मराठी साहित्य संमेलन, 1935

सन 1932 साली कोल्हापूरला भरलेल्या शाही संमेलनाला हजर राहिलेल्या इंदूरच्या प्रतिनिधींना संमेलनाचें अधिवेशन इंदूरला भरवावें असें वाटलें. इंदूरला परतल्यावर विचार विनिमय झाला. त्याचा परिपाक म्हणजे 1934 त बडोद्याला भरलेल्या संमेलन प्रसंगीं इंदूरतर्फे निमंत्रण देण्यांत आलें व 1935 चें संमेलन इंदूरला भरण्याचें मान्य झालें.

1885 मध्यें पहिलें संमेलन भरलें असल्यानें 1935 हें सुवर्ण महोत्सवी वर्ष. तेव्हां हें संमेलन सर्वच दृष्टींनी संस्मरणीय व्हावें. अशा जिद्दीनें कार्यकर्ते  कामास लागले. होळकर दरबारकडून मदतीचें आश्वासन मिळाल्याकारणानें व महाराजांनीं उद्घाटक होण्याचें मान्य केल्यानें उत्साह दुणावला.

साहित्य सभेनें एक हंगामी समिती निवडली ; तिचे संयोजक श्री वि. सी. सरवटे होते. या समितीनें संमेलन-घटना तयार करून कार्यपध्दति ठरवली ; स्वागत मंडळ निर्माण केलें. त्याच्या सदस्वत्वाची वर्गणी रू. 11/- असली तरी स्वयंस्फूर्तीने रू. 151, 101, 51, 25, व 21 अशा वर्गणी जमा होऊन आकडा हजारावर गेला.

स्वागत मंडळाने संमेलनाचे कार्यकारी मंडळ निवडले. त्याचे अध्यक्ष श्री. श्री. ल. तांबे व चिटणीस श्री. वि. सी. सरवटे होते. पुढे श्री सरवटे यांजकडे मराठी साहित्य समालोचन लेखनाचें कार्य सोपवले गेल्यानें त्यांच्या जागीं श्री. न. शं. रहाळकर व श्री. द. भि. रानडे यांची निवड झाली.

संमेलनाचें कार्य सुव्यवस्थित व द्रुतगतीनें व्हावे यासाठी उपसमिल्या नेमल्या, त्या अशा :-

1. साहित्य शाखा : न. शं. रहाळकर , सी. का. देव

2. प्रसिध्दि शाखा : वि. ह. आपटे

3. प्रचार शाखा : पु. के कोतवाल, द . ह. ओक

4. मंडप व्यवस्था : भा. ल. मोडक, वि. पां. माटे

5. वर्गणी शाखा : वि. पां. माटे

6. सत्कार आणि मनोरंजन : दा. कृ. भावे, वा. गो. ऊर्ध्वरेषे

7. निवास : के. भा. कोचरेकर

8. निधि : शं. मा. संवत्सर, द. रा. पिंगे

9. मुद्रण : पु. ग. खांडेकर

10. प्रदर्शन : वा. वा. ठाकूर , वि. ल. नामजोशी

11. स्वयंसेवक : वि. ग. बारपुते

12. सहायक चिटणीस : सी. ना. गवारीकर , शं. सी. सरवटे

चिमणबागेंतील महाराजा शिवाजीराव हायस्कूलच्या  पटांगणांत सुमारे दहा हजार प्रतिनिधी-प्रेक्षक आरामांत बसूं शकतील असा तीजव्यवस्था, मंच, ध्वनिक्षेपक इत्यादि सुखसोयींनी सुसज्ज विशाल मंडप उभारण्यांत आला.

दि. 26-12-1935 ला सकाळीं 11-30  ला संमेलनास प्रारंभ होण्यापूर्वी अर्धा तास अगोदरच मंडप खचून भरला. स्वागत मंडळाचे पदाधिकारी स्वागतासाठी उभे होते. दिवाण सर सिरेमल बापना, संमेलनाध्यक्ष श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी औंधकर, स्वागताध्यक्ष श्रीमंत विक्रमसिंहजी पवार, उद्घाटक श्रीमंत यशवंतराव होळकर यांचें आगमन झालें. प्रख्यात संगीतज्ञ  श्री ठाकूरदासबुवांनी सुरेल स्वरांत ईशस्तवन केलें. आठ बालिकांनी मंजुळ स्वरांत स्वागतगीत गायलें. नंतर स्वागताध्यक्ष देवासचे युवराज कर्नल श्रीमंत विक्रमसिंह महाराज पवार यांनीं सर्व अभ्यागताचें अंत:करणपूर्वक  स्वागत करून भाषणास प्रारंभ केला. "संमेलन परंपरेला आज पन्नास वर्षे पूणे होत आहेत. बडोद्याच्या श्रीमंत सयाजीरावांनी मराठी भाषा व साहित्य यांना उत्तेजन देण्याचा पायंडा घातला. श्रीमंत होळकरांनी देखील तो कित्ता गिरवून 1915 पासून ग्रंथोत्तेजनासाठीं रू. 2500 चें अनुदान स्वीकृत केलें. 1917 च्या संमेलनांत कोशनिर्मितीसाठीं रू. 10000 ची भरधोस देणगी पुण्याच्या साहित्य परिषदेस दिली. देवासच्या सर तुकोजीरावांनीं 1928 मध्यें उत्तम ग्रंथास पुरस्कार रूप देण्यासाठीं घोषित केलेलें भोजराज पारितोषिक, धारच्या सर उदाजीराव पवारांनीं व ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारनें चालू केलेले पुराण-वस्तु संशोधनखाते हे संस्थानांनीं केलेल्या मराठी साहित्याच्या सेवेंतील महत्वाचे टप्पे होत. याशिवाय माळव्यांत झालेली मराठी ग्रंथ निर्मितीही गौरवास्पद आहे. अशा या साहित्य, संगीतादि ललित कला यांसाठी प्रसिध्द असलेल्या मालवभूमींत होणा-या या सुवर्ण महोत्सवी वर्षातील संमेलनाला श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधि यांच्यासारखे उच्च विद्या विभूषित , उत्तम कलावंत नामांकित चित्रकार संस्थानाधिपति अध्यक्ष म्हणून व श्रीमंत यशवंतराव होळकर उदघाटक म्हणून लाभत आहेत, हें आपलें परम भाग्य होय असें सांगून त्यांनी इंदूर नरेशांना उदघाटनाची विनंती केली.

श्रीमंत यशवंतराव होळकरांनी संमेलनाचें उदघाटन करतांना "मराठा" व "मराठी" यांच्या मागील तेजस्वी इतिहासाची व ओजस्वी परंपरेची आठवण करून दिली. भारतीय संस्कृतीला जगविण्यासाठी सर्वस्व समर्पण करणा-या धारकरी सैनिकांचा व वारकरी संतांचा त्यांनीं गौरवपूर्ण उल्लेख करून मायभाषेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचें आवाहन केले.

उदघाटनानंतर अध्यक्षाची रीतसर निवड झाली आणि त्यांचें पुष्पहार घालून स्वागत करण्यांत आलें.  संमेलनासाठी आलेले शुभकामनापर संदेश वाचून दाखविल्यानंतर अध्यक्ष श्रीमंत भवानराव पंत प्रतिनिधि यांनीं भाषणास प्रारंभ केला. खणखणीत आवाज आणि सुस्पष्ट विचार यांमुळे श्रोते प्रभावित झाले. "मराठी माणसाची एकजूट मराठी साहित्याचें संगोपन व संवर्धन करण्यास समर्थ आहे. वेगवगळया विषयामधील पारंगत व्यक्तीकंडून ग्रंथ लिहून साहित्याचें भांडार समृध्द करणें हें संमेलनाचें कर्तव्य आहे. उत्तम ग्रंथाच्या लेखकास उचित पुरस्कार देणें ही निकडीची गरज आहे. ग्रंथप्रकाशननिधि अस्तित्वांत येणें आवश्यक आहे. प्रत्येक जाणत्या माणसानें आपली जवाबदारी ओळखून प्राणिमात्रांच्या हितासाठी, उत्कर्षासाठीं प्रयत्न केले पाहिजेत: याचेंच नांव धर्म, हाच मानवी जीवनाचा हेतू. मुलांवर सुसंस्कार व्हावेत यासाठीं सदभिरूचिपूर्ण सकस बालसाहित्य निर्माण व्हावयास हवे" असे  मनोगत व्यक्त करून अध्यक्षांनी विभिन्न दालनांत निर्माण झालेल्या साहित्याचें मार्मिक विवेचन केले. इतिहास संशोधक रियासतकार सरदेसाई, आहिताग्नि राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे, पारसनीस इत्यादींच्या महत्वपूर्ण कामगिरीचा प्रशंसापर परामर्श घेऊन वाङमयाच्या वाटचालीचा मागोवा घेणारे महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे व ह. भ. प. ल. रा. पांगारकर यांच्या कार्याचाही गौरव केला. शेवटी वेगवेगळया वादांत विनाकारण शक्ति खर्च न करतां चांगल्या अभिरूचीला पोषक, उन्नतीला प्रेरक आणि सामाजिक ऐक्य घडवून आणणारें साहित्य निर्माण करण्याचें आवाहन करून अध्यक्षांनी आपलें भाषण संपविलें.

संमेलनांत सर्वसंमत झालेले ठराव आशयरूपानें असे :-

 1. मराठी वाङमयाच्या अभिवृध्दीसाठीं उदार आश्रय देणारे बडोदा संस्थानाधिपति श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे हीरकमहोत्सव प्रसंगीं अंत:करणपूर्वक अभिनंदन.
 2. राजकन्या मनोरमाराजे यांच्या अस्वस्थ प्रकृतीस आराम वाटून दीर्घायुरारोग्य लाभावे याबद्दल प्रार्थना.
 3. दिवगंत साहित्यिकांबद्दल दुखवटा.
 4. पदवीपरीक्षेच्या अभ्यासक्रमांत मराठीला स्थान मिळण्याबद्दल प्रयत्न व्हावा.
 5. मुंबई शासानानें भारतीय साहित्याचा वार्षिक आढावा पूर्ववत प्रसिध्द करावा.
 6. मराठी भाषेच्या सर्वांगीण उन्नतीसाठीं महाराष्ट्रांत स्वतंत्र विद्यापीठ नितांत आवश्यक असल्यानें त्यासाठीं प्रयत्नशील असलेल्या पुणें युनिव्हर्सिटी असोसिएशनला सर्वांनी यथाशक्ति मदत करावी.
 7. श्रीमंत यशवंतराव होळकरांनी महाराष्ट्र साहित्य सभेस मोठें भवन देण्याचें अभिवचन दिल्याबद्दल आभार. मान्य झालेले अन्य प्रस्ताव असे :
 • भारतांतील भिन्न भिन्न प्रांतातील वेगवेळया भाषांत पारस्परिक सहकार्य व विचारांचें आदान प्रदान होणें अतिशय आवश्यक असल्यानें त्या दिशेंने प्रयत्न करण्यासाठी समिति नियुक्त करावी.
 • बडोदा संमेलनाच्या लिपी समितीच्या निर्णयास मान्यता.
 • परिषदेनें मान्य केलेल्या नवीन शुध्दलेखन नियमांचें अनुसरण करणारांचें अभिनंदन.
 • मुंबई सरकारनें ग्रंथोत्तेजनासाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याबद्दल नापसंती आणि ते पुन्हां चालू करण्याबद्दल आग्रह.
 • इंदूर व ग्वाल्हेर दरबार कडून परिषदेस दिल्या जाणा-या देणग्या पुन्हा चालू करण्याबद्दल परिषदेनें शिष्टमंडळ पाठवावे.
 • पोस्टाच्या दरांत वृत्तपत्रांस मिळणारी सवलत नियतकालिकांस देखील मिळावी अशी मागणी.
 • श्रीमंत सरदार मा. वि. किबे यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांमुळे निजाम सरकारनें प्राथमिक शाळांत मातृभाषेची उपेक्षा होणार नाहीं असें लेखी आश्वासन दिल्याबद्दल निजाम सरकारचे आभार.
 • आग्रा विश्वविद्यालयांत एम.ए. साठीं मराठी विषय असावा व तो शिकविण्याची सोय इंदूर व ग्वाल्हेर सरकारनें करावी.
 • अजमेर बोर्डाने अभ्यासक्रमांत मोडीचा अंतभार्व केल्याबद्दल अभिनंदन.
 • दुर्मिळ व हस्तलिखित वाङ्मयाच्या प्रकाशनाची व्यवस्था व्हावी.
 • स्वतंत्र अभिव्यक्तीला बाधक कायदे रद्द व्हावेत.
 • स्थायी कार्य करण्यासाठी परिषदेस धनिकांनी द्रव्यसाह्य करावें.
 • साहित्य मंदिरासाठीं श्रीमंत पंत प्रतिनिधींनी परिषदेस आपली जागा सवलतीनें दिल्याबद्दल आभार व मंदिर उभारण्यासाठीं देणग्या देण्याचें आवाहन.
 • सर्व साहित्य संस्थांना परिषदेस संलग्न होण्याची विनंती.

प्रतिवर्षी संमेलन भरविण्याची जबाबदारी कार्यकारी संस्था या नात्यानें सांभाळणारी परिषद आणि संमेलन यांचे परस्पर संबंध स्पष्ट व्हावेत व संमेलनाचें कार्य सुव्यवस्थित चालावें यासाठीं घटनेचा मसुदा घटना समितीनें सहा महिन्यांत तयार करून जनमतासाठी प्रसृत करावा व येणा-या सूचना विचारांत घेऊन अंतिम मसुदा मान्यकरवून घेण्यासाठीं संमेलनाच्या पुढील अधिवेशनांत ठेवावा. साहित्य विभागातर्फे कांहीं साहित्यविषयक भाषणें व निवडक निबंधांचे वाचन झाले. अध्यक्ष होते श्री श्री. ना. बनहट्टी.

भाषणे

1) पुरूषार्थाचे संपादक पंडित श्री. दा. सातवेळकर, विषय-संस्कृति-संवर्धन.

2) श्री वा. दा. पंडित जळगांव. विषय :- बालकवींच्या काव्याचें अंतरंग.

3) श्री चिं. वि. जोशी बडोदे. विषय :- आधुनिक लघुकथा.

4) प्रा. माधवराव पटवर्धन कोल्हापूर. विषय :- कविता, काव्य.

5) प्रा. वि. भि. कोलते. विषय :- महानुभाव वाङ्मयसंबंधात कांहीं प्रश्नांवर प्रकाश.

निबंध

1. प्रा.स.वि. देशपांडे, बडोदे विषय :- संस्कृतिसंवर्धन आणि मराठी वाङ्मय.

2. श्री रा.बा. गोडबोले, इंदूर. विषय :- संगीतांतील स्वर व अर्थमाधुर्य.

3. श्री य. खं. कुळकर्णी इंदूर. विषय :- ललित वाङ्मय.

4. श्री के. ना. डांगे, उज्जयिनी. विषय :- आधुनिक कवितेचें भवितव्य.

5. प्रा. प्रभाकर माचवे. विषय:- साहित्यांतील ललित कलाभाव.

6. श्री वि. भि. जोशी, हैदराबाद. विषय :- मुसलमानांची मराठी वाङ्मयांत भर.

7. श्री वि.स. घाटे, रतलाम. विषय :- कीर्तन व मराठी भाषेची जोपासना.

या कार्यक्रमाचा समारोप करतांना श्री बनहट्टींनी अभ्यासपूर्ण भाषणांबद्दल व निबंधांबद्दल प्रशंसोद्गार काढून ललितेतर वाङ्मयांची जोपासना व अभिवृध्दी करण्याचें, असें वाङ्मय अधिकाधिक मनोबेधक व परिणामकारक होण्यासाठी आकर्षक शैलींत लिहिण्याचें आवाहन केलें. ललित वाङ्मयांनें कला व तंत्र यांचें अवास्तव स्तोम न माजवितां भरीवपणाकडे अधिक लक्ष पुरविणें आवश्यक आहे असा इशारा त्यांनी दिला.

साहित्य शाखेच्या दुस-या भागाचे म्हणजे शास्त्रीय परिषदेचे अध्यक्ष होते काशी हिंदु विश्वविद्यालयांतील औद्योगिक रसायन शाखा-प्रमुख डॉ. एन. एन. गोडबोले. प्रास्ताविक भाषणांत ते म्हणाले "साधी माती,पाणी, वायु व प्रकाश एवढ्या साधनांनी निसर्ग हवे तें करतो. पण हजारो वर्षांच्या प्रयत्नांनंतर शास्रज्ञ निसर्गाची बरोबरी करू शकत नाहीं.म्हणूनच शास्त्रीय ज्ञानसंवर्धनाचे आणि तें क्षेत्र अधिकाधिक व्यापक करण्याचे प्रयत्न व्हावेत".

या परिषदेंत वाचले गेलेले निबंध.

1. "शास्त्रीय दृष्टी" डॉ.शं.श्री. देशपांडे, उपप्राचार्य होळकर  कॉलेज  इंदूर.

2. "गायनापासून गणिताकडे" प्रा. वि. गो. गोळे, होळकर कॉलेज, इंदूर.

3. "शास्त्रीय परिभाषा" डॉ. वा. वि. भागवत होळकर  कॉलेज इंदूर.

4. "भूगोल विषयाचें महत्व व शिक्षण"-- के. ना. डांगे, उज्जयिनी.

संमेलनांत भरविलेल्या ग्रंथप्रदर्शनांत वृत्तपत्रांचा आणि नियतकालिकांचा समावेश करण्यांत आला होता. प्रदर्शनाचें उद्घाटन श्रीमंत विक्रमसिंह पवार महाराज यांनी केलें.

कविसंमेलन

मागील अप्रिय अनुभवामुळें संमेलनाच्या मूळ कार्यक्रमांत फाटा मिळालेल्या काव्यगायनाच्या कार्यक्रमांस कांहीं उत्साही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ऐन वेळीं परवानगी द्यावी लागली. ठरलेल्या कार्यक्रमांच्या मध्यांतरांत काव्यगायनाच्या दोन यशस्वी बैठकी झाल्या. त्यांत अनुक्रमें 22 व 15 कवींनी भाग घेतला. अध्यक्षस्थानी कवि माधव ज्यूलियनांची योजना करण्यांत आली होती.

मनोरंजन-कार्यक्रमांत पहिल्या दिवशीं प्रख्यात गायक निसारहुसेन यांचें गायन झालें. याशिवाय ह. भ.प. श्री दाभाडे यांचें  कीर्तन. श्रीमंत औधकरांनी तयार केलेल्या नमस्कार व्यायाम चित्रपटाचें दर्शन, श्री सी.का. देव, रा. अ. काळेले, य. खं. कुळकर्णी यांचे प्रासंगिक कविता-गायन इत्यादि कार्यक्रम झालें. सुप्रसिध्द गायनशिक्षक श्री गोपाळराव जोशी, य.खं. कुळकर्णी, बालगायक प्रभाकर चिंचोरे यांनी ईशस्तवन, स्वागतगीत आदि सुरेल स्वरांत सादर केले.

सोमयाजी आहिताग्नि धुंडिराजशास्त्री बापट यांचे "सामवेदांतील संगीत" या विषयावरील विद्वतापूर्ण भाषण श्रोत्यांना फार आवडलें.

प्रसिध्दी विभागाच्या चिटणीसांनी व्यवस्थेंतील उणीवांबद्दल क्षमा मागून अध्यक्ष, उदघाटक, स्वागताध्यक्ष, देणगीदार, रसिक बंधुभगिनी व कायावाचामनें करून अविश्रांत खपणारे कार्यकर्ते यांचे मन:पूर्वक आभार मानले. सन्माननीय पाहुण्यांनी चोख व्यवस्थेबद्दल कार्यकारी मंडळास व कर्तव्यनिष्ठ हंसतमुख स्वयंसेवकांस हार्दिक धन्यवाद दिले.

राज्यगीत झाल्यावर हा तीन दिवसांचा संस्मरणीय सोहळा संपला.