पुरस्कार व पारितोषिकें

महाराष्ट्र साहित्य सभेचा उद्देश्य ध्यानी घेऊन आजपर्यंत अनेक दानशूर विद्याव्यासंगी, भाषाप्रेमी जनांनी मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठीं वेगवेगळया मार्गांनी प्रयत्न होण्यास्तव विश्वासाने  देणग्या दिल्या आहेत. सभा त्यातून दात्यांच्या इच्छेप्रमाणें स्पर्धा घडवून आणते व समारंभपूर्वक पारितोषिकें वितरित करते. निरनिराळीं पारितोषिकें अशी -

साहित्य

श्री. वि.सी.सरवटे पारितोषिके 1943

रा.ब.श्री.ल. तांबे माजी कार्याध्यक्ष अखिल भारतीय म.साहित्य संमेलन 1935 इंदूर व सरचिटणीस मुंतजिम-खास बहादुर न.शं. रहाळकर यांनी 1943 त सभेस एक पत्र लिहिलें त्यात त्यांनी सुचविलें की मराठी साहित्य समालोचनाच्या विक्रीच्या निधीवर जे व्याज येते त्या व्याजाच्या रकमेतून प्रतिवर्षी प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांतून उत्तम ग्रंथास पारितोषिक द्यावे, त्याला नाव द्यावे "सरवटे पारितोषिक". या सूचनेला स्वत: तात्या साहेब सरवटे आणि साधारण सभेनें 30-4-44 च्या कार्यकारी मंडळाच्या विनंतीवंरून मान्यता दिली. याची पूर्व तयारी  26-8-45 पर्यंत चालू होती. का. का. मंडळाची बैठक 6-11-59 रोजी झाली. त्यांत "मराठी साहित्य समालोचन" निधीवर विचार झाला. व्याज आकारणें बंद करावे असें ठरले. परंतु निधीचा उपयोग कसा करावा याचा विचार पुढील बैठकीत करावा असे ठरले. दरम्यान या विषयी सूचना मागवाव्या.

जें व्याज साधारण सभेने मंजूर केले तें व्याज बंद करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास कसा? ज्या पारितोषिकास साधारण सभेने मान्यता दिली, ते पारितोषिक 1944-58 च्या प्रदीर्घ काळांत एकदांतरी अमलांत आणण्याची व्यवस्था केली कां? या व्याजाची, या पारितोषिकाची पूर्व योजना कार्यकारी मंडळाच्या समोर असती तर ती अमलांत येती! पण ती नजरेआड झाली !

1958 ते 1964 मार्च पर्यंत म.सा. समालोचन बिक्री निधीवर व्याज बंद होते. ह्या अनियमितपणाकडे मा.स. रावेरकर यांनी कार्यकारी मंडळाचे लक्ष वेधलें. मंडळाने ते व्याज 1966 एप्रिल पासून पुनश्च सुरू केले. सन् 1958 ते 66 पर्यंतचे व्याज व प्रतिवर्षींच्या निधींवरील व्याजातून प्रकाशित झालेल्या उत्तम मराठी ग्रंथास पुरस्कार या योजना ब-याच काळपर्यंत कार्यान्वित व्हावयाच्या राहिल्या.

सुवर्ण महोत्सव प्रसंगी (1969) या पारितोषिकाचा उल्लेख असा आहे-श्रद्धेय श्री. तात्या साहेब सरवटे यांच्या म.सा.समालोचन खंड 1 व 2 या ग्रंथाच्या विक्रीची जी रकम सभेकडे जमा आहे तिच्या व्याजातून उत्कृष्ट ग्रंथास रू. 250 चे पारितोषिक देण्याच्या योजनेनुसार या विषयावरील पुस्तकें मागविण्यात आली. परंतु अपेक्षेनुसार प्रतिसाद न मिळता फक्त एकच पुस्तक परीक्षणार्थ सभेकडे आले.

प्रा.अ.म.जोशी यांच्या "भारतीय नाटय विज्ञान" या ग्रंथास रू. 101चा पुरस्कार देण्यात आला. 1972 (वा.वृ.71-74)

श्रीमंत महाराणी इंदिरा मा साहेब होळकर यांचे पारितोषिक

श्रीमंत यशवंतराव होळकरांनी नाममात्र किंमतीत दिलेल्या जुन्या इमारतीच्या समोरील अंगणात भव्य तीन मजली इमारत उठविली. ते भवन अवलोकनात यावे म्हणून मा साहेबांस सादर निमंत्रित केले. त्यांनी 31-1-44 रथ-सप्तमीस भेंट दिली. नव्या इमारतीचे सूक्ष्म कुतूहलपूर्ण नजरेने अवलोकन केले. श्री.वि.सी.सरवटे यांनी सभाकार्याची, त्यातील प्रवृत्तींची, त्यांच्या आवश्यकतांची थोडक्यांत सुसंगत माहिती दिली. उत्तरात श्रीमंत मा साहेबांनी बाल वाचनालयास रू.101ची देणगी दिली.  तरूणांना उद्बोधक व मार्गदर्शक होईल अशा उत्तम स्थानिक वाङ्मय कृतीस वार्षिक रू.300चे पारितोषिके दिले जाईल अशी घोषणा केली.

श्रीमंत इंदिरा मा साहेब व सरवटे पारितोषिके मूर्तरूपास यावयाचे आहेत.(वा.वृ.45-46)

श्री.वामन गणेश पंतवैद्य हे येथले मान्यता प्राप्त सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे व बार असोसिएशनचे अध्यक्ष व सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रोत्साहक होते. त्यांच्या सुविद्य  व सुसंपन्न अपत्यांनी दोन हजार रूपयांचे विकत घेतलेले डिबेंचर्स आपल्या पितृस्मरणार्थ कांही अटींवर सभेजवळ वीस वर्षें ठेवण्याचा मानस व्यक्त केला. दरसाल दरशेकडा 5 रू. या कर्ज रोख्यावर व्याज मिळे. हे व्याज प्रतिवर्षी शंभर रूपये येई. सभेने ते व्याज घ्यावा, एखाद्या उपयुक्त विषयावर पुस्तक लिहवावे व आलेल्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रतींतून नेमलेल्या परीक्षकांकडून उत्तम ठरेल त्याला हे बक्षीस द्यावे, पण हस्तलिखित प्रतीस बक्षीस मिळण्याची पात्रता मुद्रित झाल्यावरच येईल, ही अट होती.

श्री. पंतवैद्यांचे चिरंजीव नारायण वामन उर्फ नानूभैय्यांनी बक्षिसास पात्र ठरलेल्या हस्तलिखितास प्रकाशित करण्याची जवाबदारी पत्करली. विक्रीची व्यवस्था सभेकडे सोपविली. नफा झाला तर तो सभेने व नानूभैय्यांनी समभागाने वाटून घ्यावा. तोटयाचा संपूर्ण हिस्सा नानूभैय्यांनीच वहन करावा असे ठरले.

या योजनेनुसार सन् 1940 पासून तो 1943 ऑगस्ट पर्यंत जी नाटके प्रकाशित झाली ती परीक्षणास मागविली. परीक्षकांच्या मते मुंबई विल्सन कॉलेजचे प्रा.गो के. भट यांचे "गृहदाह" हे हस्तलिखित नाटक बक्षिसास पात्र ठरले. सांगलीच्या अ.भा.मराठी सा.संमेलन 1943त याची घोषणा झाली. ते छापले गेल्यावर हे 100 रू. चे बक्षीस त्यांस दिले गेले. 1944चे सदर पारितोषिक श्री. प्रभाकर पाध्येकृत "व्याधाची चांदणी" या लघुकथा संग्रहास मिळाले.

चाळीस ते चवेचाळीस ह्मा पांच वर्षांत बक्षिसे दोनच दिली गेली. नियमित पणाला अडचण आली. त्यामुळें मूळच्या योजनेत बदल घडवून आणला. अजमेर बोर्ड व आग्रा विद्यापीठ यांत मॅट्रिक, इंटर व बी.ए.ला मराठी घेऊन उत्तीर्ण होणा-या श्रेष्ठ विधार्थ्यांस ही पारितोषिके रू.20, 30, 50या क्रमाने द्यायची होती.1948 व 49 त अशी बक्षिसे सभेने दिली. 1950 ची माहिती अजमेर बोर्ड व आग्रा विद्यापीठाकडून येताच ही बक्षिसे दिलीं जायची होती.

दि.25-12-50 च्या बैठकीत ठरल्या प्रमाणें श्री. पंतवैद्य यांचे 1100 रू. चे अकरा कर्ज रोखे सभेने परत केले. बाकी कर्ज रोखे रू.900 चे नऊ परत देणे राहिले. त्याच्या व्याजाचे रू.45 येतील त्यात ती भर टाकून वरील बक्षिसें अव्याहत चालू ठेवण्याची विनंती सभेने श्री. नानूभैय्यांस केली.

वर उल्लेखित 900 रू. चे कर्जरोखे सभेने नंतर परत केले. सभा ऋणमुक्त झाली. ही बक्षिसें सभेतून विराम पावली.

यशवंत नाटय पारितोषिक

सन् 1945 त नाटय शताब्द महोत्सव साजरा झाला. या उत्सवात प्रत्येक वर्षी प्रयोग व वाङ्मय या दोन्ही दृष्टींनी श्रेष्ठ ठरणा-या मराठी नाटकास 1250 रू. चा पुरस्कार श्रीमंतांनी घोषित केला. परीक्षण इत्यादीच्या खर्चास रू.500 वेगळे दिले आणि या विषयांची सर्व व्यवस्था साहित्य सभेकडे सोपविली.

कार्यकारी मंडळाने 1950 व 51या दोन वर्षातील छापील किंवा हस्तलिखित नाटकें बक्षिसासाठीं बोलावली. 16 मुद्रित व 12 हस्तलिखित अशी 28 नाटकें बक्षिसासाठी आली. परीक्षक मंडळाने आपला निर्णय असा दिला - "डॉ कैलास" लें अ.ह.जोशी, "रक्षा" हस्तलिखित ले. तारा बनारसे या दोघास प्रत्येकी रू.250 च्या बक्षिसास पात्र ठरविले.

1952 त परीक्षक मंडळाच्या निर्णयानुसार (अध्यक्ष आचार्य अत्रे), कार्यकारी मंडळाने "जुगार" ले. मुक्ताबाई दीक्षित व "राणीचा बाग" ले. डॉ.अ.वा.वर्टी यांच्यात पारितोषिकाची रकम समत्वाने विभागून दिली.

नाटय पारितोषिक रकम पुन: पूर्ववत सुरू करावी अशी विनंती श्रीमंत यशवंतरावांस सभेने केली.

कै. सौ. तारादेवी जमीदार पारितोषिक

सुविख्यात धनिक, साहित्यिक, हिन्दी मराठी उभय भाषांवर लोभ ठेवणा-या श्री. निरंजन जमीदार यांनी आपल्या परमपूज्य मातोश्रींच्या स्मरणार्थ 1000 रू. ची देणगी सभेस दिली (जानेवारी 1969).मातृभाषा हिन्दी असलेल्या इंदूरस्थ व्यक्तीकडून निर्माण होणा-या उत्तम मराठी कृतीस या रकमेच्या व्याजातून पारितोषिके द्यावयाचे आहे. पहिल्या वर्षीचे पारितोषिक देण्यासाठी श्री. जमीदारांनी 100 रू. वेगळे दिले आहेत.

उदयोन्मुख लेखकांस प्रकाशन सहाय्य

19-20-21 जानेवारी 74ला झालेल्या शारदोत्सवात अध्यक्ष श्री. मंगेश पाडगांवकर यांनी सूचना केली कीं उदयोन्मुख लेखकांस वा कवीस प्रकाशन सहाय्य करता यावे म्हणून साहित्य सभेने एक निधि उभारावा. स्वत: पाडगांवकरांनी 51रू. ची देणगी देऊन निधीचा शुभारंभ केला आहे.

श्री. बाळ बापट यांनी त्यांच्या मातोश्री कै.सौ. जानकीबाई बापट यांच्या स्मरणार्थ शारदोत्सवातील निबंध स्पर्धेत उच्चतर माध्यमिक गटास पारितोषिकासाठी शंभर रूपयांची देणगी दिली आहे.

वक्तृत्व

गो.वा.खांडेकर पारितोषिके

"वक्तृत्वाच्या चढाओढीतील बालवर्गासाठी एक चांगल्या पैकी कायमचे पारितोषिक ठेवण्याची घोषणा इंदूरचे सुप्रसिद्ध दानशूर नागरिक श्री.गोविंद वामन खांडेकर यांनी केली." (वा.वृ.1945-46)

गोगटे पारितोषिक

श्री.त्र्यबंक बळवंत गोगटे हे तरूणांचे नेते, विद्यार्थ्यांचे हितचिंतक शिक्षक, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, ग्रंथकार, व वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. सभेच्या शेवटी आभार मानण्याचे कार्य त्यांजकडे असे. व्याख्यानाचा शीण ते विनोदाने कोटिबाजपणाने घालवीत.उपरोधिक छद्मी भाषण करण्यांत प्रत्युत्पन्नमति होते.येथें एकदा राजे मंत्र्यांच्या तंत्राने चालू लागले.मंत्री राजाच्या मर्जी प्रमाणे सल्ला देऊ लागले. स्थानिक स्वकीयांची कुचंबणा होऊ लागली. ही वस्तुस्थिति राज्यकर्त्यांच्या नजरेस आणण्याचे त्रिंबकरावांच्या मनाने घेतले. उर्दू भाषेतला मौलवी वजीर व बादशाह यांच्यातला असाच प्रसंग निवडला. तो गोष्टीरूपाने वर्णिला !राजा व प्रजेत बेबनाव, परचक्र आगमन, राजा संकटग्रस्त. उपाय सुचेना. तेव्हा हा परका मंत्री म्हणतो "हुजूरका राज गया, इनका इमान गया। बंदे जाते मक्के शरीफ." येथेच त्यांचे भाषण संपले-राजे समजले. प्रधान उमगले. राजाने प्रधानाच्या हाती निरोप धाडला "मला तुमचे भाषण आवडले" प्रधानांनी तो वक्त्यांस सांगीतला. त्रिंबकरावांनी विचारले आपल्याला?

त्रिंबकराव 1933 वारलें. त्यांच्या पुत्रांनी, शिशु किशोर व पौगंड अवस्थेतील बालांत वक्तृत्व स्फुरावे, "वक्ता दशसहस़्त्रेषु" ही आकांशा जागृत व्हावी अशा हेतूने एक रौप्य पेला वर्षभराकरता द्यावा अशी सभेंस विनंती केली. त्रिंबकराव व सभा यांचा ऋणानुबंध लक्षांत घेऊन सभेने विनंतीला मान दिला प्रत्येक शारदोत्सवात ही वक्तृत्व स्पर्धा होते. 1945 पासून आजतागायत हा पेला चालू आहे.

भालेराव पारितोषिके

भालेराव हे कुटुंब रावेरचे. श्री. दत्तोपंत व  त्यांचे वडील बंधू इंदुरास वकिली करायला आले. उभय बंधूत फार प्रेम. ते एकत्र राहात. उभयतांचे लक्ष सार्वजनिक कार्याकडे असे. ब्राह्मण सभेचे ते पाठीराखे असा त्यांचा लौकिक आहे. सार्वजनिक व राजकीय जीवनात व्यासपीठावरील वक्तृत्व हे शत्रुला नामोहरम करणारे अमोघ शस्त्र आहे तसे श्रोत्यांना मोहिनी घालणारे आकर्षक साधन आहे. ह्मा अचाट शक्तीची साधना लहानपणा पासून व्हावी म्हणून श्री. दत्तोपंतांनी 1943त या कलेच्या उत्तेजनार्थ रू. 51 सभेच्या स्वाधीन केले. पैसे हाती आले. 1946 पर्यंत सभा ह्मा प्रयत्नास लागली नव्हती. 1946 त भालेरावजींनी 100 रू. अधिक भर घातली व 150 रू. ची ढाल "भालेराव बंधू पारितोषिक" म्हणून सभेच्या स्वाधीन केली.

प्रति शारदोत्सवात ही वक्तृत्व स्पर्धा होते. अजिंक्य ठरणारास एक वर्षा करतां दिली जाते. हा क्रम आज ही चालू आहे. त्यावेळी दत्तोपंताचे नांव स्मरणात येते. त्याचबरोबर भैरव प्रकरणात सभेची दिवाणी बाजू भक्कमपणे सांभाळणारे व वेळी अवेळी कायद्याचा सल्ला देणारे या स्मृति जागृत होतातच.

"आपली संस्था " पारितोषिक

महाराजा शिवाजीराव मराठी मिडिल स्कूल मधील "आपली संस्था" या संस्थेने 11 ते 14 वयाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीस वक्तृत्व  स्पर्धे साठी एक  फिरती ढाल व प्रथम द्वितीय क्रमांकास दोन पेले देण्यात यावे म्हणून सभेच्या स्वाधीन  केले आहेत. ही पारितोषिके सतत दिली जातात.

सुवर्ण महोत्सवांतर्गत दिल्या जाणा-या वक्तृत्व स्पर्धांसाठी श्री. कृ मे. दीक्षित यांजकडून आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ व श्री.लक्ष्मीबाई चिंचाळकर यांजकडून पतीच्या स्मरणार्थ विजयिका प्राप्त झाल्या. वा.वृ. 1969-71, त्या. कै.सौ. अनसूया दीक्षित पारितोषिके व "श्री. चिंचाळकर पारितोषिके" ह्मा नांवाने दर शारदोत्सवात दिल्या जातात. तसेच सुवर्ण महोत्सव प्रसंगी आंतर महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. त्यांत विजेत्या महाविद्यालयास  "घाटे मानचिन्ह" दिले गेले. पुढील शारदोत्सवात ही ते चालू आहे.

सौ. खडीकर यांनी कै.सौ. अनसूयाबाई खडीकर यांच्या स्मरणार्थ शारदोत्सवांतील बालकांच्या वक्तृत्व स्पर्धेत पारितोषकासाठी एक ढाल सभेली दिली आहे.

परीक्षांतील सुयश

गुरूवर्य पांढरकर सत्कार निधी

श्री. हनुमंत रघुनाथ पांढरकर हे धैर्यशील व शांतिप्रिय - बालपणी मातृवियोग ऐन तारूण्यात पत्नी विरह ! ऐन उमेदीत मॅट्रिक झालेला पुत्र निवर्तला ! ही दु:खे सहन केली. कर्तव्यच्युत झाले नाहीत. होळकर राज्यात शिक्षक नेमले गेले. आबाळलेला दुर्लभिलेला विषय व्याकरण तोच विषय हे चांगला शिकवीत. अध्यापन कौशल्य पाहून यांच्या स्वाधीन वीर सावरकर फळबाजारामागील व्हर्नाक्युलर फायनल स्कूल होळकर सरकारने दिले. मराठी फायनलला बसणारी मुलें मुंबईच्या जळगांव केंद्रातून बसत. पांढरकरांनी या शाळेची  शिस्त सुधरवली विद्यार्थ्यांचे लेखन वाचन पठण पाठण सुधारले. मुलांच्या शारीरिक, सांस्कृतिक व बौद्धिक विकासाकडे लक्ष पुरविले. सहका-यांत एकोपा निर्मिला. उत्साह वृद्धिंगत केला. मागासलेली संस्था प्रगत संस्थेबरोबर आणून सोडली. हे इंदूरला कसे सफल होतील अशी शंका प्रकट करणारांकडून साफल्याचे प्रशस्ती पत्र घेतले. विद्यार्थांचे ते आदरणीय शिक्षक झाले. मोडी वाचन  करणारे आज विरळे. त्यांत पांढरकर हे होत. त्यांनी मराठी शिक्षक लेखकांस प्रस्तावना लिहून उत्तेजन दिले.

त्यांच्या सेवानिवृत्त विद्यार्थ्यांनी. मित्रांनी व चाहात्यांनी त्याना मानपत्र दिले. थैली अर्पण केली. त्या थैलीत स्वत:ची 101 रू.ची भर घातली व ही 750 रू. ची रकम विद्यार्थ्यांचे लक्ष मातृभाषेकडे वेधले जावे अशा करता उपयोगी आणावी अशी इच्छा प्रदर्शित केली. विश्वस्तांनी, "प्रवेश" परीक्षेत उच्चांक मिळवून प्रथम येणारास व फायनल स्कूलच्या 8व्या वर्गातून-त्या शाळेतून जो सर्वप्रथम येईल त्याला बक्षीस दिले जावे अशी विनंती साहित्य सभेंस केली व ही रकम सभेच्या स्वाधीन केली. "गुरूवर्य पांढरकर सत्कार निधी" हे त्या बक्षीसाचे नांव. ही बक्षिसे 1957-58 पासून आज पर्यंत विशेषत: शारदोत्सवात वितरीत केली जातात.

महाराष्टृ साहित्य सभा पारितोषिकें

प्रथमा, प्रवेश, प्राज्ञ आणि विशारद या साहित्य परीक्षांच्या अभ्यासकास उत्तेजन मिळावे म्हणून सभेने क्रमश: 10, 15,25 आणि 51रू.ची वार्षिक पारितोषिके 1958-59 या वर्षी जाहीर केली. विशारद परीक्षेच्या विजेत्यास प्रथम श्रेणीत प्रथम येणे आवश्यक आहे. हे पारितोषिक महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरच देणार. प्रवेश परीक्षेचे पारितोषिक ह.र. पांढरकर निधीतून दिले जाईल. स्थानिक स्पर्धकास तो प्रथम असावा ही अट आहे.

साहित्य परिषद पुणें येथल्या परीक्षा 1963 त संपल्या. ह्मा परीक्षा म. प्र. मराठी साहित्य संघा तर्फे 1964 पासून सुरू झाल्या. ही पारितोषिके आता ह्मा परीक्षेतील विद्यार्थ्यांना देण्यात येतात.

तीन वर्षांसाठीं  "नर्मदा पारितोषिक" प्राज्ञ परीक्षेत सर्वाहून अधिक गुण मिळविणारास प्राप्त व्हावयाचे. बक्षिस प्राप्तकर्त्यांस निदान द्वितीय श्रेणीत सर्वात अधिक गुण मिळविणे जरूर आहे, असे बक्षीस देणा-या  सौ. इंदिराबाई टिल्लू यांचे मत प्रवेशचे बक्षीस विट्ठल आबाजी नांदेडकर यांनी जाहीर केले. आता ही दोन्ही पारितोषिके बंद झाली आहेत.

श्री. विष्णुपंत मोघे यांनी आपल्या दिवंगत कन्येचा स्मरणार्थ सभेस 101 रू.ची देणगी दिली असून तिच्या व्याजातून प्रथमा परीक्षेत सभाकेंद्रातून प्रथम येणा-या विद्यार्थ्यांत पारितोषिक द्यावयाचे आहे. (वा.वृ.69-71)

71-74 या कालावधीत श्रीमती कमलाबाई किबे व प्रख्यात औद्योगिक संस्थान मेसर्स कल्पना इंडस्ट्रीज कडून प्रत्येकी  1000रू. ची औदार्यपू्र्ण देणगी प्राप्त झाली. श्रीमती कमलाबाई किबे यांजकडून मिळालेल्या देणगीच्या व्याजातून शारदोत्सव प्रसंगी आयोजित करण्यात येणा-या स्पर्धांतील विजयी उमेदवारास पारितोषिक द्यावयाचे आहे.

अन्य स्पर्धा

श्री. ना.कृ. वैद्य हस्ताक्षर पारितोषिक

श्री ना.कृ.वैद्य हे साहित्य सभेच्या संस्थापकांपैकी एक-मराठी ग्रंथोत्तेजक मंडळाचे दोघांपैकी एक चिटणीस. होळकर सरकार ग्रंथमालेच्या एका पुष्पाचे लेखक "कमलेची पत्रे ". साहित्य सभेच्या ग्रंथालयाचे संस्थापक, विविध ज्ञान विस्तार व मल्हारि मार्तंड विजयात स्फुट लेखक-त्यांचे पुत्र ग.ना.वैद्य यानीं त्यांच्या पित्याने घेतलेल्या डिबेंचरची रकम 100 रू. परत न घेता पूज्य वडिलांच्या नांवावर "हस्ताक्षर स्पर्धा" सुचविली (वा.वृ.58-59). विजयी स्पर्धकास ह्मा रकमेच्या व्याजातून बक्षीस द्यावयाचे. सभेने हे मान्य केले. ही पारितोषिके 1960 च्या जानेवारी पासून देण्यात येतात.

श्री. के.भा.कोचरेकर स्मृति दिन पारितोषिकें

श्री. के.भा. कोचरेकर हे होळकर  कॉलेजचे बी.ए. ते महाराजा शिवाजीराव मराठी माध्यमिक शाळेत शिक्षक होते. नंतर तेथेच मुख्याध्यापक झाले. कालेज पासून ते "उद्धरेत् आत्मनात्मानं" या नात्याने वागले. तेथल्या गरीब विधार्थी सहायक संस्थेत त्यांनी कार्य केले. विद्यार्थ्यांना आपला वर्ग, आपली शाळा नीट नेटकी कशी राखावी, आपल्या असहाय्य विद्यार्थी बांधवांना आपण सहाय्य कसे द्यावें, व्यक्तीगत हितापेक्षा सामाजिक हिता करतां कसें झटावे हे प्रत्यक्ष तशी कार्ये संघटनेने करून त्यांनी शिकविले. "आपली संस्था" काढली-सामाजिक कार्ये करून समाजाच्याच हितार्थ तो पैसा कसा लावावा याचे शिक्षण दिले. पुढें म.शि. म.हायस्कूलचे प्रधान अध्यापक झाले. सभेचे ते उपाध्यक्ष होते. निष्ठावंत कार्यकर्ते होते.

त्यांच्या मरणोत्तर त्यांच्या गुणग्राहकांनी त्यांच्या स्मरणार्थ रू. 5001द्रव्य निधी जमविला व तो सा. सभेच्या स्वाधीन केला (वा.वृ.- 68-69). याच्या व्याजातून विद्यार्थांस पारितोषिक देण्याची व बाल शिक्षण विषयक कार्य करण्याची जबाबदारी  सभेने घेतली. सभेने त्यांचा पहिला स्मृति दिन 15-2-70 रोजी भू.पू.न्या. मू. बा.य. रांगणेकर यांच्या अध्यक्षतेत केला.

श्रीमती लक्ष्मीबाई गोळवलकर यांनीं त्यांचे दिवंगत पति संगीतज्ञ गुरूवर्य श्री मोरेश्वरराव गोळवलकर यांच्या  स्मरणार्थ पांचशे एक रूपयांची देणगी सभेला दिली आहे. या रकमेच्या व्याजातून संतकाव्य-गायक स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकाला पारितोषिक द्यावयाचे आहे.