटींवर सोडून देण्यांत आलें.

श्री रावेरकरांची सुटका झाली खरी. पण परिस्थितीनें घेतललें वळण भीषण भवितव्यतेची कल्पना देण्यास पुरेसे होते. अध्यक्षांनी प्रधान मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची नकल तत्कालीन गृहमंत्र्यांकडे धाडली आणि श्री. रावेरकर हे संयोगितागंज हायस्कूलमध्यें वरिष्ठ सहायक शिक्षक असून झाल्या प्रकारांत व्यक्तिश: त्यांचा कांही ही दोष नाहीं, त्यांनी केवळ कार्यकारी मंडळाच्या निर्णयाची अमलबजावणी केली आहे ही गोष्ट स्प्ष्ट केली. तसेंच संचालक लोकशिक्षण यांच्याकडेही अशाच आशयाचें पत्र पाठवून स्वत: प्रधानमंत्री या प्रकरणांत लक्ष घालीत असून पोलिसांनी तूर्त खटला भरूं नये असे त्यांनी सांगितले असल्यानें शिक्षा विभागानें घाईघाईनें कोणतीही कार्यवाही करूं नये अशी विनंती केली.

इकडे भैरव रक्षा समितीनें सभेला जास्तींत जास्त अडचणींत टाकण्याचा चंग बांधला. तोपखान्यांतील व्यापारी, धर्ममातंड (?) यांनी सनातन धर्म रक्षिणी, वर्णाश्रम धर्मरक्षिणी सभा यांची दारें तर ठोठावलीच पण दि. 24-2-1941 ला हिंदु जनतेची जाहीर सभा घेऊन भैरवाची मूर्ति पुन्हां स्थापित होई पर्यंत सभेने भवन निर्माण कार्य करूं नये , केल्यास गंभीर परिणाम होतील व त्याची जबाबदारी सर्वस्वी सभेवर राहील असा धमकीवजा ठराव पसार केला.

सभेच्या अध्यक्षांनीं देखील सनातन धर्मरक्षिणी व वर्णाश्रम धर्मरक्षिणी सभांना पत्रें पाठवून वस्तुस्थितीचें प्रत्यक्ष अवलोकन करण्याची विनंती केली. नगर हिंदुसभेला पाठविलेल्या पत्राचें उत्तर दि. 28-2-41 ला आलें. त्यांत  "सभाके अध्यक्ष द्वारा मूर्ति की पुन: स्थापना करने का स्पष्ट आश्वासन दिये जाने पर अब किसी प्रकार की शंका या असंतोष का कोई कारण नहीं। मंदिर बनने तक हिंदु जनता धीरज से काम ले।"अशा आशयाचा ठराव संमत झाला असल्याचें कळविलें. मात्र भैरव रक्षा समितीनें आपल्या प्रक्षोभक कारवाया चालूच ठेवल्या. समितीचे मंत्री श्री. आर. एस्. तिवारींनी "बांधकाम ताबडतोब बंद करा; मूर्तीची स्थापना करा. चळवळ वाढत आहे" अशी सभेला तार केली. तिचें उत्तर तारेनेच देऊन बांधकाम बंद करण्यास असमर्थ असल्याचें सभेच्या अध्यक्षांनी कळविलें.

प्रधानमंत्री कर्नल दीनानाथजींनी उभयपक्षांनीं संयुक्त बैठक घेऊन सामोपचाराने हें प्रकरण निकालांत काढावें असें कळविलें. परंतु ही बैठक होण्यापूर्वीच संचालक लोकशिक्षण यांच्याकडून संयोगितागंज हायस्कूलच्या मुख्याध्यापकांस "वरिष्ठ अध्यापक श्री रावेरकर यांना 295 कलमान्वये पोलिसांनी अटक करून जामीनावर सोडलें आहे. त्यांना निलंबित का करूं नये?" असें पत्र आलें. मुख्याध्यापक श्री. बदरूद्दिन यांनीं बाणेदारपणें उत्तर पाठविलें कीं "हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा नाही; न्यायालयांत आरोप सिद्ध होईपर्यंत कोणास निलंबित करणें न्यायास धरून होणार नाहीं. शिवाय ही विभागीय चौकशी नसल्यानें शाळेंत श्री. रावेरकरांच्या उपस्थितीनें चौकशींत अडथळा येण्याचा अजिबात संभव नाही. म्हणून निलंबनाची शिफारत करतां येत नाही."

भैरव रक्षा समितीच्या अनुयायांनी कायदा धाब्यावर बसवून दि. 4-3-41 ला बांधकामाची नासधूस करून अडथळे आणले. चॅरिटेबल विभागाचे अधिकारी श्री शिंदे यांनीं वस्तुस्थितीचें बारकाईनें अवलोकन करून भैरूजीचें मंदिर नव्हते, कच्च्या  ओटयावर तो होता; बांधकामानंतर तो परत ठेवणार आहेत असें तारेने श्रीमंत महाराजांच्या सेवंते वे कळविलें.

प्रजामंडळाच्या कामासाठी श्री सरवटे यांना बाहेर जाणें भाग असल्यानें त्यांच्या अनुपस्थितींत सभेनें श्री. के. दा.पुराणिक , श्री.गो. मुनशी व नी. ह. द्रविड यांजकडे सूत्रें सोंपविली. काम बंद करण्यासंबधी भैरव रक्षा समितीनें लकडा लावला होता. सभेनें खंबीरपणें नकार दिल्यावर बजाजचौकांत एक थातुरमातुर बैठक घेऊन  रक्षा समितीनें, दि. 13-3-41 पर्यंत काम न थांबविल्यास, सत्याग्रह सुरू करण्यासाठी धमकी दिली.

चॅरिटेबल विभागानें भैरवाचा पूर्व इतिहास लिहून पाठवा असें सभेस कळविलें. सभेनें त्याचें सविस्तर वृत्त धाडलें तें असें. सुतारगल्लींतील श्री.वी.के. गोळे यांच्या दुकानांतील तोलण्याच्या कामी येणारा हा सुमारें एक मण वजनाचा दगड. दुकान 1939 मध्यें बंद पडले तेव्हा हा दगड दुकानसमोरील गोंदीच्या झाडाखाली टाकण्यांत आला. त्याला कोणीतरी शेंदूर फासला. फुटपाथ बांधतांना हें झाड पाडलें गेलें आणि हा सिंदुरचर्चित दगड गटारीच्या पलीकडे सरकारी जागेंत सरकावला गेला. ही वादग्रस्त भैरवाची जन्मकथा. पुढें ही जागा सभेच्या ताब्यांत आली आणि तिनें तिनें बांधकाम सुरू करतांच या विधिवत् स्थापन न झालेल्या उपेक्षित भैरवाचे भक्तगण अचानक जागे झाले आणि त्यांनी बखेडा उपस्थित केला. भैरवाचा साद्यंत इतिहास माहित असूनही कोणाच्या धार्मिक भावनांना धक्का  लागू नये यासाठीं सभेनें स्वत: होऊन बांधकाम पूर्ण होतांच भैरवाची पुन:स्थापना करण्याचा निर्णय घेतला असल्यानें कोणालही प्रक्षुब्ध होण्याचें कारण नाही. दगडासंबंधीची लेखी हकीकत श्री.व्ही. के. गोळे यांच्या व आसपासच्या रहिवाशांच्या साक्षीदार या नात्यानें स्वाक्षर्रीसह धाडण्यांत आली. तसेंच एक खुलासेवार निवेदन श्रीमंत महाराज व प्रधानमंत्री यांजकडे पाठवून भैरव रक्षा समिती वस्तुस्थितीचा कसा विपर्यास करीत आहे हें निदर्शनास आणलें..............

डेप्युटी इन्सपेक्टर जनरल ऑफ पोलिस यांना पत्र पाठवून सभेनें भूमीवर आक्रमण केल्याचा दि.11-3-41 च्या जाहीर सभेतील आरोप किती धादांत खोटा आहें  हें श्री.नी.ह. द्रविड यांनी सप्रमाण दाखवून दिलें व भैरव रक्षा समितीनें  दिलेली धमकी लक्षांत घेतां योग्य ती संरक्षण व्यवस्था करण्याची विनंती केली.दुर्देवानें पोलिसांनी तसा बंदोबस्त तांतडीनें न केल्याकारणानें उपद्रवी लोकांना मोकळें रान सांपडले. आठ सत्याग्रही (?) मध्यरात्रीं लाठ्या घेऊन आले आणि तारेचे खांब तोडून सामानाची नासधूस केली आणि  चौकीदारास मारहाण केली, एवढेंच नव्हे तर जिवें मारण्याची धमकी दिली. झाल्या प्रकाराची लेखी तत्कार श्री द्रवीड यांनी पोलिस चौकीवर नोंदविली. तसेंच प्रधानमंत्र्यांच्या खास मदतनीसास भेटून उभय पक्षांच्या प्रतिनीधींची संयुक्त बैठक शक्य तितक्या लवकर घेण्याची विनंती केली. लीगल रिमेम्ब्रन्सरलाही साद्यंत हकीकत कळवून सभेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी त्वरित पावलें उचलण्याबद्दल निवेदन केले.

सर्वसाधारण जनतेला खरा प्रकार काय आहे. तसेंच कायदेशीर दृष्ट्या बाजू लंगडी असल्यानें न्यायालयांत न जाता भैरव रक्षा समिती धर्मरक्षणाच्या बुरख्या खालीं गुंडगिरीच्या वाममार्गाचा कसा अबलंब करीत आहे हें कळावें यासाठीं सभेनें सविस्तर हस्तपत्रकें छापून ती वाटली.

दि.25-3-41 ला कोर्टांत हजर राहण्याबद्दल चिटणीस श्री.रावेरकर व दोन मजूर या संशयित आरोपीवर समन्स बजावण्यांत आले. त्यांच्या बचावासाठी सभेने श्री.ना.व्यं. करंजकर यांना वकील नियुक्त केलें.

अध्यक्ष श्री.के.दा.पुराणीक व कार्यकारी मंडळाचे अन्य सभासद यांनी जातीनें वा. वकीलमार्फत दि. 27 ला ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या कोर्टांत हजर राहून दक्षिणेकडील भितीचें बांधकाम कां बंद करू नये याचें कारण दाखविण्याबद्दल नोटिस बजावण्यांत आली.सभेच्या वतीनें श्री.दत्तोपंत भालेराव यांनी दि.27 ला कोर्टास निवेदल केलें की सभा स्वत:च्या मालकीच्या जागेवर नियमानुसार निर्माण कार्य करीत असल्यानें केवळ कांहीं उपदव्यापी लोकांच्या म्हणयाखातर तें बंद करणें कायद्यास धरून होणार नाहीं.

दि.26-3-1941 ला सभेनें सदस्यांची असाधारण सभा आमंत्रित केली व परिस्थितीची स्पष्ट जाणीव दिली. नमतें न घेतां खंबीरपणें या संकटाशीं झुंज द्यावी असाच कौल सभासदांनी एकमतानें दिला आणि कार्यकारी मंडळानें आवश्यक ते उपाय योजावेत, आपण त्यांच्या पाठीशी आहोंत असें आश्वासन दिलें.

वस्तुत: नगराच्या प्रमुख रस्त्यावर श्रीमंत महाराजांच्या औदार्यानें सभेस जागा मिळाली ही कांहीजणांची पोटदुखी होती; भैरव प्रेम हा केवळ देखावा होता. दुर्देव असें कीं ज्यांनी समतोल मनानें न्यायसंगत निर्णय नि:पक्षपातीपणे घ्यायचा, त्यांतील कांही उच्चपदस्थ अधिकारी स्वस्त लोकप्रियतेच्या मोहाला बळी पडले. भैरव रक्षा समितीच्या पडद्याआडच्या, कायद्यापुढें न टिकणा-या, कारवायांना यश येऊन म्युनिसीपल कमिशनरमार्फत बांधकाम ताबडतोब बंद करण्याबाबत गृहमंत्र्यांच्या आदेश क्रमांक 675/28-3-41 ची प्रत सभेला मिळाली; निवेदन करावयाचें असल्यास दि.31-3-41 ला गृहमंत्र्यांना भेटावें असें त्यांत लिहिले होतें.

ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनें क्रि.प्रो. कोड कलम 144 अन्वये साहित्य सभेपासून दोनशे यार्डाच्या परिसरांत मिरवणुकी, मोर्चे, प्रभातफे-या काढण्यास मनाई हुकूम दिला असूनही भैरव रक्षा समितीनें दि. 28-3-41 ला मिरवणूक काढून हुकूम धाब्यावर बसविला ही गोष्ट श्री.नी.ह.द्रविडांनी डे.इ.ज. पोलिसच्या निदर्शनास आणली. तसेंच गृहमंत्र्याना भेटून "केवळ दक्षिणेकडील भितीच्या बांधकामाबद्दल वाद आहे. त्याला ड्रिस्टिक्ट मॅजिस्ट्रेटनें मनाई केली आहे. परंतु शेष बांधकाम व जुन्या इमारतीची डागडुजी बंद करण्याचा हुकूम अन्यायमूलक तर आहेच पण त्यामूळें सभेची अपरिमित हानि होत असल्यानें तो मागे घ्यावा" असे निवेदन केलें व कॅबिनेटच्या कानावर समग्र हकीकत घालून गृहमंत्र्यांचा हुकूम रद्द करण्याबद्दल विनंती केली 28-4-1941.

दिनांक 30-4-41. श्री. रावेरकरां विरूद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या निकालाची तारीख. निकालावर त्याचें भवितव्य अवलंबून होतें. दोषी ठरल्यास तुरूंगवास, नोकरीला अर्धचंद्र, समाजात अप्रतिष्ठा आणि कुटुंबपोषणावी विवंचना. सर्वांवरच विलक्षण मानसिक ताण होता; परस्पर विरूद्ध विचारांनी थैमान घातलें होतें. न्यायालयाकडे जाणा-या  कार्यकर्त्यांचीं पावलें जड झाली होती.

न्यायाधीश स्थानापन्न झाले.निकालपत्रक वाचण्यास प्रारंभ केला, उत्सुकता ओसंडून वहात होती आणि शेवटी सत्याचाच जय झाला.निकाल संक्षेपांत असा "भैरव सभेच्या हद्दीत होता; अल्पकालावधीसाठीं हलविलेला, तोही दुकानें व रहदारी चालू असतांना, तिघेही  आरोपी हिंदु ; कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा त्यांचा हेतु नव्हता. कलम 295 त नमूद केलेल्या हेतु , विध्वंस, विकृति, विद्रुपता या गोष्टी प्रस्तुत प्रकरणी सिद्ध झाल्या नसल्यानें श्री रावेरकर व दोन्ही मजूर यांना दोषमुक्त करण्यांत येत आहे" निकालामुळें सभेच्या कार्यकर्त्यांत आनंदाची लाट उसळली. सभेच्या पत्रिकेंतील अनिष्ट ग्रहांची जागा शुभ ग्रह घेत असल्याची ती जणूं नांदी होती.दि. 19-5-41 च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकींत कॅबिनेटनें गृहमंत्र्याचा बांधकाम मनाई हुकूम रद्द केला असल्याचें आनंददायक वर्तमान श्री द्रविडांनी सांगितले.

डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा मनाई हुकूम रद्द करण्यासाठी सभेनें उच्च न्यायालयांत अपील केलें. इकडे म्युनिसीपल अपील कमिटीचे अध्यक्ष रा.ब.सेठ हीरालालजी यांनीं चॅरिटेबल विभागाचे नियम व म्युनिसीपालिटीचे नियम यांत विसंगती असल्यानें अपीलाचा निकाल लागेपर्यंत बांधकाम आहे त्याच स्थितींत ठेवावें असा आदेश दिला. त्यावर गृहमंत्र्याकडे दाद मागतांना अपील कमिटीचे अध्यक्ष विपक्षाच्या मिरवणुकीत, प्रभातफे-यांत जातीनें भाग घेत आहेत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करावी अशी विचारणा श्री. द्रविडांनी केली; शिवाय कॅबिनेटनें बांधकाम मनाई हुकूम रद्द केला असता त्याशी विसंगत आदेश देण्यास ते अक्षम आहेत हेंही निदर्शनास आणलें. तसेंच अध्यक्षांचे वकील या नात्यानें अपील कमिटीचे अध्यक्षात पत्र लिहून "माझ्या अशीलाला दिलेल्या बेजबाबदार, अन्याय, अधिकारबाह्य हुकुमामुळें जें आर्थिक नुकसान होईल त्याचें उत्तरदायित्व सर्वस्वी आपणांवर राहील " असे कळविलें.

कोर्टाचा निकाल सभेस अनुकूल लागत्ल्यानें भैरव रक्षा समिति अधिकच चवताळली, बेतालपणा वाढला. हस्तपत्रकें निघू लागली. असत्य, अर्धसत्य, अपप्रचार, हे त्यांचे विशेष.कोणा रमेशचंद्र चुलेट यांच्या सहीनें निघालेल्या पत्रकांत सभेनें नादिरशहा व औरंगजेब यांनाही लाजविलें अशा आशयाचा मजकूर होता." जे मंदिर तोडतात, ते उद्यां मशीद, परवा गुरूद्वारा यांचा विध्वंस करण्यास मागे पुढें पाहणार नाहींत"अशीं विधानें करून अन्यधर्मीयांस भडकावण्याचा प्रयत्न केला गेला. हें हस्तपत्रक काढणा-या व्यक्तीला व छापणा-या बाळकृष्ण प्रिंटिग प्रेसच्या मालकाला श्री. द्रविडांनी नोटिस दिली आणि समाजांतील भिन्न घटकांत वैमनस्य उत्पन्न करून सभेची बदनामी केल्याबद्दल बिनशर्त माफी व नुकसान भरपाई यांची मागणी केली.

दि.15-9-41ला रा. ब. सेठ हीरालालजीनीं सभेंत येऊन विवादग्रस्त स्थानाचें निरीक्षण केलें. संबंधित कागदपत्रेंही पाहिली. भैरव रक्षा समितीचेंही म्हणणें ऐकून घेतलें आणि लौकरच निर्णय दिला जाईल असें सूचित केलें.

श्री.रावेरकरांची निर्दोष मुक्तता करण्याचा ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या निर्णया विरूद्ध पोलिसांनी केलेला फेरतपासणी अर्ज जिल्हा न्यायाधीशांनी दि.18-9-41 ला नामंजूर केला. तसेंच सेठ श्री. कन्हैयालाल माहेश्वरी व सेठ विश्वनाथ लक्ष्मण सिन्नरकर यांनीं म्युनिसीपल अपील कमिटीकडे सभे विरूद्ध केलेल्या अपीलाचा दि. 12-11-41 ला विचार होऊन ते मुदतबाह्म व अपील करणारे कायद्यानें अक्षम या कारणांस्तव फेटाळण्यांत आलें.

दि.24-11-41 ला सेठ कन्हैयालाल माहेश्वरी व वि.ल. सिन्नरकर यांना सभेचे वकील श्री नी ह द्रवीड यांनीं नोटिस देऊन बांधकाम नऊ महिनेपावेतो बंद ठेवण्यास कारणीभूत असल्याबद्दल नुकसानीचे रू.5000/-, बुडविलेल्या संभाव्य उत्पन्नाचे रू. 2000/- अशी रू. 7000/-ची भरपाई आठ दिवसांच्या आंत करून देण्याची मागणी केली व तसें न केल्यास कोर्टांत दावा करून वसूली केली जाईल अशी समजही दिली.

यापूर्वी दि. 15-11-41ला अपील कमिटीनें बांधकामाची परवानगी कायम  केली होती त्यावर श्री सिन्नकरांनीं परत अपील केलें. सभेस बांधकामाची परवानगी मिळाल्याकारणानें चिडलेल्या पोतदार दांपत्त्यानें पुन्हा एकवार धमकी, भैरवाची जाहीर पूजा करण्यावी घोषणा आणि हिंदुधर्माभिमान्यांना आवाहन. भक्तांची गैरसोय होऊं नये या साठीं पश्चिमेकडील खिडकींत भैरवाची मूर्ति ठेवली होती. पण भक्तांना(?) मूर्तिची मातब्बरी वाटत नव्हती. त्यांना सभेच्या चालत्या गाडयाला खीळ घालण्याचें अधिक  महत्व वाटत असल्यानें त्यांनी दक्षिणेकडील पत्र्याची पूजा केली आणि अपीलाचा निकाल लागण्याची वाट न पाहतां सत्याग्रह आरंभला. न्यायालयांत भैरव रक्षा समिती अयशस्वी होते हें गौड बंगाल तर खरेंच; पण एकूण प्रश्नाला नाहक भाषिक स्वरूप कसें आले होते याचा विचार केल्यास तें उलगडण्या सारखें आहें. कांहीं मराठी  भाषिकांनी विरोधकांशी हातमिळवणी करावी हें दुर्देव !

अखेरीस सभेने श्रीमंतांकडे धाव घेऊन त्यांच्या कानांवर आजवरची साद्यंत हकीकत घातली व जातीनें लक्ष घालून या प्रकरणाचा व मन:स्तापाचा समाधानकारक शेवट करावा अशी प्रार्थना केली.

इकडे श्री. नंदलाल पोतदारांनी पत्रक काढलें आणि दि. 30-11-41 ला पत्र्याला टेकून केलेली भैरवचित्राची तांत्रिक पूजा विधिवत् असून धर्मनिष्ठांना निर्बाधपणें अर्चना करण्याचा अधिकार मिळेपावेतो स्वत: पत्नी सौ. कमला, एक वर्षाची मुलगी व "गजानन शिशु" आमरण अनशन करणार असल्याचें घोषित केलें. परंतु दि. 6-12-41 ला ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनें साहित्य सभेच्या आसपास 200 यार्डांच्या परिसरांत कलम 144 लागू केलें.

श्रीमंत सरकार माधवराव किबे यांनी प्रधानमंत्री कर्नल दीनानाथ व श्रीमंत महाराज यांना भेटून मध्यस्थी करण्याचें ठरविलें. त्याच सुमारास एक अनपेक्षित घटना घडली. पोलिस खात्याचे मुख्याधिकारी श्री. हॉर्टन यांनी विवाद्य स्थळास अचानक भेट देऊन पाहणी केली. दि. 3-1-42 ला श्री. वि. सी. सरवटे यांना श्री. हॉर्टन यांचें पत्र आलें "उभय पक्षांना मान्य असा तोडगा काढून भैरव लढा मिटवावा अशी श्रीमंतांची आज्ञा झाली असल्यानें दि. 4-1-42 ला सकाळीं दहा वाजतां माझ्या निवासस्थानी भेटावें. आपणाप्रमाणें श्री. के. दा. पुराणीक, श्री. कन्हैयालाल भंडारी, रा.सा.सेठ जगन्नाथजी, चॅरिटेबल सुरिंटेंडेंट श्री. पटवर्धन यांनाही बैठकीचें निमंत्रण पाठविलें आहे" असा पत्रांत मजकूर होता. पत्रानुसार सभेचे प्रतिनधि श्री हॉर्टन यांस भेटले व आजवरचा घटनाक्रम, न्यायालयाचे निकाल इत्यादि गोष्टी सविस्तर सांगितल्या.

सभेकडून सामोपचाराची सिद्धता नि:संदिग्ध रीत्या दर्शविली गेली असूनही व 144 कलम चालू असूनही भैरवाची  पूजा निर्वेध चालू होती आणि सभेची बदनामी करणें, द्वेषभावना फैलावणें यांत खंड पडला नव्हता. दि. 6-2-41 ला भैरवाची जाहीर पूजा झाली; 144 कलमाची मुदत संपल्याची जणूं ती जाहिरात होती, आग्यावेताळ जागा झाल्याची सूचना होती. त्वरित हातपाय हालविणें अपरिहार्य होते.

इंदूरमधील मराठी संस्थांनी सभेबद्दल सहानुभूति व्यक्त करून भैरव प्रकरणाचा न्यायोचित सोक्षमोक्ष सत्वर लावण्याची श्रीमंतांस विनंती केली आणि दि. 17-3-42 ला जाहीर सभा घेऊन अशा आशयाचा प्रस्ताव संमतीनें स्वीकृत केला व तो श्रीमंताकडे पाठविला.

मध्यंतरी "देवासुरसंग्राम" या नांवानें प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या लेखका  विरूद्ध व प्रकाशका विरूद्ध व कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सभेने  घेतला. तसेंच वारंवार कोर्टांत तारखा वाढवून घेणें त्रासदायक असल्यानें लवादानें लवकर निकाल लावावा अशी श्री. सरवटे यांनीं श्री. हॉर्टनना विनंती केली.

अखेरीस दि. 8-4-42 ला साहित्य संभेचे प्रतिनिधी व भैरव रक्षा समितीचे सभासद श्री. हॉर्टन यांना भेटले. सविस्तर चर्चा झाली. लवादानें निर्णय दिला "चालू बांधकामांत दक्षिणेकडील दर्शनी बाजूस उभारलेल्या पांच खांबापैकी मधल्या खांबापुढें दिलेल्या मापाची फरशी ठेवून दक्षिणाभिमुख आहे तसाच भैरूजी गुमटी सह ठेवला जावा" लवादाचा निकाल तोंडी होता. बांधकाम बंदी उठविण्याच्या दिशेनें हालचाल होत नव्हती संबंधित अधिका-यांस स्मरणपत्रें पाठविली. बांधकामाचा वाढता खर्च, कर्जाचा बोजा यामुळें सभेवरील दडपण वाढत होते. पुन्हां एकवार श्री. सरवटे यांनी श्रीमंत महाराजांची भेट घेतली (दि. 20-5-42)

शेवटी एकदाचें  दि. 10-6-42 ला आय.जी. पोलिस कडून पत्र आलें. त्यांत दि. 8-4-42 च्या निकालाचा उल्लेख व भैरव कोठें बसवायचा याचा आराखडा होता. त्याच दिवसी चॅरिटेबल सुपरिंटेंडेंट कडून बांधकाम बंदीचा हुकूम मागे घेतल्याची शुभ वार्ता पत्रद्वारें कळली.

अशा प्रकारें तब्बल अठरा महिने ज्या विलक्षण मानसिक ताणाखाली सभेच्या कार्यकारी मंडळास काढावे लागले तो नाहींसा होऊन सभेवरील गंडांतर टळले आणि जनमानसांतील तिची प्रतिमा उजळली.परीक्षा पाहणा-या प्रकरणावर सुखद पडदा पडला. मात्र बांधकामाच्या स्थगन आदेशांच्या अटकावामुळें सुमारें दीड वर्ष बांधकाम स्थगित राहिल्यामूळें, भवनाच्या निर्माण खर्चांत युद्धजन्य महागाईमुळें अपेक्षेबाहेर वाढ होऊन सभेला सुमारें बीस हजार रूपयांचा फटका बसला.

भैरव प्रकरण म्हणजे सभेच्या कार्यकर्त्यासांठी अग्निदिव्यच होतें. त्यांच्या निष्ठेची प्रखर कसोटी होती आणि कौतुकाची गोष्ट अशी की सा-यांनीच हिरीरीनें संकटाला खंबीरपणें तोंड दिलें; मागें हटण्याची भाषा कोणाच्याही तोंडून निघाली नाहीं. धीरोदात्तपणें व्यूहरचना करणारे श्री. वि.सी. सरवटे, त्यांच्या अनुपस्थितींत अध्यक्षपदाची सूत्रें  सांभाळणारे श्री.के.दा. पुराणीक, कायदेपंडित श्री. नी. ह. द्रवीड, श्री.गो. मुनशी, ना. व्यं. करंजकर  यांचे वकिली कौशल्य व अखंड सावधानता यांच्याकडे या प्रकरणांतील यशाचा सिंहाचा वाटा जातो. त्यांचें  ऋण शिरी बाळगण्यास सभेस नेहमींच भूषण वाटेल.

श्री. रावेरकरांबद्दल काय बोलावें? त्यांनीं तर सर्वस्व पणाला लावले होते. कुटुंबपोषणाचें साधन असलेल्या नोकरीवर पाणी सोडावें लागण्याची वेळ आली होती; शिवाय समाजांत अप्रतिष्ठा होण्याची तरवार मस्तकावर लटकत होती. पण धन्य आहे त्यांच्या धैर्याची; दैवाचे फासे प्रतिकूल पडले तरीही सभेवरील त्यांच्या प्रेमांत तसूभराचे अंतर पडलें नाही.

सन 1942 च्या अहवालांत त्यांच्या विषयीं दिलेल्या मजकुराचा कांहीं भाग असा."गेली पांच वर्षें यांनी सभेचे काम अत्यंत समरसतेनें केलें. गेल्या दीड वर्षांत त्यांची कार्यनिष्ठा कसास लागली. भैरव प्रकरण निकालांत निघाले व रावेरकर पुरेपूर कसोटीस उतरले. अशाच वेळीं बदली झाल्यानें सर्वांस वार्इट वाटलें. सभेलें निरोप देण्यासाठीं एक गोड सभारंभ घडवून आणला. सर्व मित्रमंडळीनीं त्यांच्याबद्दल जिव्हाळयाच्या भावना व भावी उत्कर्षाबद्दल शुभेच्या व्यक्त करून जड मनानें त्यांना निरोप दिला."

भैरव प्रकरणाचा निकाल शिष्टसंमत व न्यायिंगत लागला म्हणूनच श्रीमान सेठ हीरालालजी कासलीवाल यांनी रू. 5000/-, श्रीमान सेठ कन्हैयालाल भंडारींनी रू.2000/-, श्रीमान सेठ गोविंदराम सेकसरीयांनी रू. 1000/-, व श्रीमान सेठ खानबहादुर यांनी रू. 500/-, सभेस देणगीदाखल दिले. विकोपास गेलेंले भांडण एकोप्यानें संतोषप्रद रीतीनें मिटलें एवढेंच नव्हे तर त्यांची फलश्रुति अतिशय आनंददायक ठरली, हें "प्रसादचिन्हानि पुर:फलानी" या न्यायानें उज्जवल भविष्याचें शुभसूचक चिन्ह समजण्यास प्रत्यवाय नसावा.

सुवर्णमहोत्सव भवन

इंदूर नगरींतील प्रमुख रस्ता असलेल्या महात्मा गांधी मार्गावरील साहित्य सभेच्या डौलवर भव्य भवनाच्या चौकांत पूर्वेकडे तोंड करून उभे राहल्यास जाणकाराच्या लक्षांत एक गोष्ट तात्काळ आल्यावाचून राहत नाहीं. ती म्हणजे उजव्या हाताचा म्हणजे दक्षिणेकडील व डाव्या हाताचा उत्तरेकडील भाग वेगवेगळया वेळीं बांधले गेले आहेत ; आणि हें सत्य आहे. या दोन भागांच्या निर्मितींत जवळजवळ दोन तपांचें अंतर आहे. दक्षिणेकडील भागास रजतमहोत्सव भवन म्हटलें तर उत्तरेकडील भागास सुवर्ण महोत्सव भवन म्हणणें वस्तुस्थितीशीं सुसंगत ठरेल. महत्त्वाचा फरक येवढाच कीं रजतमहोत्सव-भवन रजत महोत्सवांनंतर तीन वर्षांनी पूर्ण झालें. तर सुवर्ण महोत्सव-भवन बांधून तयार झाल्यावर सुवर्ण महोत्सव संपन्न झाला.

सन 1965 मध्यें सभास्थापनेस पन्नास वर्षें पू्र्ण होत होती. त्यावेळची देशांतीत एकूण परिस्थिति उत्सव साजरे करण्याजोगी नव्हती. शिवाय सभेनें गांठलेली प्रतिष्ठापूर्ण पन्नाशी ही सभेच्या इतिहासातील महत्त्वाची घटना. ती संस्मरणीय करण्यासाठीं कांहीतरी चिरस्थ्यायी स्वरूपाचें कार्य केल्याविना केवळ चार दिवसांचा उत्सव साजरा करणें कार्यकारी मंडळास प्रशस्त वाटेना. 1936 मध्यें सभेनें विकत घेतलेली इमारत बरीच जुनी झाल्याकारणानें तिजवर दरवर्षी दुरूस्तीप्रीत्यर्थ दोनअडीच हजारापावेतो खर्च करावा लागे. वाढत्या व्यापामुळें जागेची टंचाईही तीव्रतेनें जाणवू लागली होती. सभेचे अध्यक्ष श्री. प. गो. जोगळेकर यांनी सर्व गोष्टींचा साधकबोधक विचार व जाणकार मंडळींशी सल्लामसलत करून तयार केलेल्या संकल्पित भवनाच्या आराखडयावर साधारण सभेंत चर्चा होऊन मान्यता मिळाली. तळघर आणि तीन मजले असलेल्या या निर्माण कार्याच्या खर्चाचा अंदाज लाख सव्वालाखाच्या घरांत होता आणि सभेजवळ एवढी पुंजी नव्हती म्हणून रू. पन्नास हजारपर्यंत कर्ज उभारण्याचा अधिकार साधारण सभेने कार्यकारी मंडळास दिला.

1966 च्या विजयादशमीस श्री सरस्वतीपूजन, पाठोपाठ भूमिपूजन झालें आणि बांधकामाचा नारळ फोडला गेला. तीन महिन्यांच्या अवधींत जुन्या इमारतीचा मलमा हटवून जागा साफ केली गेली आणि 10 फ्रेबुवारी 1967 रोजी प्रत्यक्ष कार्यास शुभारंभ झाला. कर्जासंबंधात प्रयत्न सुरू झाले. मागच्याप्रमाणें कर्जरोख्यांच्या स्वरूपांत आवश्यक रकम एकत्रित करण्यास परिस्थिति अनुकूल नव्हती. विमा निगम किंवा बँका यांचीं दारें ठोठावणें भाग होतें. सुदैवानें फारसे प्रयास न पडतां सभेची अडचण दूर झाली. बँक ऑफ महाराष्ट्रनें तीन हप्त्यांत सवलतीच्या व्याजाच्या दरानें (8%) रू. पन्नास हजार कर्ज देण्यास मान्यता दिली. प्रमुख अटी अशा-

  1. दक्षिण बाजूकडील दुसरा मजला व नव्या भवनांतील दुसरा मजला बँकेस सभेने भाडयानें द्यावा. बांधकाम शक्य तितकें लवकर पूर्ण करावें.
  2. एकेक मजला बांधून झाल्यावर त्याचें मूल्यांकन करवून घ्यावे. त्या आधारें बँक कर्जरूपानें कांही रकम सभेस देईल.
  3. संपूर्ण कर्ज मिळाल्यापासून एक वर्ष पावेतों सभेस परतफेडीची किस्त भरावी लागणार नाहीं. त्यानंतर प्रतिमास निश्चित किस्त भरून पांच वर्षांच्या अवधींत व्याजासह कर्जाची फेड सभेस करावी लागेल.

जुनी इमारत पाडण्यापूर्वी ग्रंथालय कोठें हलवायचें ही बिकट समस्या होती. परंतु इंदूर परस्पर सहकारी बँकेने कृष्णपु-यांतील आपल्या भवनांतील तळघर माफकभाडयांत सभेस द्यावयाचें मान्य केल्यानें समस्येचा गुंता सुटला. सुमारें वर्षभर सभासदांची थोडी गैरसोय झाली खरी. परंतु बांधकामाच्या अवधींत सभेच्या कोणत्याही शाखेच्या कार्यांत खंड पडला नाहीं हें कार्यकारी मंडळास निश्चित भूषणावह आहे.

नवभवन निर्माण समितींत पुढील व्यक्तींचा समावेश करण्यांत आला होता.

(1) श्री. प. गो. जोगळेकर इंजीनिअर (2) प्रख्यात कंत्राटदार श्री. नाईक इंजीनिअर (3) त्यांचेच सहकारी श्री. मतकर इंजीनिअर (4) गो. से. टैक्नॉलॉजिकल इन्सिटटूटचे प्रा. द. ग. ढवळीकर इंजीनिअर (5) कर्तबगार आर्किटेक्ट श्री. कमलाकर नातू (6) सभेचे सचिव श्री. प्रभाकर गोविंद घाटे पदसिध्द सभासद.

ज्या ठिकाणीं इमारत बांधली जायची तो तोपखाना म्हणजे नगरांतील भर वस्तीचा भाग, सदैव गजबजलेला. शिवाय रस्त्यावर सामान ठेवून रस्ता अडवायचा नाहीं असा नगरपालिका निगमचा लकडा आणि तीन बाजूस रस्ते असलेल्या परिसरात लोकांची नेहमी ये जा चालू. अशा अडचणींना तोंड देऊन तीन मजली भवन बांधायचे आणि तें देखील आठदहा महिन्यांचा अल्पावधींत म्हणजे बांधकाम समितीची कठोर परीक्षाच होती. आनंदाची गोष्ट अशी की समिती या कसोटीस पुरेपुरे उतरली.

सामान सभेनें खरेदी करावयाचें व केवळ मजूरीचा ठेका द्यायचा असें समितीनें ठरविलें. बाजारभाव पाहून माफक किंमतींत उत्तम सामान आणावयाचें व दैनंदिन कामावर प्रत्यक्ष देखरेख करावयाची हें काम श्री. प्र. गो. घाटे यांच्यावर सोंपविण्यांत आलें. श्री. नातू यांनी खिडक्या, दारे यांचे डिझार्इन तयार करून द्यायचें, आर.सी.सी. कामाकडे श्री. ढवळीकरांनी लक्ष पुरवायचे, श्री. मतकरांनीं मजुरीचीं बिलें मापानुसार तपासावयाची, आणि इतरांनी मधून मधून उपस्थित राहून काम बरोबर चाललें आहे किंवा नाहीं हें पहावयाचें अशी कामांची वाटणी करण्यांत आली. श्री. घाटे यांच्या प्रयत्नामुळें प्रा. स. दा. आपटे यांनीं सौजन्यपूर्वक आपल्या वाट्याचे सीमेंट सभेस दिल्यानें फार मोठी अडचण दूर होऊन विलंब टळला.

पहिला मजला बांधून तयार झाल्यावर बँकेने स्वीकृत कर्जापैकी रू. 25000/- चा पहिला हप्ता दिला. पुढेंही क्रमश: कर्जाचे हप्ते मिळाल्याकारणानें द्रव्याभावीं काम बंद ठेवण्याचा दुर्धर प्रसंग आला नाहीं.

1 नोव्हेंबर 1967ला दीपावलींतील लक्ष्मीपूजनाचा दिवस, त्या शुभ मुहूर्तावर बँकेस नव्या जागेंत व्यवहार सुरू करावयाचा होता. पुढील भागांत असलेल्या भाडेकरूंना हलवल्याशिवाय तें शक्य नव्हते. कोर्टकचेरी करून हा प्रश्न लवकर व समाधानकाराकपणें सुटणारा नव्हता. कार्यकारी मंडळाच्या इच्छेनुसार श्री. प्र. गो. घाटे यांनी सर्वांशी बोलणी केली, सभा आपलीच समजून तिच्या उत्कर्षासाठीं आत्मीयतापूर्ण सहयोग कर्तव्यभावनेनें द्यावा असें कळकळीनें आवाहन त्याना केलें आणि त्याचा सुपरिणाम असा झाला कीं योग्य तो प्रतिसाद मिळून अजिबात आढेवेढे न घेतां हे भाडेती मागच्या वाजूच्या नव्या भवनांत येण्यास राजी झाले.

या आठदहा महिन्यांच्या बांधकामाच्या अवधींत मागच्या भैरव प्रकरणासारखें गाजावाजा होणारें प्रकरण नाहीं हें खरें. मात्र सर्व कांहीं सुरळितपणें पार पडलें असें समजण्याचें कारण नाहीं. एक उल्लेखनीय प्रसंग असा ! मागील बाजूची जुनी इमारत पाडून नव्या बांधकामासाठीं जागा मोकळी केली. त्यावेळीं कोणीतरी हितशत्रूनें, सभेची ही जागा नगरपालिकेने ताब्यांत घेऊन त्या ठिकाणीं  महात्मा गांधी मार्गा सारख्या सतत वाहत्या पण अरूंद रस्त्यावरील वाहनांसाठी "थांबण्याचें स्थान" (Parking Place) म्हणून उपयोग करावा अशी सूचना केली. त्यानुसार नगरपालिकेचे अधिकारी पाहणी करण्यास येणार असल्याचा सुगावा श्री. घाटे यांस लागला. दोन दिवसांची सुटी असल्यानें पाहणी त्यानंतर होणार होती. तांतडीनें पावलें टाकणें अत्यावश्यक होते. म्हणून ताबडतोब मजूर वाढवून व दिवसरात्र काम चालू ठेवून तळघराचे खांब उभे केले गेले.नगरपालिकेचे अधिकारी आले, तेव्हां बांधकाम पाहून पार थिजले. पार्किंग प्लेसची कल्पना "उत्पद्यंते विलीयंते" या न्यायानें बारगळली. अशा कितीतरी अडचणी आल्या आणि गेल्या ; बांधकाम मात्र चालूच राहिले.

या नव्या बांधकामाचें वैशिष्टय असें कीं अन्यत्र पाहण्यांत येतें त्याप्रमाणें वरील मजल्यावर खांबाचा आकार लहानलहान  न होता जेवढा मोठा खांब तळघरांत तेवढाच मोठा खांब पन्नास फूट उंचीवरील गच्चीवर दिसतो. त्यामुळें पुढें कधीं परवानगी मिळाली तर आणखी पन्नास फूट उंचीची इमारत बिनदिक्कतपणें बांधता येईल अशी मजबुती त्यांत आहे. नगरांतील अनेक इंजीनिअर, विशेषत: लोकनिर्माण विभागाचे कांहीं अधिकारी कुतूहलानें बांधकाम पाहण्यासाठी आले व त्यांनीं मोकळया मनानें कौतुक केलें.

इतकी मजबूत व भव्य इमारत प्रत्यक्ष बांधून झाली ती मात्र सहजासहजी विश्वास बसणार नाहीं इतक्या अल्पखर्चांत. नव्या बांधकामाचें रीतसर मूल्यांकन झालें, सुमारें दोन लाखाचें आणि वास्तविक खर्च मात्र दोन तृतीयांशापेक्षांही कमी. याचें श्रेय भवन समितीच्या सभासदांच्या आपुलकीनें  ओथंबलेल्या दक्षतेला आहे. घाटेबंधू, खांडेकर बंधू या मंडळीनी हें कार्य घरचेंच समजून, तरी करणें, सामान मोजून घेणें, मजुरांवर लक्ष ठेवणें इत्यादि कामें आस्थेनें केलीं. एकूण बांधकामांतील श्री. प्र. गो. घाटे यांची जाण पाहून "परीक्षा न दिलेले  विश्वसनीय एक्झीक्यूटिव्ह इंजीनिअर" असा गौरवपूर्वक उल्लेख श्री. प. गो. जोगळेकरांनीं अनेक वेळां जाहीर रीत्या केला आहे. या सर्वांचें, विशेषत: भवन निर्माण समितीच्या सभासदांचें, ऋण येवढें मोठें व महत्त्वाचें आहे की सभेस त्याचा विसर पडणें तर दूरच राहिलें, उलट तें सदैव शिरी बाळगण्यास भूषणच वाटेल.

नवभवन निर्माणाचा इतिहास आणखी एका उल्लेखावाचून अपुरा राहील. बांधकामासाठीं काढलेल्या कर्जाची परत फेड 1968 पासून सुरू झाली. बँकेकडून मिळणा-या भाडयांतून नियमित किस्त जमा होत होती, तिमाही व्याज ही दिलें जात होतें आणि कौतुकाची गोष्ट अशी कीं मुदत पूर्ण होण्याच्या चौदा महिने अगोदार कर्जाची व्याजासह संपूर्ण परतफेड करून सभेस कर्जमुक्त करण्यांत आलें, तें केवळ अतिशय टापटिपीनें, अनाठायी खर्चास फांटा देऊन, काटकसरीनें सभेचा संसार करूनच, भवन निर्मितीसाठीं एका पैशाचीही देणगी न घेतां. याबद्दल कार्यकरी मंडळ आणि अध्यक्ष, सचिवादि पदाधिकारी धन्यवादास पात्र आहेत.