इतर चळवळ

इंदूरच्ये पहिले मराठी कवि संमेलन 1926

इंदूरच्या दत्तमंदिरांत सार्वजनिक श्रीगणेशोत्सव प्रसंगी निवडक कवींच्या काव्य - गायनाचा कार्यक्रम करण्याची परिपाठी 1922 पासून पडली होती. त्याबद्दल लोकांत कुतूहल व आवड असल्याचें दिसून आल्यानें इंदूरमधील सर्व कवींना साहित्य सभेंने आमंत्रित करावें अशी सूचना श्री वि. सी. सरवटे यांनी केली. दि. 26-10-24 च्या बैठकींत कार्यकारी मंडळाने सूचनेवर विचार करून ती मान्य तर केलीच, पण या प्रांतांतील सर्वच कवींना निमंत्रण पाठविण्याचा निर्णय घेतला. इंदूर संस्थानच्या राजपत्रांत जाहीरात देऊन, तसेंच प्रत्यक्ष पत्रव्यवहार करून कवींना आपल्या पसंतीच्या कविता पाठविण्याची विनंती करावी असें ठरलें. हा कार्यक्रम श्रीमंत तुकोजीराव होळकर यांच्या जन्मोत्सवांत अंतर्भूत व्हावा अशी कार्यकारी मंडळाची इच्छा होती.  तसा प्रयत्नही झाला; पण यश आलें नाहीं.

कवींना केलेल्या आवाहनात सुरवातीस समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाहीं. 46 पैकीं 15-16 जणांकडूनच कविता आल्या. स्मेरणपत्रे पाठविण्यांत आली; बाहेर गांवाहून येणा-या कवींची निवास - भोजनाची व्यवस्था सभेकडून होईल हें स्पष्ट करण्यांत आले.

संमेलनाच्या तयारीसाठीं कार्यकारी मंडळाच्या वारंवार बैठकी होत होत्या. घेतलेले निर्णय सारांश रूपाने असे :-

(1) दि. 2-3 व4 नोव्हेंबर 1926 च्या दिवशी मध्य भारतीय कवि संमेलन टाऊन हॉल मध्यें भरवावे.

(2) खर्चासाठीं रू. 100/- मंजूर.

(3) स्वयं सेवक प्रमुख :-- श्री, श्री. त्र्यं. द्रविड. खजिनदार : श्री वि. सी. सरवटे. हिशेबनवीस : श्री वि. ल. नामजोशी . प्रसिध्दी  प्रमुख : श्री रा. ह. मणूरकर. राजघराण्यांतील व अन्य  प्रतिष्ठीत व्यक्तींस निंमत्रण देण्यासाठीं प्रतिनिधिमंडळ : श्री. श्री. त्र्यं. द्रविड, सरदार भागवत, श्री. त्र्यं. ब. गोगटे, श्री ना. कृ. वैद्य.

संमेलन प्रादेशिक असल्यानें त्याचा अध्यक्षही येथलाच असावा असा कार्यकर्त्यांचा कल दिसला. म्हणून ज्यांचे लहानपण व प्रौढ वयाचा बराच काल इंदूर - देवास मध्यें गेला व तूर्त ज्यांचे वास्तव्य ग्वाल्हेरमध्यें होते त्या कविवर्य भा. रा. तांबे यांचे नांव अध्यक्षपदासाठी सर्वसंमत झाले. स्वागताध्यक्षपदीं स्थानिक कवीची योजना करावी म्हणजे समसमा संयोग साधेल अशा विचारानें सरदार वि. कृ. मुळ्ये यांना विनंती केली; पण ते परगांवी जाणार असल्यानें श्री न. शं. रहाळकर यांची योजना करण्यांत आली.

मध्यभारतातील कवींव्यतिरिक्त कांही कवी बाहेरून आले होते. त्यांत काव्य रत्नावलीचे वयोवृध्द संपादक श्री ना. न. फडणीस व त्यांचे चिरंजीव, पुण्याचे माधव ज्यूलियन्, जळगांवचे  श्री सोनाळकर, दादरचे वसंत विहार, खानदेशचे दु. आ. तिवारी हीं नांवें उल्लेखनीय आहेत.

संमेलनाच्या पहिल्या दिवशीं कारभारी रा. ब. बापट साहेबांपासून सर्व उच्च पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिपर्व रसोदय या न्यायाने श्रोत्यांचा उत्साह व वाढती उपस्थिति, व कवींची संख्या विचारांत घेऊन मूळचा तीन दिवसांचा कार्यक्रम चार दिवस करावा लागला. शेवटच्या दिवशी तर विशाल टाऊन हॉल अपुरा पडला. एकूण संमेलन संस्मरणीय झालें.

संमेलनाच्या आधी व नंतर बरेच दिवस इंदूरचें वातवरण काव्यमय बनले होतें. शेवटच्या दिवशी अनेक होतकरू कवी  अहमहमिकेनें पुढे येतांना पाहून मन आनंदानें उचंबळून आलें. अध्यक्ष श्री भा. रा. तांबे यांचे काव्याची अधिकारपूर्ण मार्मिक मीमांसा करणारें भाषण आपल्या तात्विक व सौंदर्यग्राही बैठकीमुळे फारच प्रभावी ठरलें. श्री न. शं. रहाळकर यांचे सिंहावलोकनात्मक भाषणही परिणामकारक होते.

या संमेलनाच्या निमित्तानें कित्येक झांकलेली रत्नें उजेडांत आलीं, ही या संमेलनाची जमेची बाजू . श्री य. खं. कुळकर्णी, गं. के. शिराळकर, वि. ह. आपटे, रा. अ. काळेले, या होतकरू कवींच्या ठिकाणीं आढळलेल्या काव्यबीजाला प्रोत्साहन देऊन उज्जवळ भविष्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. दोन तीन कवयित्रींनीही शारद पूजनास सक्रिय हातभार लावला.

सामाजिक कार्यास मदत करण्यास सदैव तत्पर असलेल्या सरदार मा. वि. किबे यांच्या शंभर रूपयांच्या उदार देणगीमुळे व प्रेरणादायी सहानुभूतीनें, तसेंच आबालवृध्द रसिकांच्या आत्मीयतापूर्ण सहकार्यानें हें पहिलेंवहिले कविसंमेलन केवळ यशस्वी रीतीनें पार पडले एवढेच नव्हे तर सभेच्या इतिहासांत चिरस्मरणीय ठरलें.

काव्य गायन

ज्ञान-संग्रहाला पद्य सोयीस्कर व पाठ करायला सोपे. हरिदास, कीर्तनदार यांचे ठसकेबाज गायन हुरूप आणणारे होते. प्रसिध्दी मिळवून देणारे वाटले. यामुळे गद्यापेक्षा पद्यरचना आकर्षक वाटली. तिचाच प्रचार, प्रसार, फैलाव झाला. इंदूरला पद्यानेच गद्याच्या अगोदर ग्रंथरूप घेतले. अनेक काव्ये प्रकाशित झाली. येथल्या जुन्या पिढींतील कवींची नांवे संमेलनातून अभिमानाने घेतली जाऊ लागली.

1905 पूर्वी विष्णुपंत गुरूजी, गणेशशास्त्री गोळवलकर यांजकडे छंदोबध्द रचनाकार जमत. आपापल्या रचना म्हणून दाखवीत, चर्चा करीत. अशा कवितांचे विषय बहुधा बोधपर-निसर्ग वर्णनपर-ऐहिक रोचक असत. रसिक जमत, ऐकत, काव्यानुकूल वातावरण बने. नरहर शंकर रहाळकरांचे  घर काव्यनिर्मात्यास माहेर घर वाटे. त्यांचा आशीर्वाद काव्य निर्मितीस स्फूर्ति देणारा होता. कविवर्य भा.रा. तांबे यांचे आगमन नवोदित कवींना पर्वणी वाटे. होळकर  कॉलेजचे मराठी वाङ्मय मंडळ, त्याला मार्गदर्शन करणारे प्राध्यापक हे ही अशा काव्यनिर्मितीला, त्यावर निबंध लिहायला उपकारकच ठरले. के.स. केळकर ह्मांचा निबंध "पंत" कवी होते हे सप्रमाण सिध्द करणारा होता, व केशवसुतावरील निबंध प्रसिध्द साहित्यिक श्री वि.द. घाटे यांनी इंदूरलाच पहिल्याने वाचला.

हुल्लड होते म्हणून काव्य गायनाला फाटा देणा-या 1917 च्या संमेलनाला ते भरविण्यात इंदूरच्या तरूण कवींनी विनंती केली. गणेशोत्सवानेच येथल्या पहिल्या 1926 च्या कवि संमेलनाला उत्स्फूर्त केले व काव्य-रसग्रहण शांतपणे, आनंदाने होऊ शकते हे सिध्द करून दाखविले. निर्यमक व सयमक कवितांवर एक सुंदर परिसंवाद साहित्य सभेने योजला. सयमक कवितेतील उदाहरणें घेऊन निर्यमक कविता सरस कशी हे डॉ. प्र. रा. भांडारकरांनी सिध्द केले :- "बाजारांतुनि आणिली अजि संख्या केळीं फराळास कीं ! होतीं कच्ची परंतु यमकासाठीं म्हणू नासकीं "

वर्तमानकाळांत काव्यातील गेयता कमी झाली आहे. आशय-प्रधान काव्य-वाचन सुरू झाले. पाठांतराऐवजी पाहून काव्यवाचन होते. कवितांची लांबी रूंदी कमी झालेली आहे. विनोद व व्यंगाकडे कविता वळलेली दिसते.

काव्य गायनाला-वाचनाला सभारंभांत वाव मिळू लागला. स्वतंत्र सभा याच कार्यक्रमाकरता भरूं लागल्या. बाहेरून सुविख्यात कवींस पाचारण करण्यास प्रारंभ झाला. अभ्यागतांचे सुश्राव्य काव्य-गायन सभा सदस्यांस ऐकवित. अशा सुरम्य बैठकींचे स्मरण आजही श्रोत्यांस आनंद देणारे आहे.

काही कवी व त्यांचे  काव्य-गायन-भा.रा.तांबे यांचे भावगीत गायन, अनिलांचे "पेर्ते व्हा", अजून यौवनात मी, पी.सावळाराम "गंगा यमुना डोळ्यांत उभ्या कां? श्री.मंगेश पाडगांवकर -"आले आले मेघ भरून" वसंत बापट "बिजली नाचेल गगनात", सोपान देव चौधरी "आडास पाणी लयी खोल ग", नवकवी विंदा करंदीकर "माझ्या मना बन दगड", निर्मला देशपांडे "मातीची गाय", वि.म. कुळकर्णी  "माझा पानमळा", वा.गो. मायदेव "आई साळे मधे कवा जाऊ?", वि.द. घाटे "गा यशवंता, गा", संजीवनी मराठे "नव्या जुन्याच्या उ बरठ्यावर", सुरम्य नित्य नवा आनंद देणा-या अशा काव्यपंक्ती श्रोत्यांच्या मनांत तरळत असतील.

साहित्य सभेत आणखी कांही कवींची काव्य-गायने झाली. ती अशी-भ-श्री- पंडित, निशिकांत कालगांवकर, ग्वाल्हेर, ना.वा.केळकर, ग्वाल्हेर, रा.द.देशपांडे उमरावती. मधुकर केचे, विदर्भाचे, अविनाश वाडेकर, मुंबईचे, सातपुते ,मधुकर केदार, पृथ्वीराज यांच्या स्वरचित "गीतराधिके" तील निवडक गीते-तसेंच मुरलीधर आढाव यांनी  गोंविदाग्रजांच्या कविता म्हणून दाखविल्या आणि सोपानदेव चौधरी यांनी आपल्या मातोश्री बहिणाबाई यांच्या कवितांचा लाभ श्रोत्यांस करून दिला.

1943 च्या डिसेंबर मध्ये आधुनिक दिंवगत ठळक मराठी कवींच्या स्मृति प्रीत्यर्थ सप्ताह पाळला. दिवंगत कवींवर भाषणे व त्यांच्या कवितांचे गायन आयोजिले होते. केशवसुत पूर्व आधुनिक कवि, केशवसुत, टिळक, विनायक, गोविंदाग्रज,बालकवि, दत्त, चंद्रशेखर, माधव जूलियन आणि भा.रा. तांबे इत्यादि कवींचा त्यात समावेश होता.

जगन्नाथ शास्त्री टुल्लू, गो. ब. माकोडे, श्री. टिकेकर, रा.ना. कुळकर्णी , सी.वि.सरवटे, ग.वि. जामगांवकर, कृ.वा.टिल्लू, रा.वा.खानवलकर, य.खं. कुळकर्णी, वि.ह. आपटे, सी. का. देव, श्री भालचंद्र लोवलेकर, सौ.सावित्रीबाई पटवर्धन, सौ. बोरगांवकर, सौ. ओक, सौ लक्ष्मीबाई जोग, यांचे सतत स्मरण होते.

इंदूरचे भूषण राजकवि रा.अ. काळेले, व.अ.काळेले, अप्पा खाडिलकर, गं. के. शिराळकर, सौ. प्रतिभाताई काळेले, सौ. बापट आणि तरूण कवि श्रीकृष्ण बेडेकर, श्रीराम घोडपकर, माधव साठे, चंद्रकांत जोशी इत्यादि आजही "काव्य यशसे" ही उक्ती खरी करीत आहेत.

व्याख्यानें

महाराष्ट्र साहित्य सभेला प्रारंभ झाल्यावर तिच्या नांवलौकिकाप्रमाणें व उद्देशाप्रमाणें कांही ठळक व विधायक कार्य होती घेण्याचें कार्यकर्त्यांनी ठरविलें. श्रोत्यांस कथा, कीर्तन, पुराण, प्रवचनाद्वारे ज्ञान ग्रहण करण्याची संवय होती. साहित्य सभेने पुढची पायरी गाठली व व्याख्यानमाला करावी ही कल्पना दृढ केली.

पहिल्याच वर्षी प्लेगने परीक्षा पाहिली. पण कार्यकर्ते डगमगले नाहीत. त्यांनी बारा व्याख्याने करवून हा संकल्प सिध्दीस नेला. पहिल्याच वर्षी झालेल्या ह्या व्याख्यान-मालेत विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षा विभागातील अधिकारी, डॉक्टर, हुजूर सेक्रेटरी, स्त्रिया आणि कारकून ह्यांनी उच्चनीच भाव न बाळगता सक्रिय भाग घेतला. अशा ह्या सुश्राव्य व्याख्यानांची परंपरा आजतागायन चालू आहे.

1928 च्या मुद्रित अहवालावरून असें दिसून येते की, व्याख्यात्यास दोन महिने आगाऊ विनंती केली जात असे व आगाऊ तीन महिन्यांचा कार्यक्रम आखून तो छापला जाई. दर पंधरा दिवसात एक व्याख्यान होत असे. व्याख्यान-विषयाचें सूत्र छापून व्याख्यानाचे वेळी वाटण्यात येई. पुढे आर्थिक अडचणीमुळें व्याख्यानांची रूपरेखा छापून वाटण्याची प्रथा बंद पडली.

सुरूवातीस सभेचे सभागृह नसल्याने हीं व्याख्यानें महाराजा शिवाजीराव मराठी माध्यमिक शाळा, इंदूर ग्रंथालय, महाराजा  थियेटर, नंदलालपुरा नाट्यगृह, ब्राह्मण सभा व श्री गणेश मंडळाचे सभागृह इत्यादि ठिकाणी त्या संस्थांच्या चालकांच्या सहकार्याने होत असत.

गत साठ वर्षाचा आढावा पाहतां असें दिसून येतें की, पहिल्या तीस वर्षात स्थानीय वक्ते अधिक होते, तर बाहेरचे कमी होते. दुस-या तीस वर्षात हें चित्र बदललें. बाहेरचे अधिक, इंदूरचे कमी. एकूण सुमारे 400 व्याख्यानें झालीं. त्यातील सवाशेच्यावर साहित्यिक, पासष्ट ऐतिहासिक चरित्रात्मक,सोळा शैक्षणिक, तीस नैतिक धार्मिक, तेवीस राजकीय, चोवीस सामाजिक, बाकी इतर विषयांवर होती. त्यात विविध विषय येतात जसे-शास्त्रीय, भूगोल, अध्यात्म, शरीर विज्ञान, ग्रंथ परिचय, कथाकथन, आरोग्य, प्रवास व क्रीडा.

आरंभी बहुधा सभाध्यक्षच व्याख्यानाचे अध्यक्ष असत. कधी कधी व्याख्यानाच्या विषयाचे अभ्यासक सभेचे सभासद अध्यक्ष असत. ते व्याख्यानानंतर समारोप करत. अशाने श्रोत्यांस दुहेरी लाभ घडे. चिटणीस आभार मानत. अभ्यस्त अध्यक्षांची उणीव भासू लागली. निरध्यक्ष व्याख्याने होऊ लागली.

आरंभीची व्याख्याने एकट्या साहित्य सभेने योजलेली असत. पुढे पुढे ती निरनिराळया संस्थांच्या सहयोगाने होऊ लागली. वक्ते वाढले, विविध भाषा आल्या, विषय वेगळे आले. साहित्यिक ऐतिहासिक हे विषय सुपरिचित ; तर बदलत्या परिस्थितीत नवीन दृष्टीकोण देणारी आर्थिक, सामाजिक व राजकीय व्याख्याने वाढत्या प्रमाणांत होऊ लागली.

कांही वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यात्यांचा व व्याख्यानांचा धावता उल्लेख करणे आवश्यक वाटते. 1927 त रा.सा.कृ.वि. वझे यांनी व्याख्यानमाला गुंफली. हिंदुशिल्पाचे वैशिष्टय, मूर्ति-पुजेचे रहस्य, तत्व व विचार, मूर्तिपुजेचे हिंदु आचार, विद्या कोणती शिकावी व शिकवावी, ही त्यातील आकर्षक पुष्पें-व्याख्यात्यांचा रोख मुख्यत्वेकरून प्राचीन आर्य संस्कृतीचें रहस्य कशात आहे हें समाजाच्या मनावर बिंबविण्याचा होता. त्यांत कल्पना-वैपुल्य, मार्मिकता आधुनिक पिढीला पटेल अशा पध्दतीने विषय मांडण्याची हातोटी, ह्मा गोष्टी ठळक असून त्यांच्या अस्खलित वाक्-प्रवाहानें सर्व जनसमूहावर चांगलीच छाप बसविली. 1941 त बाबासाहेब देशपांडे यांचे छत्रपति संभाजी महाराज, राजारामकालीन मराठ्यांचा आत्मयज्ञ या विषयावर प्रदीर्घ पण रंजक व्याख्यान झाले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सामाजिक परिवर्तनाची आवश्यकता यावरील भाषण मननीय होते.

डॉ.ह.रा. दिवेकर यांची 1960 मध्ये सात व्याख्याने झाली. विषय होता "आमचा महाभारत पूर्व राजकीय व सांस्कृतिक इतिहास" महाभारतपूर्व जवळ-जवळ शंभर वर्षाचा इतिहास कसल्याही प्रकारचे टाचण जवळ न बाळगता सांगताना डॉक्टरांची अचूक स्मरणशक्ती, तर्क-शुध्द विचारसरणी, सखोल व्यासंग व मर्मज्ञ रसिकता पावलोपावली प्रत्ययाला येत होती.

1950 पर्यंतचे व्यासंगी वक्ते असे-वि.सी सरवटे-- "प्राचीन न्यायदान पध्दती" प्रो. पुणतांबेकर-भारतीय राजनीति-शास्त्राचा इतिहास, गं. के. शिराळकर, वा. वा. ठाकूर, प्रभाकर माचवे, मुक्तिबोध, वा.गो. मायदेव,कृ पां. कुळकर्णी, भ.श्री पंडित, रा.श्री. जोग, ग.त्र्यं. माडखोलकर, वा.कृ.चोरघडे, महामहोपाध्याय द.वा. पोतदार, के. ना. डांगे, य. खं. कुळकर्णी व वि.ह. आपटे.

1950 ते 60 या दशकातील संस्मरणीय व्याख्याते व व्याख्याने अशी-रा. श्री. जोग "आधुनिक मराठी वाङ्मय"-श्री दा.सातवळेकर "मानवतेचें ध्येय". पु.ल. देशपांडे "प्राचीन व आधुनिक वाङ्मय". दा.ना.आपटे "सिंधु संस्कृती प्राचीन महाराष्ट्राचे कथानक, म.य. गोडबोले "ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य" बाबा राघवदास "भूदान"- बाळासाहेब भारदे "संत वाङ्मय"-- वसंत कानेटकर--"आजची मराठी रंगभूमि"-- विशेष व्याख्याते श्री अ.का. प्रियोळकर, दुर्गाबाई भागवत, सौ. वसुधा पटवर्धन, गो. नी. दांडेकर आणि पोस्ट व टेलिग्राफ खात्याच्या पश्चिम विभागाचे संचालक श्री वेलणकर.

1961 ते 74--भवानीशंकर पंडित "कविता व रसग्रहण" . डॉ.सुमती क्षेत्रमाडे "मी माझ्या कादंब-या कशा लिहिते. दि.ब.देवधर "मानवी जीवनांत साहित्य व क्रीडा यांचें महत्व" डॉ. चारूशीला गुप्ते "लेखणीने रंगविलेले स्त्री व पुरूष". विष्णुजी क्षीर सागर "समर्थ रामदास" रणजीत देसाई "स्वामी" मागील भूमिका व "श्रीमान योगी" माधव मंत्री "भारतीय क्रिकेट", भूतपूर्व वित्तमंत्री मुरारजी देसाई "विद्यार्थी असंतोष" मृणालिनी देसाई, ब्रह्मकुमार रमेश, प्रा. नरहर कुरूंदकर, जैन साध्वी प्रीतिसुधाजी आदींनी ही व्याख्यानमाला सजविली. श्री म.ना. अदवंत व व. मो. पुरंदरे यांची व्याख्यानेही गाजली. स्थानाभावी सर्व वक्त्यांची नांवे देता येत नाही याबद्दल खेद वाटतो.

स्थानिक वक्त्यांत जुन्या पिढीतल्या वा.गो. आपटे, सरदार मा.वि.किबे, त्रिं. ब. गोगटे, प्रा.वा. ब. श्रीखंडे, य.खं. कुळकर्णी, ल. बा. देव, वा. वा. ठाकूर, वि.सी. सरवटे यांची  आठवण होते. त्याचप्रमाणे काशीबाई देवधर, सी. सरला नाईक, सौ. दळवी, सरस्वतीबाई म्हाळस, कमलाबाई किबे यांचे आदरपूर्वक स्मरण होते.

1971 पासून साहित्य सभा व ब्राह्मण सभा यांच्या सहयोगातून "जनजागरण" व्याख्यानमाला सुरू केली आहे. त्यात खालील वक्ते प्रमुख आहेत. प्र.ना. कवठेकर, प्र.गो. घाटे, नि.छ.जमींदार, प्र.द.सरदेशमुख आणि मा.स.रावेरकर व सौ. वसुधा ढवळीकर.

आजच्या पिढीत  डॉ. वा. वि. भागवत, प्रा. ग.वा. कवीश्वर, डॉ.  साळुंके, प्र.गो.घाटे,रा. अ. काळेले, प्र.ना. कवठेकर हे चटकन दृष्टी समोर येतात. महिलांत सौ. कुंदाराणी गंधे, सौ उर्मिला थत्ते, सौ. वसुधा ढवळीकर, सौ. प्रतिभाताई काळेले सौ. मैनाताई गोखले, सौ.सुमित्रा महाजन,ह्या व्यासपीठावर ठळकपणे उभ्या दिसतात.

सभेला लाभलेले नामवंत अभ्यासू सुप्रसिध्द हिंदी वक्ते श्री राहुल बारपुते, राजेंद्र माथुर, होमी दाजी, प्रा. ओम नागपाल, रामनारायण शास्त्री व निरंजन जमींदार आहेत.

नाट्यशताब्द महोत्सव, 1945

इ.स.  1843 च्या सुमारास मराठी नाटक व नाटककार ह्यांनी सांगलीच्या श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासाठी "सीता स्वयंवर" हें नाटक तयार केलें. हाच तो मराठी नाट्यपरंपरेचा प्रारंभ. त्याला 1943 त शंभर वर्षे पूर्ण झालीं. महाराष्ट्रात शतसांवत्सरिक उत्सव सुरू झाले ते 1945 पर्यंत चालले.

इंदूरलाही नाट्य परंपरा होती. होळकर कॉलेजात स्नेह संमेलनातून मनोरंजनार्थ नाटकें होऊ लागलीं. "पानपतचा मुकाबला" हें वि.वि. मोडक लिखित नाटक रंगभूमीवर आलें. त्यात श्री वि.सी सरवटे यांनी काम केले होते. तसेच "कांचनगडची मोहना" यात  बरवे व नंतर य. खं. कुळकर्णी यांनी मोहनचें काम केलें. पुढे येथे नाटक कंपन्या येऊं लागल्या. सरकार दरबारात त्यांचे खेळ होत. होळकर सरकारच्या आश्रयाखाली "यशवंत संगीत मंडळी" अस्तित्वात आली. नाट्याचार्य देवलांच्या "शापसंभ्रमाला" होळकर नरेशांचे मोठे पारितोषिक मिळाले. नाटककाराची इंदुरात हत्तीवरून  मिरवणूक काढली. पाटणकर संगीत नाटक मंडळाचे मालक माधवराव पाटणकर यांचा व इंदूरचा विशेष ऋणानुबंध होता. ही नाटक मंडळी वर्षा दोन वर्षातून एकदा इंदुरास येई. त्यात पुरूष भूमिका करणारे नट भागवत व प्रमुख स्त्रीभूमिका करणारे बाळू मुजूमदार हे इंदूरचेच होते. होळकर कॉलेजतर्फे झालेले "लोक शासन" नाटक फार गाजलें. त्यातच स्त्री भूमिका केली श्री डिंगणकरांनी. ती सर्वोत्कृष्ट झाली असा निर्वाळा रसिकांना दिला. गणेश उत्सवात बाल विद्यार्थ्यांची नाटकें होऊ लागली. त्यातूनच बालोध्दार मंडळ अस्तित्वात आलें. त्याचे नवीनीकरण नाट्य भारतीच्या रूपाने झाले. इंदूरच्या नाट्यरसिक जनतेचे लक्ष शताब्दी समारोहाकडे वेधले गेले. साहित्य सभेने तो आपल्या वैशिष्ट्याने साजरा करण्याचे ठरविले. त्यात नाट्य प्रयोग, प्रतिनिधिक प्रयोग, नाट्य वस्तूंचे प्रदर्शन, नाट्यविषयक परिसंवाद व व्याख्याने ह्या कार्यक्रमांनी लोकांना भारून टाकले.

श्रीमंत यशवंतराव होळकरांनी  9-2-45 ला नाट्य महोत्सवाचे नगर भवनात उदघाटन केलें. पांच हजार रूपयांची देणगी दिली. श्रीमंत सौ. इंदिरा मामासाहेबांनी नाट्य प्रदर्शनाचे उदघाटन केलें. 500 रू. ची देणगी दिली. याखेरीज श्रीमंत तुकोजीराव होळकर व धार आणि देवास येथील नृपतींनी या उत्सवात भरीव देणग्या दिल्या होत्या. उत्सवात लाभलेला लोकाश्रय तर फार प्रचंड स्वरूपाचा होता. या उत्सवाचें उत्पन्न, देणगी, वर्गणी व इतर किरकोळ मिळून रू.14653.50 जमा झाले. व जवळ जवळ तितकाच खर्च झाला असे महोत्सव समितीने 1952 त प्रसिध्द केलेल्या आढावा -पत्रकावरून दिसते.

महोत्सवाचें अध्यक्षपद नागपूरचे नाट्य विषयाचे अभ्यासक श्री श्री. ना. बनहट्टी यांनी भूषविलें. त्यांना दहा दिवस राहणें शक्य नसल्यानें पहिल्या दिवसानंतर अध्यक्षपदाची धुरा नाट्यक्षेत्रातलें नामवंत अधिकारी, नट, नाटककार, हार्मोनियम-वादन पटु श्री टेंबे यांस सांभाळाची लागली. ते खास पाहुणे होते. कसलेले नट व सुप्रसिध्द संगीतज्ञ श्री रामभाऊ गुळवणी आणि अमरावतीचे एक नाट्यरसिक व नाट्य वाङ्मयाचे टीकाकार श्री शंकरराव सहस्त्रबुध्दे यांनाही निमंत्रित पाहुणे म्हणून बोलविले होते.

उत्सवाच्या उभारणीसाठी सरासरी 600 पर्यंत मंडळी सहा सात महिने अविश्रांत खपत होती. इंदुरातील प्रतिष्ठित घराण्यातील अनेक महिलांनी नाट्य प्रयोगात महत्वाचा स्त्री भूमिका केल्या. ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे.

13 ते 21 फ्रेबुवारी पर्यत सतत नऊ दिवस नाट्य प्रयोग नंदलालपुरा नाट्यगृहात सादर केले. नाट्य प्रयोग गेल्या शंभर वर्षातील नाट्य वाङ्मयाच्या विकासाचे प्रतिनिधित्व करणा-या नाटकांचे वा प्रवेशांचे होते. स्मरणात असल्यापैकी कांही नाट्य प्रयोग-प्रतिज्ञा, संशय कल्लोळ, मीराबाई, भावबंधन, खडाष्टक, कुलवधू, साष्टांग नमस्कार, पंताची सून, पराचा कावळा, वेडयांचा बाजार. त्यात पहिले पारितोषिक मिळाले भावबंधनला 51 रू. दुसरे कुलबधूस 21 रू. तिसरे प्रतिज्ञास 11 रू. तिसरे नाटक महत्वाकांक्षी बालोध्दार मंडळाने अभिनीत केले होते, तर दुस-यास प्र.गो. घाटे ह्मांचे दिग्दर्शन लाभले होते. कूलवधूचें वैशिष्ट्य असें कीं त्यांतील पुरूष-भूमिकासह सर्व भूमिका मुलींनीच उत्कृष्ट वठविल्या.

प्रातिनिधिक नाटकांतील प्रवेशांच्या प्रयोगांचें संचालन श्री सहस्त्रबुध्दे यांचें होते. त्यांतील कांही कलाकार व नाटके ही होती.

पुण्य प्रभाव- वि.वि. सरवटे, परांजपे, कु. बापट.
सुत्रधारी नटी- रामभाऊ गुळवणी, डॉ मालिनी सरवटे (हरमळकर).
सौभद्र - कु. झनाने, कु. द्रविड.
प्रेमसंन्यास- डॉ.ज.ग. ठाकूर, सौ. डॉ. विमलातार्इ ठाकूर.
सौभद्र - रामभाऊ गुळवणी व अप्पा पंतवैद्य.

या शिवाय उत्सवाचे कार्याध्यक्ष श्री रा.स. दाते यांनी "राजसंन्यासा" तील शेवटचे स्वगत अभिनीत करून दाखविले.

प्रातिनिधिक प्रवेशांचे प्रथम पारितोषिक "पुण्यप्रभाव" च्या प्रवेशाला मिळालें. ह्याचा अभिमान असंख्य स्त्री पुरूषांना आहे. श्री दाते यांचा प्रशस्त बंगला उत्सवापूर्वी प्रति नाट्यगृहाइतका उपयुक्त ठरला. वि.ह. आपटे यांनी परिश्रमपूर्वक उत्सवाची जुळवाजुळव केली. य. खं. कुळकर्णी व संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री आप्पासाहेब पंतवैद्य यांचा ही प्रामुख्याने उल्लेख करणे आवश्यक आहे.

महोत्सवामुळे साहित्य सभेस कांही कार्यकर्त्यांचा लाभ झाला. त्यात श्री.ग.रा. खंडकर, म.रा. उपासनी, भ. शं. जहागीरदार, प्रभाकर किबे, प.गो. जोगळेकर, नामजोशी, पु. काळे, प्र.गो. घाटे, ठाणेदार, श्री लोंढे, हे आहेत. तसेच डॉ. खेर, डॉ. ज.ग. ठाकूर, डॉ.सौ. ठाकूर, डॉ. मालिनी सरवटे (हरमळकर) यांनी व्यवसाय सांभाळून जें सहकार्य दिलें तें चिरस्मरणीय आहे. सौ. मनोरमाबाई रानडे, सौ. शैलजा बाई रानडे, कु. अनुसुया मिटबांवकर-इत्यादि अनेक भगिनींनी प्रयोगात भूमिका करून इंदुरात मिश्र नाट्य-प्रयोगाची प्रथा व्यवहार्य केली.

श्री वा. शि. मोघे आणि श्री खांडेकर यांनी आकर्षक प्रदर्शन भरविले. त्यात प्राचीन नेपथ्य साधनें, नाटककारांचे फोटो, नाट्य-वस्तु व नाट्य वाङ्मय यांचा समावेश होता.
श्री बनहट्टींनी अध्यक्षीय भाषण दिले. परंतु त्यांना दहा दिवस इंदूरास राहणे शक्य नसल्यामुळे समारंभाचा समारोप ते करूं शकले नाहीत. गो.स.टेंबे यांनी अत्यंत समतोल, प्रभावी व गौरवयुक्त शब्दांत नाट्य महोत्सवाच्या समारोप केला.

ह्मा उत्सवाने नाट्य व रंगभूमि या विषयांना एवढी जोराची चालना मिळाली की नाट्यक्षेत्रात नित्य काम करणारी एक नाट्य-शाखा साहित्य सभेच्या नेतृत्वात काढण्यात यावी येथपर्यंत त्या विचारांची मजल पोहोचली. पुढे 1947  पासून सुरूवात झालेल्या शारदोत्सवात दोन तीन मराठी, हिंदी नाटके करायची प्रेरणा या विचार मंथनातूनच मिळाली म्हटले तरी चालेल.

प्रा.ग.वा. कवीश्वर यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करणा-या व श्री प्र.गो. घाटे यांच्यासारखा कुशल कार्यकर्ता चिटणीस म्हणून लाभलेल्या कार्यक्रम समितीच्या अविश्रांत मेहनतीमुळें 13-14 दिवस चाललेल्या विशाल महोत्सवांत अत्यंत सूत्रबध्दता होती व सर्वांनी समितीची मुक्त कंठानें प्रशंसा केली.

टीप:- प्रयत्न करूनही नाट्य महोत्सवाची सविस्तर सलग माहिती मिळूशकली नाही. वार्षिक वृत्तांतांत अगदीच त्रोटक माहिती दिलेली आहे. वरील माहितीचा आधार प्रमुखतया वि.ह. आपटे व मधुसूदन उपासनी ह्यांनी लिहिलेल्या खङर्याचा आहे.उपासनींचा लेख नवभारत मध्ये प्रकाशित झालेला आहे. नाट्य प्रयोगांचीं नावें श्री अण्णा सरवटे, प्र.गो.घाटे, डॉ.ज.ग. ठाकूर व श्री रा. ब. बालोणकर ह्यांच्याकडून घेतली आहेत.