मध्यप्रदेश मराठी नाट्य स्पर्धा

साहित्य सभेचें कार्यक्षेत्र प्रमुखत: साहित्य असले तरी तिनें ज्या विविध कलांकडे लक्ष पुरविलें, सक्रिय प्रोत्साहन दिले, त्यांत नाटकाचा उल्लेख प्रामुख्यानें करायला हवा.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव आरंभला. तो इंदूर पर्यंत येऊन पोहोचला. करमणुकीच्या कार्यक्रमांत नित्य नते कांही हवे. याच्या शोधांत नाटकें, प्रहसने गवसली. यातून कलोत्कर्ष साधता येईल, साहित्य निर्मिती होऊ शकेल, बालनट उदयास येतील, उदयोन्मुख लेखकांस उत्तेजन देता येईल, नाटय संघात स्वस्थ स्पर्धा योजता येईल, असे श्री. राम लोणकरांच्या मनाने घेतले. त्यांनी ते साहित्य सभेच्या कार्यकारी मंडळात मांडले. तेथे ते मान्य झाले. यासाठी बक्षीसें हवीत. फिरत्या शाश्वत बक्षिसां करता श्री. रा. स. दाते यांनी विजयी संघा करिता 100 रू. चा एक रौप्य पेला उदार मनाने  सभेच्या स्वाधीन केला. महत्वाकांशी बालोध्दार मंडळाने रू. 30ची ढाल नजर केली. साहित्य सभेने वार्षिक रोख बक्षिसे देऊ केली. रंगमंच कोठे उभारायचा? शांत, सुरक्षित, सोयीस्कर स्थळ हवे. पहिली दोन वर्षे गणेश मंडळाने जागा दिली. नंतर साहित्य सभेचे सभासद, समाज उन्नति कार्यास प्रोत्साहन देणारे श्री. निरंजन जमीदार साहेब यांनी बडा रावला जुने इंदूरचा तळमजला या कार्याच्या उपयोगा करता देण्याचे ठरविले. पुढे या स्पर्धा सभेच्या सभागृहातच होऊ लागल्या.

1953 पासून स्पर्धांना प्रारंभ झाला. उद्घाटक होते देवासचे श्री. जमीदार साहेब. सहा संघ स्पर्धक होते. त्यात महत्वाकांक्षी बालोध्दार मंडळाच्या "कारकून" ला पहिले बालोत्कर्ष मंडळाच्या "अमरवेल" ला दुसरे, तर "स्वराज्याचे वैरी" ला तिसरे पारितोषिक मिळाले

दुस-या वर्षी 1954 स्पर्धेचे उद्घाटक होते देवासचे अनंतराव पटवर्धन. सहा संघांनी भाग घेतला. त्यात रौप्य पदकाचे पहिले बक्षीस मिळाले छत्रपती मंडळाच्या "निशीकांताची नवरी" ला, फिरती ढाल मिळाली बालोत्कर्षच्या "वादळ" ला. 1955 त सुध्दा स्पर्धकांची संख्या सहा होती. पहिले विजेते महत्वाकांशी बालेाध्दार मंडळ "हा पैसा बोलतो" व छत्रपती मंडळ "नांवलौकिक" दुसरा क्रमांक उत्कर्ष मंडळाच्या "कलावंत" चा आणि तिसरा बालोत्कर्ष मंडळाच्या "दौलत" चा. प्रत्येक संघातील दोन श्रेष्ठ नट व या 12 श्रेष्ठातले सर्वोच्च नट ही परीक्षक मंडळाने निवडले.

1956 त स्पर्धक संख्या दहा झाली. या वर्षी स्त्री नाटय संघही प्रविष्ट झाले. त्यांची संख्या तीन होती. मराठी रंगभूमीवर  स्त्री वेषात पुरूष येणे ही नित्याची गोष्ट होती. या वर्षी स्त्री संघांनीं याचा वचपा काढला. -पुरूषांच्या भूमिका त्यांनीच घेतल्या. या वर्षी या स्पर्धांत तीन हिंदी प्रहसने होती. त्यातील दोन मराठी भाषिकांनी अभिनीत केली होती. नटांच्या संख्येत एका शतकाला एका "षट्कारा" ची न्यूनता पडली.

उद्घाटक होते न्यायमूर्ति वि. र. नेवासकर साहेब. विजेते संघ व अभिनीत नाटके अशी-- (1) छत्रपती मंडळ "पैशाचा चिखल" (2) महिला समाज, रामबाग "माझे घर" (3)  उत्कर्ष मंडळ "करायला गेलो एक" (4) नाटयभारती "हमारा गांव" (5) म.कां. बालोध्दार मंडळ् "काळा कोट".

या वर्षी विशेष नटांस बक्षीस म्हणून पदके  व प्याले दिले गेले. देणारांची नांवे- श्री. कमलाबार्इ साहेब किबे, डॉ. सौ. मालिनी हरमळकर , श्री. मनोहर जोशी, सरोदे भंडार, मधुसूदन कुळकर्णी, वसंतराव रेगे, साधना केंद्र, तसेच स्पर्धांत दुस-या क्रमांकाने येणा-या संस्थेस देण्यासाठी महत्वाकांशी बालोध्दार मंडळाने अशोक चक्रांकित स्तंभ सभेच्या स्वाधीन केला.

1957 तीन प्रहसने हिंदी तर तीन मराठी होती. उद्घाटक जनसेवा आयोगाचे एक सदस्य राजा रामरतन, पं. धुंडिराज बहादुर हे होते. नावा सारखी कृती ! त्यांनी रू. 50 रोख पारितोषिकासाठी दिले. दुस-या एका कलाप्रेमी सद्गृहस्थाने उत्तम दिग्दर्शका नाटकास दुसरे बक्षीस जाहीर केले. या वर्षीचे पारितोषिक प्राप्त संघ व नाटयें अशी - (1) जयभारत समाज, नंदानगर "फुटपायरी" (2)फ्रेंडस् युनियन, हरसिध्दी "नव्या जुन्या" (3) भगिनी समाज, जुने इंदूर "वाहिनी", या शिवाय बालोध्दार मंडळ व नाटयभारती या संस्थांनी प्रारंभी व शेवटी आपापली नाटकें रसिकांत स्वयंस्फूर्तीने सादर केली. बालोध्दार मंडळाने "मूर्तिभंजक" हे प्रहसन दाखविले.

1958-59 त बडारावला स्थळ बदलून सभेचा हॉल घेतला. साहित्य सभेच्या सभासदांस प्रत्येकी 50 नवे पैसे व इतरांस प्रत्येकी एक रूपया प्रवेश शुल्क आकारले जाई व ही प्राप्ती सर्व स्पर्धक संघात समसमान विभागली जात असे. संस्कृत शाकुंतल नाटकाचा 4 था अंक गीर्वाण भाषेत अभिनीत केला गेला. (1)भगिनी मंडळ, जुने इंदूर "कोणे एके काळी" (2) भगिनी मंडळ, नंदलालपुरा "नव्या जुन्या" (3) फ्रेंडस् युनियन हरसिध्दी मंडळ "उलझन" देवी श्री अहिल्याबाई मंडळ "गधा उर्फ गर्व्हनर" ही नाटके गुणानुक्रमाने बक्षिसाला पात्र ठरली.

श्री. वि. गो. गोळे (प्राध्यापक) हे 1959-60 या वर्षी उद्घाटक होते. स्पर्धकांचे दोन गट होते. (अ) गटातील विजयी स्पर्धक 1 नाटय विलास, 2 भगिनी समाज जुने इंदूर, 3 भगिनी मंडळ नंदलालपुरा. (ब) गटातील विजेते (1) देवी श्री अहिल्या मंडळ (2) श्रीकृष्ण मंडळ. समारोपाचे दिवशी उत्कर्ष मंडळाने "मुंबईची माणसे" हे नाटक हौशी म्हणून करून दाखविले.

1960-61 शेवटले वर्ष. उद्घाटक ख्रिश्चन कॉलेजचे कायदा विभागप्रमुख प्रा. अनंत आठले होते. (अ) गटात किमान तीन स्पर्धक नसल्याने स्पर्धा झाली नाही. (ब) गटात स्पर्धक संख्या केवळ तीन होती. त्यातील दोन समसमान होते. (1) देवी श्री अहिल्या मंडळ "सुबह का भूला" आणि बाल प्रभात मंडळ. याचे "आदर्श गुरूजी" ही ती दोन प्रहसने.

स्पर्धक संख्या कमी पडली! स्पर्धा कशी होणार? काल  स्तावत् प्रतीक्षताम् हा न्याय सभेस अनुसरावा लागला !

स्पर्धा साधारणत: एक आठवडा तरी चाले. संघ बदलत, प्रेक्षक स्वेच्छेने येत जात. परीक्षकांस मात्र तब्बल सात दिवस लागोपाठ जागरण होई ,लक्षपूर्वक सर्व न्याहाळावें लागे. शारीरिक व मानसिक दुहेरी श्रम होत. 53 पासून 60 पर्यंतचे सी. का. देव, श्री. बालोणकर, श्री .ह. र. पांढरकर, सी. वंदना जमीदार, डॉ. रा. वा. आपटे, य. खं. कुळकर्णी, प्रा. धुं. गो. सप्रे, डॉ. सौ. ठाकूर, सौ. उर्मिला थत्ते, प्र. गो. घाटे, वि. मो. नामजोशी, डॉ श्रीपाद कवीश्वर, सौ. वसुधा ढवळीकर, डॉ. गो. वि. फडके, प्रा. अनंत आठले आणि शंकरराव रहाळकर.

स्पर्धेचे संचालन 56 त अप्पा खाडिलकरांनी केले. 58-59 त श्री बालोणकर प्रा. व. अ. काळेले व डॉ.ज.ग. ठाकूर यांचे संचालक मंडळ होते. 59-60 त सौ. कुमुदिनी फाटक, प्रा. व. अ. काळेले, य. गो. दिक्षीत व सुरेश खांडेकर या चौघांचे हे मंडळ होते. तर 60-61 त सौ. फाटक व प्रा. व. अ. काळेले ह्मा दोघांचेच होते.