शारदोत्सव

मराठी साहित्य आणि संस्कृति यांचें संगोपन, संवर्धन आणि संरक्षण हाच जिच्या स्थापनेचा मूळ उद्देश्य, "मराठी असे आमुची मायबोली वृथा ही बढाई सुकार्याविणें" या ब्रीदाचा केवळ उच्चार करून न थांबता त्याशीं इमान राखून सातत्याने त्याचा  पाठपुरावा  करणें  हें जिचें अंगीकृत कार्य त्या साहित्य सभेंत शास्त्राभ्यासांत रस देणा-या  अभिनव वाग्विलासिनी वीणावरदायिनी शारदेच्या बहुमुखी उपासनेला महत्व असणें स्वाभाविक आहे .

साहित्य सभेच्या बाल्यावस्थेंतही शारदोत्सव साजरा होत असे. विद्याप्रेमी श्रीमंत राजकन्या सावित्रीबाई शरदऋतूच्या प्रसन्न वातावरणांत श्री शारदेचा उत्सव कित्येक वर्षें आस्थेनें करीत आणि बाहेरच्या विद्वान् वक्त्यांना निमंत्रण देत. पुढें 1928 साली श्रीमंत यशवंतराव महाराजांच्या जन्मगांठीच्या दिवशीं (भाद्रपद शुद्व 11) सभेनें पहिला शारदोत्सव साजरा केला. व्याख्यानरूपानें श्री शारदेचें  पूजन  आणि श्रीमंतांचें अभीष्ट-चिंतन करणा-या  या  उत्सवाची  उल्लेखनीय फलश्रुति म्हणजे प्रधानमंत्री श्री बापनासाहेब यांच्या अध्यक्षतेखालीं झालेलें "सुमनहार" या काव्यसंग्रहाचें प्रकाशन ही होय. 1929 मध्ये दानवीर सर सेठ हुकुमचंद व 1930 त श्रीमान् सेठ कन्हैयालालजी भंडारी हे अध्यक्ष म्हणून लाभले.

1933 च्या शारदोत्सवाला श्रीमंत महाराज व श्रीमंत सौ. चंद्रावती मासाहेब जातीनें हजर राहिलें. 1934  सालीं विख्यात विद्वान् श्री. दाजी नागेश आपटे यांच्या अध्यक्षतेंत झालेल्या शारदोत्सवांत मालव साहित्याच्या इंदूर विशेषांकाचें प्रकाशन झाले. श्रीमंत महाराज, महाराणी सौ. संयोगिताबाई्, उभयता मासाहेब सौ. चंद्रावतीबाई् व सौ. इंदिराबाई यांच्या उपस्थितीनें सभारंभास आगळी शोभा आली. उत्सवास जोडूनच मध्यभारतीय महाराष्ट्र साहित्य संमेलन भरविण्यांत आल्यानें उत्सव खूपच गाजला आणि येथूनच पुढें "शारदोत्सव" हें नांव रूढ झालें.

1935 मध्यें अध्यक्षपद भूषविलें पट्टीचे विद्वान् व वेदवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. शं. दा. पेंडसे यांनी. या उत्सवाची स्मृति जनमानसावर कोरली  गेली  ती त्याप्रसंगी श्रीमंत महाराज व महाराणी यांच्या  उपस्थितींत प्रथमच झालेल्या साहित्यिकांच्या सत्कारामुळे. श्री पांढारकर-"माघकाव्य" मराठी अनुवाद" , श्री ग.वा. कवीश्वर -"नीति आणि कलोपासना" , कविवर्य श्री य.खं. कुलकर्णी-"मानस निष्यन्द" , कविवर्य रा. अ. काळेले-"वाग्वसंत" हे सत्काराचे मानकरी होते. श्रीमंत सौ. इंदिरा मासाहेबांनी प्रत्येकास रू. 25, अध्यक्षांस रू. 101 तसेंच सर्वांस महावस्त्र देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

1936 च्या उत्सवाच्या उदघाटक होत्या राजकन्या सावित्रीबाई आणि अध्यक्षपदी सरदार माधवराव किबे यांची योजना झाली होती. कवि  श्री  वि. ह. आपटे यांच्या "माला" या काव्यसंग्रहाचें प्रकाशन होऊन कवींचा सन्मान  करण्यांत आला. अकाडमी  ऑफ फाईन आर्टस् या संस्थेने गायनवादनादि मनोरंजक कार्यक्रम सादर केले. उत्सवासाठी स्वतंत्र समिति नेमण्याची प्रथा या वर्षापासून अस्तित्वांत आली. सभासद होते श्री मा. स. रावरेकर, श्री वि. वि. सरवटे, श्री ना.र. नेवासकर आणि श्री वि.ह. आपटे.

1938 मध्यें राजकन्या सावित्रीबाई यांच्या अध्यक्षतेंत संपन्न झालेल्या शारदोत्सवांत श्री न. शं. रहाळकर (शाकुंतल सौंदर्य) , श्री य. खं. कुळकर्णी (संगीत साध्वीरत्न मीरा), श्री भा. सी. गवारीकर (इंदूर दर्शिका) यांचा ग्रंथलेखनाबद्दल गौरव करण्यांत आला. इतिहास संशोधक श्री वा. वा. ठाकूर यांचे व्याख्यान, स्त्रियांचें काव्यगायन व शास्त्रोक्त संगीत यामुळें उत्सवाचें आकर्षण वाढलें.

कालप्रवाहांत वर्षामागून वर्षांचे तरंग लुप्त होतां होतां 1940 साल उजाडलें. सभेला स्थापन होऊन  25 वर्षें पूर्ण होत असल्यानें कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आणि रजतमहोत्सवाच्या स्वरूपांत शारदोत्सव साजरा करण्याचा सर्वसंमत निर्णय घेतला गेला.