मराठी साहित्य संमेलन, 1917

सन 1917 मध्यें इंदूरला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास मोठा उदबोधक आहे. आधी कळस मग पाया रे या लोकोक्तीचा प्रत्यय त्यानें आणून दिला. 1915 मध्ये मुंबईला मराठी साहित्य संमेलनाचे अधिवेशन झाले. त्याला साहित्यप्रेमी सरदार श्री माधवराव किबे उपस्थित होते. समारोप प्रसंगी पुढील अधिवेशनासाठीं कोणत्या तरी नगराकडून निमंत्रण यावयाचें हा प्रघात. पुणेकर निमंत्रण देण्यास उत्सुक होते पण तो मान इंदूरला मिळावा असा श्रीमंत किबे साहेबांनी आग्रह धरला, मात्र अडचण अशी-नियमानुसार निमंत्रण व्यक्तीनें न देतां एखाद्या साहित्य संस्थेचा प्रतिनिधि म्हणून द्यावयास पाहिजे आणि इंदूरमध्ये तर अशी एक ही संस्था अस्तित्वांत नव्हती. किबे साहेबांचे पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेंतही वजन होते त्यामुळे त्यांचा आग्रह डावलता येईना. शेवटी तोड अशी निधाली कीं पुढील अधिवेशनाचा प्रश्न तूर्त अनिर्णित ठेवावा.

इंदूरला परतताच किबे साहेबांनी नेटानें प्रयत्नास प्रारंभ केला आणि स्थानिक साहित्य भक्तांच्या सहकार्यानें मागें वर्णन केल्याप्रमाणें सप्टेंबर 1915 मध्यें महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना केली आणि सन 1917 मध्यें भरावयाच्या संमेलनाच्या नवव्या अधिवेशनासाठी रीतसर अक्षत दिली.

तांत्रिक अडचण दूर झाली असली, तरी संमेलनासाठीं लागणारी तयारी, आणि तीही नुकत्याच जन्माला आलेल्या संस्थेकडून होणें, सामान्य गोष्ट नव्हती त्यासाठीं प्रचंड खटाटोपाची, भगीरथ प्रयत्नांची गरज होती. कार्यकर्त्यानीं जबाबदारीचें स्वरूप ओळखले आणि ती यशस्वीपणें पार पाडण्यासाठीं सर्वजण जिद्दीनें व एकदिलानें कामास लागले.

संमेलन केवळ संस्थेपुरतेच मर्यादित नसते त्यासाठीं स्थानिक व परिसरांतील जनतेचें हार्दिक सहकार्य हवें, उच्चनीच, गरीब श्रीमंत, हा भेदभाव विसरून साहयांनीं एकजुटीनें झटलें पाहिजे. साहित्यप्रेमी जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठीं दि. 18-1-1917 रोजी महाराष्ट्र साहित्य सभेच्या वर्गणीदारांची व मराठी भाषेच्या अभिवृध्दि साठी उत्सुक व्यक्तींची जाहीर सभा श्री. किबे यांच्या अध्यक्षतेखाली इंदूर ग्रंथालयाच्या दिवाणखान्यांत भरली. या सभेत चिटणीस श्री.वा.गो. आपटे यांनी सातारला भरलेल्या मोजक्या लेखकांच्या लहानशा पहिल्या संमेलनापासून मुंबईच्या आठव्या संमेलनापर्यत धावता वृत्तांत सांगितला आणि पैशापेक्षांही मनुष्यबळाचें महत्व अधिक असल्यानें सर्वानीं तनमनधनानें सहयोग देउन स्वीकृत कार्य सिध्दीस न्यावें अशी विनंती केली.

स्टेट सर्जन डा. गो. रा. तांबे यांचेही या प्रसंगी भाषण झालें. शिक्षणाचा प्रसार, ग्रंथनिर्मिती व देशाची सर्वागीण प्रगति यासाठीं संमेलनांची उपयुक्तता किती आहे, याचें विवेचन करून इंदूर नरेश श्रीमंत तुकोजीराव होळकरांनी मराठी ग्रंथ लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठीं प्रति वर्षी रू. 2500/ची देगणी देण्याची जी उदार घोषणा केली तिचा स्थानिक लेखकांनीं लाभ घेण्यासाठीं संमेलनाच्या निमित्तानें साहित्य सभेच्या झेंड्याखाली एकत्र व्हावें असें आवाहन केलें. श्री ना.कृ.वैद्य, डा.गुप्ते, प्रा. कर्णिक यांनीही संमेलनाचें महत्व विशद करून सर्वतोपरी साह्य देण्याची व इंदूरचा लौकिक राखण्याची जनताजनार्दनास प्रार्थना केली. श्री वि.ल.नामजोशी यांनीं स्वयंसेवकांची वाण भासणार नाहीं असें विद्यार्थ्यांतर्फे आश्वासन दिले.

साधारण सभेंत मान्य झालेली श्री वा.ग.पंतवैद्य, वा.गो.आपटे व प्रा.ल.बा. देव ही चिटणीस त्रयी मोठ्या हुरूपानें कामास लागली. दि. 1-2-17 ला पहिलें प्रसिध्दिपत्रक निघाले. त्यांत संमेलनाच्या स्वरूपाची कल्पना देण्यांत आली. रू 25/- वा अधिक देणारे स्वागत समितीचे सभासद होतील असें स्पष्ट करण्यांत आले.. त्याचप्रमाणें संमेलनांत विचारार्थ ठेवल्या जाणाया विषयांची सूचना देण्यांत आली. ते असे-

 1. शिक्षण मातृभाषेच्या माध्यमांतून द्यावे.
 2. क्रमिक पुस्तकें जिज्ञासा वाढविणारी, व्यवहारज्ञान वाढविणारी, कर्तव्यांची जाणीव करून देणारी, विशाल दृष्टि देणारी असावीत.
 3. ठिकठिकाणी ग्रंथालयें व मोफत वाचनालयें उघडून ज्ञान-प्रसार करावा.
 4. निधि उभारून अप्रकाशित ग्रंथांचे प्रकाशन, विविध विषयांवर ग्रंथ-लेखनास प्रोत्साहन, इत्यादि कार्ये व्हावीत.
 5. मराठी ग्रंथांची व ग्रंथकारांची सूचि तयार करावी.
 6. संस्थानांतील ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रकाशन करण्याची संस्थानाधिपतींस विनंती करावी.

कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा. संमेलनाच्या स्थळाची, कार्यक्रमाच्या तपशीलाची, प्रतिनिधि निवासाच्या व्यवस्थेची, स्वयंसेवक नांव नोंदविण्यासंबंधीची बारीक सारीक माहिती जनतेला मिळत रहावी यासाठीं 15-20 दिवसांच्या अवधींत एकामागून एक पांच प्रसिध्दिपत्रकें निघाली. पुण्याचे सुप्रसिध्द साहित्यिक कवि व मर्मज्ञ पंडित रावसाहेब गणेश जनार्दन आगाशे यांनी संमेलनाध्यक्ष पद स्वीकारण्यास संमति दिली असून दि. 9-10-11 मार्च या दिवशीं बिस्को पार्कजवळ लेडीज क्लब समीप उभारल्या जाणाया भव्य मंडपांत मराठी साहित्य संमेलन साजनें होण्याचें निश्चित झालें आहे, त्या निमित्तानें अनेक नामवंत साहित्यिक व प्रतिष्ठित संस्थांचे प्रतिनिधि हजर राहण्याची शक्यता आहे, हे कानी येतांच साहित्यप्रेमी रसिकांत उत्साह संचारला आणि हां हां म्हणता वर्गणीने चार हजारांचा पल्ला गांठला.

मायभाषेच्या अभिवृध्दीसाठी मराठी भाषिकांनी एक दिलानें साहित्य सभेच्या झेंड्याखाली अहमहमिकेनें एकत्र यावें असे आवाहन करण्यासाठीं दि. 20-2-17 ला नंदलालपुरा नाटकगृहांत एक जंगी जाहीर सभा झाली. स्वागताध्यक्ष जनरल गोविंदराव मतकर, सरदार मा.वि.किबे , सौ. कमलाबाई किबे, डा.तांबे वगैरे मातबर मंडळी व्यासपीठावर विराजमान झाली होती. श्री.वा.गो.आपटे, श्री त्र्यं.ब.गोगटे, सौ.कमलाबाई किबे, डा.ताबें, श्री.ना.कृ.वैद्य यांची समयोचित भाषणें झाली. संमेलनाचा पसारा मोठा आहे, पूर्वानुभवाचा तोटा आहे, असें असले तरी राष्ट्र व कपिलाषष्ठी योग लाभत आहे हे लक्षांत घेउन मायभाषेचा जाज्वल्य अभिमान, कर्तव्यपरायणता, अभंग निष्ठा, एकजूट आणि जिद्द यांच्या जोरावर इंदूरकरांनी ही अवघड जबाबदारी पार पाडावी व नेत्रदीपक यशाचें माप पदरांत पाडून घ्यावें अशी प्रेरणा देण्याचें कार्य या तळमळीनें ओथंबलेल्या भाषणांनीं केलें आणि त्याला भरीव प्रतिसाद मिळाला.

संमेलनाच्या निमित्तानें कांही स्थायी कार्य व्हावे अशा हेतूनें विचार विनिमय करण्यासाठीं दि. 8-3-17 रोजी सरदार मा.वि.किबे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष निमंत्रितांची बैठक भरून कोश निर्मिती वर साधकबाधक चर्चा झाली. निधि, सोईस्कर स्थान, समर्थ लेखक, उत्साही कार्यकर्ते, हे सर्वच चिंतेचे विषय होते. सरदार वि.कृ.मुळये यांच्या प्रेरणेने हजारबाराशेच्या देणग्या पांचसहा वर्षे पर्यत देत राहण्याची आश्वासनें जागच्या जागी मिळाल्याकारणानें उत्साह वाढला.

श्री दाजी नागेश आपटे यांनीं साहित्याचे (1) ललित (2) आधिभौतिक (3) इतिहास, समाजशास्त्र (4) अध्यात्म असे विभाग करून त्यांची जोपासना करण्यासाठीं संघटित प्रयत्न व्हावेत असें सुचविलें उपस्थितांनीं या उपयुक्त सूचनेचें मन: पूर्वक स्वागत केलें. त्यासाठीं एक समिति नियुक्त करून तिच्या करवीं संमेलनांत येणाहया निबंधांचें वर्गीकरण करवून घ्यावें असें ठरले.

दि. 9-3-1917 या संस्मरणीय दिवशी प्रशस्त मंडपांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुभारंभ झाला. सहा हजारांवरील प्रेक्षकांच्या मुखांवर उत्साह ओसंडत होता. श्रीमंत तुकोजीराव (तृतीय) महाराजांचें दरबारी थाटांत आगमन होताच बंडवर राज्यगीत वाजविलें गेलें . उपस्थितांचें हार्दिेक स्वागत करण्या साठीं स्वागताध्यक्ष रा.ब.गोविंदराव मतकर उभे राहिले.

पुण्यश्लोक धर्मात्मा अमरकीर्ति देवी श्री. अहल्याबाईच्या आशीर्वादानें पावन झालेल्या या भूमींत, त्यांच्या पुत्रपौत्रांच्या राजधानींत मायभाषेवर अमर्याद प्रेम करणाहया बंधुभगिनींचा हा मेळावा पाहून भरते येणें स्वाभाविक आहे. मायभाषेची निरंतर आराधना करून वाड्मयांत भर टाकण्याची प्रेरणा देणारे अनुकूल वातावरण शिक्षणप्रेमी होळकर घराण्याच्या राज्यात असल्यानें आजपावेतो शिक्षण क्षेत्रांत व साहित्याच्या दालनांत उल्लेखनीय कार्य झालेलें आहे. हिंदी व मराठी या दोन्ही भाषा सख्ख्या बहिणीप्रमाणें गुण्यागोविंदानें नांदत आहेत. कवि, लेखक, सार्वजनिक कार्यकर्ते या भूमीनें घडविलें आहेत, सध्याच्या मनूला अनुकूल व समाजाच्या सर्वागीण प्रगतीसाठीं मार्गदर्शक अशी साहित्य-निर्मिती होणें ही आजची गरज आहे. त्या दिशेनें या संमेलनांत प्रयत्न व्हावेत अशी मनीषा व्यक्त करून रा.ब.गोविंदराव मतकरांनीं श्रीमंतांस संमेलनाचें उदघाटन करण्याची विनंती केली.

माय मराठीच्या सर्वांगीण उत्कर्षासाठीं एकत्रित झालेल्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीबद्दल संतोष व्यक्त करून श्रीमंतांनीं भाषणास प्रारंभ केला. राज्य शास्त्र, भौतिकशास्त्रे, अशा विविध विषयांवर लेखन होउन इतर भाषांना आदर्श असे ग्रंथ मराठींत निर्माण व्हावेत, सर्व साहित्यिकांच्या संयुक्त प्रयत्नानें मराठी भाषेचा विकास व मराठी साहित्याचीं अभिवृध्दि करणारी एखादी योजना या संमेलनांत तयार होउन या संमेलनास  भरघोस यश लाभावे अशी सदिच्छा प्रकट करून श्रीमंतांनीं आपल्या प्रभावी भाषणाच्या शेवटी संमेलनाचें उदघाटन केल्याची घोषणा केली.

यानंतर रा.ब.सरदार मा.वि.किबे यांनीं संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी रावसाहेब गणेश जनार्दन आगाशे यांचे नांव सुचविले. सुप्रसिध्द कवि, ग्रंथकार व लेखक या नात्यानें साहित्यरसिकांस सुपरिचित असलेले श्री आगाशे अध्यक्षपदासाठीं सर्वथैव योग्य असल्याचें श्री.किबे यांनीं आपल्या भाषणांत ठासून सांगितले. साहित्य सम्राट श्री.न.चिं.केळकर यांनी या सूचनेस अनुमोदन दिल्यानंतर रा.सा.ग.ज.आगाशे यांनी अध्यक्षपदाचीं सूत्रें हातीं घेतली.

आपल्या भाषणाच्या प्रारंभी पौरोहित्याच्या बहुमानाबद्दल अध्यक्षांनीं अंत: करणपूर्वक आभार मानले. राज्यकर्ते आणि प्रजाजन यांचें वाढतें सहकार्य हें भारत भूमीच्या भावी अभ्युदयाचें सुचिन्ह आहे. जनतेच्या आकांक्षाविषयीं केवळ सहानुभूति न दाखविता त्या प्रत्यक्षांत साकार करण्यासाठीं संस्थानिकही पुढें येत आहेत ही गोष्ठ स्वागतार्ह आहे, असें सांगून श्रीमंत गायकवाड व श्रीमंत होळकर यांजकडून मिळणाहया प्रोत्साहनाबद्दल त्यांनीं धन्यवाद दिले. शालोपयोगी व ग्रंथालयासाठीं संग्राह्य  अशा पुस्तकांच्या परीक्षणासाठीं नेमलेल्या समितींत केवळ सरकार नियुक्त सभासद असतात. तींत लोकनियुक्त प्रतिनिधींचा समावेश होणें अवश्य आहे. डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीला सरकारकडून  रू. 1500/- (रू. दीड हजार) चें अनुदान मिळते. पुस्तकांचें परीक्षण मोफत करावयाचें असतें व बहुतेक परीक्षक वयस्कर असतात त्यामुळें परीक्षणास बराच कालावधि लागतो. निरपेक्ष बुध्दीनें वेळच्या वेळीं परीक्षणाचें काम तत्परतेनें करणाहया व्यक्तींची निवड करणें आवश्यक आहे. नाटकें, कादंबहया यांचाही परामर्श घेउन अध्यक्षांनी मराठी भाषेचा नवीन अद्यावत् कोश तसेंच भौतिकशास्त्रें व औद्योगिक कला यांचें ज्ञान सुलभ भाषेंत करून देणारें साहित्य निर्माण करण्यावर भर देउन परिषदेच्या कार्याला सढळ हातानें द्रव्यसाह्य करण्याचें आवाहन केलें.

अध्यक्षीय भाषणानंतर चिटणीस श्री वा.गो.आपटे यांनीं दोन घोषणा केल्या. एक धरगांव येथील ठाकूर बागसिंग यांनीं मातृभाषेद्वारा शिक्षण या विषयावर उत्तम निबंध लिहिणारासाठीं सुवर्णपदक दिले असल्यासंबंधांत आणि दुसरी श्रीमंत होळकर महाराजांनी साहित्य परिषदेस रू. 10000/- (रू. दहा हजार) ची उदार देणगी दिली असल्याची. या दोन्ही देणग्यांचें श्रोतृवृं दानें टाळ्यांच्या गजरांत अंतकरणपूर्वक स्वागत केलें.

दुस-या दिवशीं विषय नियामक समितीनें मान्य केलेले ठराव खुल्या अधिवेशनांत विचारार्थ आले. पहिले दोन ठराव अध्यक्षांनी मांडले

 1. चालू महायुध्दांत ब्रिटिशांना विजय मिळावा.
 2. कालवश झालेल्या साहित्यिकांबद्दल दुखवटा.
 3. साहित्य संमेलनाचे कार्य सुकर व्हावे म्हणून आलेल्या निबंधांवर विचार करण्याचें व संमेलनास सूचना करण्याचें काम करण्यासाठी चार शाखा समित्या नियुक्त कराव्यात.
 4. दुय्यम शाळांतून इंग्रजी शिवाय सर्व विषय देशी भाषेच्या माध्यमांतून शिकवले जावेत आणि परीक्षाही देशी भाषांतून घेण्यांत याव्यात.
 5. सर्व भारतीय विश्वविद्यालयांच्या कला शाखेत देशी भाषा हा अनिवार्य विषय असावा.
 6. देशी भाषा व साहित्य यांचा प्रसार व अभिवृध्दि करण्यासाठीं विभिन्न भाषांच्या साहित्य संस्थांची एकजूट करण्याच्या दिशेनें महाराष्ट्र साहित्य परिषदेनें पुढाकार घ्यावा.

हे सर्व ठराव सर्वानुमतें संमत झाले.

दुपारीं काव्यगायनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर खालीलप्रमाणें व्याख्यानें झालीं.

(1) कवि सुमंत, कोल्हापूर

(2) प्रा.भानु ,"यथाशक्ति ज्ञानदान करणें प्रत्येक सुशिक्षिताचें कर्तव्य आहे"

(3) वे.शा.सं.कानडे, "गीतेची थोरवी व तिच्या उपदेशाचें रहस्य"

(4) ह.भ.प.श्री ल.रा.पांगारकर –"तुकाराम."

अध्यक्षांनी समर्पक शब्दांत समारोप करून मराठींत दरसाल लिहिल्या जाणाहया उत्तम ग्रंथांची नोंद संमेलनानें करावी असें सुचविलें.

तिस-या दिवशीं सकाळीं 8.00 वाजतां कार्यक्रमास प्रारंभ झाला तो निबंध वाचनानें. सौ.कमलाबाई किबे यांनीं ज्ञानवृध्दिकरतां वाचन हें प्रमुख साधन असल्यानें मुलांत वाचनाची अभिरूचि वाढविण्यासाठीं त्यांच्या आवडीचें साहित्य लिहून माय भाषेची सेवा करावी असें सांगितलें.

बडोद्याच्या श्री कुडाळकरांच्या निबंधाचा आशय असा. मुले ही राष्ट्राची संपत्ति व भावी आधारस्तंभ असून त्यांना उत्तम शिक्षण देणें, चांगले संस्कार करणें अतिशय महत्त्वाचें असल्यानें उत्तम साहित्य निर्माण करणें आवश्यक आहे. आपल्या देशांतील बालवाड्मयाची करूणाजनक उणीव दूर करण्यासाठीं कसोशीनें प्रयत्न झाले पाहिजेत. मुलांची मनोभूमिका एकाद्या बगीच्यासारखी असल्यानें त्याची चांगली मशागत करून उदार विचार व उदात्त ध्येयें यांचें बीजारोपण लिहून साहित्यिकांनी मुलांच्या चारित्र्य विकासाला हातभार लावावा असें त्यांगी प्रतिपादन केलें.

हा निबंध डा. प्र.रा. भांडारकरांना इतका आवडला कीं तो छापण्यासाठी त्यांनी रू. 50 (पन्नास ) चें पारितोषिक दिलें.

यानंतर रियासतकार व इतिहास संशोधक श्री गो. स. सरदेसाई यांनी वाचलेल्या निबंधांत राजाश्रयावाचून भाषेचा प्रसार-प्रचार होणें कठीण आहे असें आजवरच्या ऐतिहासिक उदाहरणांवरून स्पष्ट होते असें निदर्शनास आणून दिलें.

खुल्या अधिवेशनांत प्राचार्य नानासाहेब घारपुरे यांनी मराठीची शीघ्र लघुलिपी असलेली मोडी पुन्हा सुरू व्हावी असा ठराव मांडला. त्याला अनुमोदन देतांनां जुने कागद वाचण्यासाठीं मोडीचें ज्ञान अवश्य असल्याचें रा.ब.वि.कृ.मुळ्यें यांनीं सांगितलें.

श्री भारदे यांनीं ज्ञानेश्वरीतील शब्दार्थाचें मार्मिक व चिकित्सक विवरण करून आपल्या प्रदीर्घ व्यासंगाचा प्रत्यय आणून दिला.

सौ. गिरिजाबाई केळकर यांनीं स्त्रियांचा दर्जा पुरूषांच्या बरोबरीचा आहे हें आपल्या चित्ताकर्षक वाणीनें पटवून दिले.

श्री न.चिं.केळकर यांनीं आपल्या व्याख्यानांत साहित्याच्या विविध अंगांची व पैलूंची चर्चा केली आणि तरूण पिढी हे राष्ट्राचें आशा-केंद्र असल्यानें विद्यार्थ्यांनीं वाचन व अध्ययन यांकडे लक्ष पुरवून आपले ज्ञानभांडार समृध्द करावें असें कळकळीनें सांगितलें.

साहित्य परिषदेकडून हातीं घेतल्या जाणाया कार्यांत राजेरजवाडयांनीं व धनिक व्यक्तींनी सढळ हातानें द्रव्यसाह्य करावें असा ठराव अध्यक्षांनी मांडला. तो सर्वानुमतीनें मान्य झाला. एवढेंच नव्हे तर श्रीमंत सरदार बुळे, सरदार किबे, डा. तांबे यांनीं विवक्षित कालावधीपर्यंत रू. 100 ते रू. 200/- पर्यंत देणग्या घोषित केल्या. कांहीं श्रोत्यांनी निबंध लेखकांस पारितोषिकें जाहीर केली.

श्री न.चिं.केळकर यांनीं श्रीमंत होळकर महाराज यांच्या ठिकाणीं सरस्वती व लक्ष्मीचा दुर्लभ संगम झाला असल्याचा उल्लेख करून त्यांच्या उदार देणगीबद्दल व गुणग्राहकतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या द्रव्य साह्यांतून उत्कृष्ट कार्य होईल अशी तजवीज झाली पाहिजे असें आवर्जून सांगितलें. संमेलनाच्या चोख व्यवस्थेबद्दल व अगत्यपूर्ण आतिथ्याबद्दल इंदूरकरांचे पाहुण्यांनी आभार मानले. महाराष्ट्र साहित्य सभा व इंदूरचे मराठी भाषिक यांच्या वतीनें सन्माननीय अध्यक्ष व मान्यवर साहित्यिक यांना अंतकरण पूर्वक धन्यवाद देण्यांत आले.

श्री केशव विश्वास फणसे यांनी संमेलनाचे कविताबध्द वर्णन केलें तें असें -

इंदूरी नृप बालवृध्द तरूणी पाहोनि आस्था अती

वाटे इंद्रपुरीच काय उतरे वागथि लग्नाप्रती ।

मुद्रा रौप्य दहा सहस्त्र कृपया भूपें स्वयें अर्पिल्या

अर्थीना वरदक्षणाच समयी प्राप्ता अशा वाटल्या ।।1।।

स्नेह प्रेरित बक्षिसें अखिल ती आली अहेरापरी

जी चारी कडुनी अकल्पितपणें आली सुवृष्टी परी ।

सार्थाख्या सरला, तशीच कमला विद्वन्मता त्या भल्या

तैशी ती गिरिजा खया करवल्या वाग्देविच्या शोभल्या ।।

वाङ्माते परि थोर फार गमली काशी सुविद्यमुळें

त्याही मत्कर, आपटे, बुध किबे, तांबे, दुबे की मुळे ।

ही आतिथ्य गुणी असे भरत भू विख्यात या भूवरी

केला पाहुणचार तो कळस कीं इंदूरवासी नरी ।

आम्हां लज्जित ठेविती बसुनिया सौजन्य संपादक

देती प्रेम धडाहि धन्य अजि ते सारे स्वयंसेवक ।।

महाराष्ट्र साहित्य सभेच्या स्थापनेला केवळ दोनच वर्षे झाली असूनही तिनें हें 1917 चें संमेलन गाजविलें. बालवाङ्माय, देशी भाषेचें महत्व, मातृभाषेच्या माध्यमांतून शिक्षण हे आजही समाधानकारकपणें न सुटलेले प्रश्न संमेलनांत अतिशय कळकळीने चर्चिले गेले. तसेंच मराठी भाषेच्या अभिवृध्दीसाठीं स्वयंस्फूर्त देणग्यांचा वर्षाव झाला. विविध ज्ञान विस्ताराच्या सन 1917 च्या एप्रिल, मे, जून, जुलैच्या अंकांत देणगीदारांची व आश्वासनें देणारांची यादी प्रसिध्द झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची आर्थिक बाजू बळकट होउन तिला स्थैर्य लाभले व दि. 7-8-1917 ला नोंदणी कायद्यानुसार ती नोंदली गेली.

मात्र देणग्याद्वारा नियोजित कार्य किती साधले हा प्रश्न संबंधितांना अडचणींत टाकणारा आहे. श्री वि.सी.उपाख्य तात्यासाहेब सरवटे यांचे सूचक उद्गार चिंत नीय आहेत. सन 1917 मध्यें संमेलन प्रसंगी इंदूरने संस्मरणीय कामगिरी केली होती . या संमेलनांत श्रीमंत तुकोजीराव महाराजांनी शब्दकोश रचनेसाठीं दहा हजार रूपयांची औदार्यपूर्ण देणगी परिषदेस दिली. हें कार्य इंदूरला व्हावे असा त्यांचा मनोदय होता. देणगीचा उद्देश दृष्टिआड झाल्याकारणानें ईप्सित कार्य झालें नाहीं हें तर उघडच आहें. तरीदेखील ही रकम महाराष्ट्र साहित्य परिषदेस आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरलेली आहे, हें ऐतिहासिक सत्य कोणीही कृतज्ञ मनुष्य नाकारूं शकणार नाहीं .